मुंबई इंडियन्स विरूद्ध पंजाब किंग्ज यांच्यात गुरुवारी (दि. 18 एप्रिल) झालेल्या अटीतटीच्या सामन्यात मुंबईने शेवटच्या षटकात बाजी मारली. मुंबई इंडियन्सने पंजाबला ऑल आऊट करत 9 धावांनी निसटता विजय मिळवला. पंजाबच्या आशुतोष शर्माने अखेरच्या षटकांमध्ये तुफान फलंदाजी करत मुंबईच्या तोंडचे पाणी पळवले होते. परंतू अखेर मुंबईने आपला क्लास दाखवत सामना जिंकलाच.
जसप्रीत बुमराहला या सामन्यासाठी सामनावीराचा पुरस्कार मिळाला. बुमराहने 4 षटकांत 21 धावा देत 3 विकेट्स मिळवल्या. तर दुसऱ्याच षटकात 2 महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या होत्या. तसेच सामनावीराच्या पुरस्कारासह बुमराह आता पर्पल कॅपच्या शर्यतीत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. मुंबईकडून बुमराहसोबतच कोएत्झीने 4 षटकांत 32 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. तर आकाश मधवाल, हार्दिक पंड्या आणि श्रेयस गोपाल यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
ALL THE FEELS 🥹🥹💙#MumbaiMeriJaan #MumbaiIndians #PBKSvMIpic.twitter.com/xIo8jdIpsU
— Mumbai Indians (@mipaltan) April 18, 2024
नाणेफेक गमावल्यानंतर मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करत 7 बाद 192 धावा केल्या होत्या. यात रोहित शर्मा 25 चेंडूत 36 धावा, सुर्यकुमार यादव 53 चेंडूत 78 धावा, तिलक वर्मा 18 चेंडूत 34 धावांचा समावेश होता. पंजाबकडून हर्षल पटेलने सर्वाधिक 3 तर सॅम करने 2 विकेट्स घेतल्या होत्या. 193 धावांचे लक्ष्य गाठताना पंजाबचा संघ 183 वर ऑल आऊट झाला. पंजाबकडून शशांक सिंह (41) आणि आशुतोष शर्मा (64) यांनी किल्ला लढवला.