आयपीएल 2024 च्या 55व्या सामन्यात आज मुंबई इंडियन्ससमोर सनरायझर्स हैदराबादचं आव्हान होतं. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. मुंबई इंडियन्सनं सनरायझर्स हैदराबादवर 7 गडी राखून विजय मिळवला आहे. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादनं 20 षटकांत 8 गडी गमावून 173 धावा केल्या होत्या. मुंबई इंडियन्सनं हे लक्ष्य 17.2 षटकांत 3 गडी गमावून गाठलं.
मुंबईकडून सूर्यकुमार यादवनं शानदार शतक ठोकलं. तो अवघ्या 51 चेंडूत 102 धावा करून नाबाद राहिला. आपल्या या खेळीत त्यानं 12 चौकार आणि 6 षटकार लगावले. त्याला तिलक वर्मानं उत्तम साथ दिली. या दोघांमध्ये चौथ्या विकेटसाठी नाबाद 143 धावांची भागीदारी झाली, ज्यामुळे सामना हैदराबादच्या हातातून निसटून गेला. तिलक वर्मा 37 धावा करून नाबाद राहिला.
मुंबई इंडियन्सची सुरुवात खराब झाली होती. रोहित शर्मा आजही अपयशी ठरला. तो 3 चेंडूत केवळ 4 धावा करून तंबूत परतला. ईशान किशन 9 धावा करून तंबूत परतला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला नमन धीर 9 चेंडूत भोपळाही न फोडला आऊट झाला. हैदराबादकडून भुवनेश्वर, यानसन आणि कमिन्स यांनी प्रत्येकी 1-1 बळी घेतला.
तत्पूर्वी, नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादनं 8 गडी गमावून 173 धावा केल्या. संघासाठी सलामीवीर ट्रॅव्हिस हेडनं 30 चेंडूत सर्वाधिक 48 धावांची खेळी खेळली. तर नितीश रेड्डीनं 20 धावा केल्या. शेवटी, कर्णधार पॅट कमिन्सनं फटकेबाजी करत 17 चेंडूत नाबाद 35 धावा केल्या. या व्यतिरिक्त इतर कोणताही फलंदाज आपली छाप सोडू शकला नाही.
या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. कर्णधार हार्दिक पांड्या आणि फिरकीपटू पीयूष चावला यांनी सर्वाधिक 3-3 बळी घेतले. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि पदार्पण करणाऱ्या अंशुल कंबोजनं 1-1 विकेट घेतली.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
मुंबई इंडियन्स – ईशान किशन (यष्टिरक्षक), रोहित शर्मा, नमन धीर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, अंशुल कंबोज, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा
इम्पॅक्ट प्लेअर्स – नेहल वढेरा, शम्स मुलानी, शिवालिक शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, रोमॅरियो शेफर्ड
सनरायझर्स हैदराबाद – अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, मयंक अग्रवाल, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (यष्टिरक्षक), अब्दुल समद, शाहबाज अहमद, मार्को यानसन, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, टी नटराजन
इम्पॅक्ट प्लेअर्स – मयंक मार्कंडे, ग्लेन फिलिप्स, सनवीर सिंग, जयदेव उनाडकट, उमरान मलिक
महत्त्वाच्या बातम्या –
वानखेडे स्टेडियमवर पहिल्यांदाच मॅच पाहायला आला ‘ज्युनियर बुमराह’, सोशल मीडियावर फोटो तुफान व्हायरल
टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची जर्सी लॉन्च, या लूकमध्ये दिसणार रोहित ब्रिगेड
कोण आहे अंशुल कंबोज? हैदराबादविरुद्ध मुंबई इंडियन्सनं दिली पदार्पणाची संधी