येत्या 22 मार्चपासून आयपीएल 2024 चा थरार रंगणार आहे. लीगचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला जाईल.
इंडियन प्रीमियर लीग ही जगातील सर्वात मोठी टी-20 स्पर्धा आहे. या स्पर्धेत खेळण्याचा दबाव काही वेगळाच असतो. या दबावाखाली अनेकदा अनुभवी खेळाडू देखील कच खातात. तर बरेचदा काही युवा खेळाडूंनी आपल्या संघाला एकहाती सामना जिंकवून दिल्याचंही आपण पाहिलं आहे. गेल्या मोसमात रिंकू सिंह अशाच प्रकारे सलग 5 षटकार मारून चर्चेत आला होता. चला तर मग जाणून घेऊया IPL 2024 मध्ये खेळणाऱ्या सर्वात वयस्कर आणि सर्वात तरुण खेळाडूबद्दल.
IPL 2024 चा सर्वात वयस्कर खेळाडू
आयपीएलमध्ये असे अनेक खेळाडू आहेत जे बऱ्याच काळापासून स्पर्धेचा भाग आहेत. यापैकी एक नाव म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी. धोनी सध्या 42 वर्षांचा आहे. तो पहिल्या सीजनपासून आयपीएलचा भाग आहे. या दीर्घ प्रवासात त्यानं आपल्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जला 5 वेळा आयपीएलचा चॅम्पियन बनवलं.
जर आपण धोनीच्या वैयक्तिक कामगिरीवर नजर टाकली तर आजपर्यंत त्यानं आयपीएलमध्ये 250 सामने खेळले आहेत. या दरम्यान त्यानं 38.79 च्या सरासरीनं 5,082 धावा ठोकल्या. ‘कॅप्टन कूल’नं इंडियन प्रीमियर लीगमध्ये 24 अर्धशतकंही मारले आहेत. धोनी आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी यष्टीरक्षक आहे. आतापर्यंत त्यानं 180 वेळा विकेटच्या मागून फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवलं आहे.
IPL 2024 चा सर्वात तरुण खेळाडू
IPL 2024 चा सर्वात तरुण खेळाडू आहे अंगक्रिश रघुवंशी. त्याचा जन्म 5 जून 2005 रोजी दिल्ली येथे झाला. 2024 च्या लिलावात त्याला कोलकाता नाईट रायडर्सनं 20 लाख रुपयांना विकत घेतलं. 2022 मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या अंडर-19 क्रिकेट विश्वचषकादरम्यान अंगक्रिश प्रसिद्धीच्या झोतात आला होता. या विश्वचषकात त्यानं भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या. अंगक्रिशनं 6 सामन्यात 46.33 च्या सरासरीने 278 धावा केल्या, ज्यात एक शतक आणि एक अर्धशतकाचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“रोहित शर्मानं 2025 मध्ये चेन्नईकडून खेळावं”, माजी क्रिकेटपटूच्या वक्तव्यानं खळबळ
टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जाणार का? दुबईत होणार महत्त्वाची बैठक
IPL 2024 : या 5 फलंदाजांनी IPL 2023 मध्ये केल्या होत्या सर्वाधिक धावा, पाहा संपूर्ण यादी