आयपीएल 2025 चा हंगाम 22 मार्च रोजी सुरू झाला असून, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आता 32 सामन्यांनंतर एक मोठा इशारा दिला आहे. बीसीसीआयने सर्व संघ मालक, प्रशिक्षक, सहाय्यक कर्मचारी आणि अगदी समालोचकांनाही हैदराबादमधील एका संशयास्पद व्यावसायिकापासून दूर राहण्याचे निर्देश दिले आहेत. बीसीसीआयने दिलेल्या इशाऱ्यात त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, हा व्यावसायिक आयपीएलशी संबंधित लोकांना भ्रष्ट कारवायांमध्ये सहभागी करण्याचा प्रयत्न करत आहे.
हैदराबादमधील संशयित व्यावसायिकाबाबत मिडीया रिपोर्टनुसार, बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाने दिलेल्या माहितीनुसार, हा व्यावसायिक यापूर्वीही सट्टेबाजीच्या कामात सहभागी होता आणि यावेळीही त्याचा प्रयत्न असाच आहे, ज्यामुळे तो खेळाडूंना किंवा आयपीएलशी संबंधित इतर कोणत्याही व्यक्तीला अडकवू शकतो. या अहवालाच्या प्रकाशनानंतर, बीसीसीआयकडून सर्व संघांना इशारा देण्यात आला आहे. या अहवालात असेही सांगण्यात आले आहे की, सामन्यादरम्यान त्या व्यक्तीला स्टेडियममध्ये आणि नंतर टीम हॉटेलमध्येही पाहिले गेले होते.
बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी सुरक्षा युनिटने हैदराबादच्या व्यावसायिकाबद्दलच्या माहितीत असेही म्हटले आहे की, हा संशयास्पद व्यक्ती खेळाडूंना किंवा संघाशी संबंधित इतर कोणत्याही व्यक्तीला चाहत्याप्रमाणे भेटतो आणि नंतर त्यांना महागड्या भेटवस्तू देऊन त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करतो. याशिवाय, हैदराबादचा हा व्यावसायिक फ्रँचायझी मालक, खेळाडू आणि सामन्यांमध्ये समालोचन करणाऱ्या समालोचकांच्या कुटुंबियांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो. ही बातमी समोर आल्यानंतर, एसीएसयूनेही आपल्या वतीने सर्वांना सतर्क केले आहे.