दीपक चहर आणि मोहम्मद सिराज यांच्यासह अनेक क्रिकेटपटू इंडियन प्रीमियर लीगमधील आपल्या जुन्या संघांपासून दूर जाण्याने भावूक झाले आहेत. आता या यादीत भारताचा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनचे नावही जोडले गेले आहे. किशन 2018 पासून आयपीएल मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळत होता. पण आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात सनरायझर्स हैदराबादने त्याला 11.25 कोटी रुपयांना विकत घेतले. मुंबई फ्रँचायझीपासून दूर झाल्यानंतर इशान किशनने एमआयसोबत घालवलेल्या खास क्षणांची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर शेअर केली आहे.
2019 आणि 2020 मध्ये दोनदा चॅम्पियन बनलेल्या मुंबई इंडियन्स संघाचा ईशान किशन भाग होता. एमआय चॅम्पियन झाल्यानंतर ट्रॉफीचे चुंबन घेतलेला क्षण मुंबई संघाच्या खास आठवणींमध्ये आहे. भावनिक होऊन व्हिडिओ पोस्ट करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “तुम्हा सर्वांसोबत आनंदाचे अनेक क्षण शेअर केले. एमआय, मुंबई आणि पलटनचे माझ्या हृदयात नेहमीच खास स्थान असेल. तुमच्या सर्वांच्या सोबतीने मी एक चांगली व्यक्ती आणि खेळाडू बनलो आहे. या अविस्मरणीय आठवणी माझ्या हृदयात जपून आहेत. मला नेहमीच पाठिंबा देणाऱ्या व्यवस्थापन, प्रशिक्षक आणि चाहत्यांचे मी आभार मानतो.
View this post on Instagram
मेगा लिलावात इशान किशनने त्याची मूळ किंमत 2 कोटी रुपये ठेवली होती. वास्तविक त्याच्यावर बोली लावणारा पहिला संघ मुंबई इंडियन्स होता. पण काही वेळानंतर एमआयने माघार घेतली. लिलावात यष्टिरक्षकांची मागणी खूप जास्त होती. त्यामुळे पंजाब किंग्जपासून दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबादपर्यंत सर्वांनी किशनवर करोडो रुपयांची बोली लावली. शेवटी हैदराबदने किशनला 11.25 कोटी रुपयांमध्ये आपल्या संघात समाविष्ट केले.
इशान किशनने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत मुंबई इंडियन्ससाठी एकूण 89 सामने खेळले. ज्यामध्ये त्याच्या नावावर 2325 धावा आहेत. मुंबई फ्रँचायझीकडून खेळताना त्याने 15 अर्धशतकांची खेळीही खेळली आहे. पण आता तो सनरायझर्स हैदराबादमध्ये हेनरिक क्लासेन, ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मासारख्या तुफानी फलंदाजांसोबत खेळताना दिसणार आहे.
हेही वाचा-
पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद गमावणार? लवकरच आयसीसीची निर्णायक बैठक
ऑस्ट्रेलियाचे मंत्री देखील विराट कोहलीचे मोठे चाहते, म्हणाले, “मला त्याचा खेळ आवडतो, कारण तो…”
वैभव सूर्यवंशीने वयाची फसवणूक केली का? वडिलांनी दिले सर्वांना खुले आव्हान! म्हणाले…






