चेन्नई सुपर किंग्सची टीम आयपीएल 2025 मेगा लिलावामध्ये चांगलीच सक्रिय आहे. संघानं दुसऱ्या दिवशीही चतुराईनं बोली लगावल्या. सीएसकेनं इंग्लंडच्या सॅम करनला 2.40 कोटी रुपयांना विकत घेतलं आहे. याशिवाय भारताचा उदयोन्मुख फिरकी गोलंदाज वॉशिंग्टन सुंदरला गुजरात टायटन्सनं खरेदी केली. सुंदरसाठी शेवटची बोली 3.20 कोटी रुपये होती. तर दिल्ली कॅपिटल्सचा बंपर नफा झाला आहे. त्यांनी आरसीबीचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिसला केवळ 2 कोटी रुपयांना विकत घेतलं.
फाफ डू प्लेसिस 2022 पासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार होता. संघासाठी त्याची वैयक्तिक कामगिरी देखील उत्कृष्ट होती. मेगा लिलावात त्याची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. दिल्ली कॅपिटल्सनं त्याला मूळ किमतीत विकत घेण्यात यश मिळवलं. सीएसकेनं 2020-2021 मध्ये त्यांच्या संघाकडून खेळलेल्या सॅम करनला 2.40 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. त्याच्याशिवाय गुजरात टायटन्सनं वॉशिंग्टन सुंदरला 3.20 कोटी रुपयांना विकत घेतलं.
फाफ डू प्लेसिसवर इतर कोणत्याही संघानं बोली लावली नाही. सीएसकेला मात्र सॅम करनला विकत घेण्यासाठी लखनऊ सुपर जायंट्सकडून स्पर्धेला सामोरं जावं लागलं. दुसरीकडे वॉशिंग्टन सुंदरसाठी गुजरात आणि लखनऊमध्ये लढत पाहायला मिळाली. त्याची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. लखनऊनं 3 कोटींच्या पुढे बोली लावली नाही. अखेरीस, गुजरातनं 3.20 कोटी रुपयांची बोली लावून सुंदरचा आपल्या संघात समावेश केला.
सुंदर शेवटच्या हंगामात सनरायझर्स हैदराबादकडून खेळला होता. तर डु प्लेसिसनं आरसीबीसाठी गेल्या तीन हंगामात 400 हून अधिक धावा केल्या. डू प्लेसिसनं 2023 च्या मोसमात 730 धावा केल्या होत्या. सॅम कुरननं त्याच्या आयपीएल कारकिर्दीत 883 धावा आणि 58 विकेट्स घेतल्या आहेत.
हेही वाचा –
सीएसकेचा स्टार गोलंदाज मुंबईकडून खेळणार! 18 वर्षीय खेळाडूवर खर्च केले कोट्यावधी रुपये
भुवी-कोहली एकत्र खेळणार! दिग्गज गोलंदाज आरसीबीच्या ताफ्यात
IPL 2025 : अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ अनसोल्ड! विल्यमसनलाही खरेदीदार मिळाला नाही