आयपीएल २०२६ मध्ये सोमवारी (२७ एप्रिल) दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्धच्या सामन्यात लुंगी एनगिडी खेळला नाही. आता समोर आलेल्या वृत्तानुसार तो दिल्ली कॅपिटल्सच्या पुढील सामन्यालाही मुकणार आहे. त्याला पंजाब किंग्जविरुद्ध डोक्याची दुखापत झाली होती, यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) विशेष नियमानुसार तो पुढील सामन्यातही खेळणार नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, आयसीसीच्या अहवालात असे सांगितले गेले की डोक्याला दुखापत झाल्यास कोणत्याही खेळाडूला आयसीसी सात दिवसांच्या अनिवार्य विश्रांतीच्या कालावधीचा नियम करते. आयपीएलच्या नियमावलीमध्ये याबाबत स्पष्ट उल्लेख नसला तरी एनगिडीला हाच नियम पाळावा लागणार आहे. त्याच्या स्कॅनमध्ये कोणतीच गंभीर समस्या न आढळल्याने त्याला लगेच हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला.
एनगिडीला शनिवारी (२५ एप्रिल) पीबीकेएस विरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना ही दुखापत झाली होती. तो मैदानावर कोसळल्याने त्याला लगचेच रुग्णालयात दाखल केले गेले. पीबीकेएसच्या प्रियांश आर्यने अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर मारलेला शॉटवर झेल घेण्याचा प्रयत्न एनगिडीने केला होता, मात्र त्याचा प्रयत्न अपयशी ठरला. तो जोरात डोक्यावर आदळला. त्यामुळे मेडिकल स्टाफ मैदानात आला असता सामना १०-१५ मिनिटांसाठी थांबवला गेला. त्याला स्ट्रेचरवर नेत त्वरित रुग्णालयात दाखल केले.
त्या सामन्यात एनगिडीच्या जागी विप्रज निगम क्षेत्ररक्षणासाठी आला. डीसीने सुरुवातीला पाच पूर्व-घोषित बदली खेळाडूंपैकी श्रीलंकेचा दुशमंथा चमीरा याला बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरवले होते. न्गिडी मैदानात उतरल्याने डीसीचा चार परदेशी खेळाडूंचा कोटा पूर्ण झाल्यामुळे त्याला तात्काळ बाहेर बोलावण्यात आले.
त्याच्या दुखापतीमुळे डीसीच्या वेगवान गोलंदाजी विभागाला धक्का बसला आहे, आधीच त्यांचा एक खेळाडू सुरूवातीच्या काही सामन्यांना मुकला आहे. मिचेल स्टार्क क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या फिटनेस चाचण्यांमुळे हंगामातील सुरूवातीच्या सामन्यात खेळू शकला नाही. तो आता संघात सामील झाला असून १ मे पासून निवडसाठी उपलब्ध असणार आहे.






