इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ चा हंगाम येत्या २८ मार्चपासून सुरु होत आहे. यामधील पहिला सामना गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद असा होणार आहे. माजी क्रिकेटपटू आर अश्विनने आरसीबीच्या अंतिम अकरा निवडताना सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. त्याने ७ कोटी रुपयांच्या अष्टपैलू खेळाडूला वगळून टी२० विश्वचषकात चमकदार कामगिरी करत इंग्लंडला एकट्यानेच तारणाऱ्या खेळाडूला घेतले आहे.
अश्विनने रुपयांच्या व्यंकटेश अय्यरला पहिल्या सामन्याच्या अंतिम अकरामधून वगळले आहे. त्याला मागील वर्षी झालेल्या लिलावामध्ये ७ कोटी रुपयांना संघात घेतले होते. २०२५च्या हंगामात त्याने निराशाजनक कामगिरी केली होती. अश्विनने त्याच्या जागी इंग्लंडचा युवा फलंदाज जेकब बेथेलला घेतले आहे. त्याने टी२० विश्वचषक २०२६ च्या उपांत्य सामन्यात भारताविरुद्ध ४५ चेंडूत शतकी खेळी केली होती.
अश्विनने त्याच्या युट्युब चॅनलवर आरसीबीची संभाव्य प्लेइंग इलेवन सांगितली. त्यामध्ये तो म्हणाला, “विराट कोहली, फिल सॉल्ट, जेकब बेथेल, रजत पाटीदार, जितेश शर्मा, टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, मंगेश यादव, यश दयाल आणि सुयश शर्मा.”
आरसीबीला या हंगामाच्या सुरूवातीला स्टार वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडची उणीव भासणार आहे. तो दुखापतीमुळे पहिल्या सामन्यात खेळणार नाही. मागील हंगामात संघाला विजेतेपद जिंकून देण्यात त्याने महत्वाची भुमिका पार पाडली होती. त्याला ऑस्ट्रेलियाच्या स्थानिक शेफिल्ड शील्ड स्पर्धेवेळी दुखापत झाली होती. यामुळे तो टी२० विश्वचषक २०२६ मधूनही बाहेर झाला होता.
हेझलवूडची जागा कोण घेणार? या प्रश्नाचे उत्तर देताना अश्विन म्हणाला, “त्यांच्याकडे यश आहे, जर तो संघात नसता तर कठिण झाले असते. आरसीबीकडे बेथेल असून त्याला अंतिम अकरामध्ये समाविष्ट केलेच पाहिजे. पहिल्या सामन्यात बेथेल, जेकब डफी आणि मंगेश यादव यांच्यात स्पर्धा दिसेल.”
गतविजेता संघ २०२६ च्या हंगामात कशी सुरूवात करतो, याकडे चाहत्यांचे लक्ष असणार आहे. तसेच आरसीबीचा पहिला सामना घरच्या मैदानावर एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. मागील वर्षी झालेल्या चेंगरा-चेंगरीच्या घटनेमुळे कर्नाटक राज्य सरकारने स्टेडियमच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला आणि संघाला खेळण्यास परवाणगी दिली.






