आयपीएल २०२६ चा क्वालिफायर १ सामना मंगळवारी (२६ मे) खेळला गेला, ज्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गुजरात टायटन्सचा ९२ धावांनी पराभव केला. या सामन्यात जीटीचा सलामीवीर साई सुदर्शन हिट विकेट बाद झाला. आयपीएलच्या इतिहासात अनेक खेळाडू अशा पद्धतीने बाद झाले आहेत, मात्र सुदर्शनने एक नकोश्या विक्रमाची आपल्या नावावर नोंद केली आहे. तो आपल्या संघाला चांगली सुरूवात करून देण्यात अपयशी ठरला.
जीटीची फलंदाजी मोठ्या प्रमाणात त्यांच्या सलामीच्या जोडीवर अवलंबून असते. क्वालिफायर १ मध्ये २५५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आणि ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आघाडीवर असणारे सुदर्शन आणि शुबमन गिल मात्र या सामन्यात स्वस्तात तंबूत परतले. यावेळी सुदर्शन ज्याप्रकारे बाद झाला ते पाहून गिलही आश्चर्यचकित झाला.
जीटीच्या डावातील तिसऱ्या षटकात हे घडले. जेकब डफी गोलंदाजी करत होता. षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर सुदर्शनने कट शॉट खेळला, जो सीमारेषेबाहेर गेला आणि त्याच्या हातातून बॅट निसटली. त्याने चेंडू स्टम्प्सला लागणार नाही याची काळजी घ्यायला हवी होती, मात्र त्याऐवजी तो धावला आणि निसटलेली बॅट स्टम्प्सला लागली. त्यामुळे तो हिट विकेट बाद झाला. त्याचबरोबर तो आयपीएलच्या इतिहासात दोनदा हिट विकेट पद्धतीने बाद होणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे. या सामन्यात त्याने ९ चेंडूंत १४ धावा केल्या.
सुदर्शन २०२२ मध्ये पहिल्यांदा हिट विकेट बाद झाला होता. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या त्या सामन्यात कायरन पोलार्डने सुदर्शनला एक बाउन्सर टाकला. त्याने पूल शॉट मारण्याचा प्रयत्न केला, मात्र तो फसला. त्यावेळी त्याची बॅट स्टम्प्सला लागली आणि बाद झाला.
आयपीएलच्या पहिल्या हंगामात म्हणजे २००८ मध्ये मुंबई इंडियन्सचा मुसाविर खोटे हिट विकेट पद्धतीने बाद होणारा पहिला खेळाडू ठरला होता.






