---Advertisement---

‘नेतृत्वामुळे ऋतुराजच्या फलंदाजीची लय बिघडली’! सीएसकेच्या माजी खेळाडूचा दावा

On: मंगळवार, मे 19, 2026 1:21 PM
---Advertisement---

आयपीएल २०२६ हंगाम शेवटाला आला आहे. यासाठी आयपीएल २०२६ मध्ये पाच वेळेच्या विजेत्या संघांची कामगिरी म्हणावी तशी झाली नाही. मुंबई इंडियन्स तर आधीच बाहेर झाला असून चेन्नई सुपर किंग्जच्याही प्लेऑफच्या आशा खूपच कमी आहे. सोमवारी (१८ मे) चेन्नई सुपर किंग्जने या हंगामातील त्यांचा घरचा शेवटचा सामना खेळला. या सामन्यात ते विजयी होतील आणि प्लेऑफच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकतील असे वाटत असताना विरोधी संघाने त्यांच्या या आशेवर पाणी फेरले. सनरायझर्स हैद्राबादने हा सामना ५ विकेट्सने जिंकला. या संपूर्ण हंगामात सीएसकेचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने निराशाजनक कामगिरी केली. नेतृत्वाच्या दबावामुळे त्याच्या फलंदाजीवर परिणाम झाला, असे मत दिग्गजाने व्यक्त केले आहे.

चेपॉकवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात सीएसकेच्या पराभवानंतर आर अश्विनने जिओस्टारवर बोलताना म्हटले की, फ्रॅंचायजी पुनर्रचनेच्या टप्प्यातून जात आहे आणि धोनीच्या काळात संघाने जी कामगिरी केली त्यामुळे सीएसकेकडून अधिक अपेक्षा केली जात आहे.

“धोनीनंतरच्या काळात चेन्नई सुपर किंग्ज स्पष्टपणे स्थित्यंतराच्या टप्प्यात आहे. चाहते, हितधारक आणि संघ या सर्वांनी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की संघाची पुनर्बांधणी करण्यास अधिक वेळ लागतो. मागील यशांमुळे प्रचंड अपेक्षा आहे, मात्र संघाला पुन्हा विकसित होण्यासाठी अवकाश आणि संयमाची आवश्यकता आहे”, असे अश्विन म्हणाला आहे.

सामन्याची स्थिती पाहिली तर सीएसकेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी केली आणि ऋतुराज पुन्हा एकदा फलंदाजीवेळी धावा करण्यात अपयशी ठरला. त्याला पॅट कमिन्सने १५ धावेवर (२१) बाद केले. त्याच्या या कठीण खेळीनंतर अश्विनने वरील मत मांडले आहे.

ज्या खेळपट्टीवर अचूक टायमिंग साधणे आव्हानात्मक होते, तरीही बाकी फलंदाजांनी चांगली कामगिरी केली, मात्र ऋतुराज पुन्हा एकदा लयहीन दिसला. त्याच्या तुलनेत इतर फलंदाजांनी जलद गतीने धावा केल्या. “कर्णधारपदाच्या वाढीव जबाबदारीचा परिणाम ऋतुराजच्या फलंदाजीवर झाल्याचे दिसते. टी२० क्रिकेट आधीच खूप दमवणारे आहे आणि त्यातच सीएसकेसारख्या फ्रॅंचायजीच्या अपेक्षांसोबत नेतृत्वाच्या ओझ्याचा मोठा परिणाम खेळाडूवर होऊ शकतो”, असेही अश्विनने पुढे म्हटले आहे.

या हंगामात ऋतुराजची कामगिरी पाहिली तर त्याने १३ सामने खेळताना २९.१८ च्या सरासरीने आणि १२०.६८ च्या स्ट्राईक रेटने ३२१ धावा केल्या आहेत. यामध्ये दोन अर्धशतकांचा समावेश आहे.

या सामन्यात सीएसकेने २० षटकांत ७ विकेट्स गमावत १८० धावा केल्या. प्रत्युत्तरात एसआरएचने इशान किशनच्या धमाकेदार खेळीने १९ षटकांत ५ विकेट्स गमावतच लक्ष्य पार केले आणि ते प्लेऑफसाठी पात्र ठरले. किशनने ४७ चेंडूंत ७ चौकार आणि ३ षटकारांच्या सहाय्याने ७० धावा केल्या.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---