भारताचा फिरकीपटू वरुण चक्रवर्ती याने त्याच्या कारकिर्दीच्या सर्वात त्रासदायक टप्प्याचा खुलासा केला आहे. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२१ च्या हंगामावेळी त्याची कोविड-१९ ची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला ज्या टीकांचा आणि अपमानाचा सामना करावा लागला, याबद्दल त्याने सांगितले आहे. तो पॉझिटिव्ह आढळल्याने आयपीएलचे सामने थांबवले गेले आणि लीग रद्द झाल्याने अनेकांनी त्याला दोष दिला होता.
कोरोनाच्या संसर्गामुळे त्यावेळी अनेकांना त्रास झाला. भारतासह जगभरातील लोक घरांमध्ये बंदिस्त होते. अनेक देशांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. त्याचा परिणाम आयपीएलवरही झाला होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भारतात कोविड-१९ च्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत होती, त्यामुळे २०२१ चा आयपीएल हंगाम बायो-बबलमध्ये आयोजित केला गेला. तरीही खेळाडूची टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) तो हंगाम मध्येच थांबवावा लागला होता. तेव्हा २९ सामने खेळून झाले होते.
लीगचा ३०वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात अहमदाबादमध्ये खेळवला जाणार होता, मात्र कोलकाताचे दोन खेळाडू वरुण आणि संदीप वॉरियर यांना कोरोनाची लागण झाली आणि सामना पुढे ढकलावा लागला.
वरुणला तेव्हा खांद्याची दुखापत झाली होती आणि त्यामुळेच तो स्कॅनिंगसाठी बाहेर पडला. तेव्हा तो अधिक काळजीने हॉस्टिपलमध्ये दाखल झाला, मात्र तरीही त्याला कोरोनाची लागण झाली. त्यानंतर त्याला आलेल्या धमक्यांचा त्याने खुलासा केला आहे.
वरुणने ‘जर्नी टू जर्सी’ या युट्यूब चॅनलच्या कार्यक्रमामध्ये सांगितले, “मला कोविड झाल्यामुळे २०२१ ची आयपीएल थांबवण्यात आली, ती सर्वात वाईट बाब होती. कोरोनाच्या टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आलेला मी पहिला खेळाडू होतो आणि अनेक लोक मला शिव्या देत होते, कारण तेव्हा त्यांच्यासाठी आयपीएल हेच एक मनोरंजनाचे साधन होते. तेच थांबल्याने लोक खूप संतापले आणि म्हणाले, तू मरून का जात नाहीस? ते खूपच वाईट होते.”
या कठिण प्रसंगानंतरही वरुण कोलकाताचा महत्वाचा खेळाडू राहिला. त्याने मागील हंगामात १७ विकेट्स घेतल्या. तेव्हा तो सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत सातव्या स्थानावर राहिला होता. तसेच त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत ८३ सामने खेळले असून १०० विकेट्सचा टप्पा गाठला आहे.
वरुणने नुकत्याच पार पडलेल्या आयसीसी टी२० विश्वचषकत २०२६ मध्ये १४ विकेट्स घेतल्या आहेत, मात्र त्याचा इकॉनॉमी रेट अधिक राहिला (९.२५). आता तो आयपीएलच्या नव्या हंगामात कशी कामगिरी करणार याकडे लक्ष असणार आहे.
आयपीएल २०२१चा पहिला टप्पा ९ एप्रिल ते ४ मे या दरम्यान भारतात खेळण्यात आला होता मात्र, संघांच्या ‘बायो-बबल्स’मध्ये कोविड-१९ च्या रुग्णांमध्ये वाढ झाल्यामुळे ते स्थगित करण्यात आले. त्यानंतरचा टप्पा म्हणजे उर्वरित ३१ सामने संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) हलवण्यात आले. ते १९ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर २०२१ यादरम्यान खेळवले गेले. चेन्नई सुपर किंग्जने तो हंगाम जिंकला होता.





