भारताचा वेगवान गोलंदाज यश दयाल याने आगामी देशांतर्गत हंगामापूर्वी उत्तर प्रदेश संघाची साथ सोडण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. आता तो छत्तीसगड संघाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळताना दिसणार आहे. ‘क्रिकइन्फो’च्या वृत्तानुसार, दयाल सध्या उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनकडून ‘ना-हरकत प्रमाणपत्र’ (NOC) मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे. त्याने कर्नाटकच्या अलूर येथील छत्तीसगडच्या प्री-सीझन शिबिरात आधीच सहभाग नोंदवला आहे.
आयपीएल 2025च्या अंतिम सामन्यानंतर यश दयालने एकही स्पर्धात्मक सामना खेळलेला नाही. त्याच्यावर दाखल झालेल्या लैंगिक छळाच्या प्रकरणामुळे तो क्रिकेटपासून दूर राहिला होता. असे असूनही, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) ने त्याला पुढील हंगामासाठी संघात कायम ठेवले होते. मात्र, तो संघात सामील झाला नाही आणि संपूर्ण हंगाम खेळापासून दूर राहिला. त्यावेळी आरसीबीचे क्रिकेट संचालक मो बोबाट यांनी म्हटले होते की, “दयालची वैयक्तिक परिस्थिती पाहता, त्याला संघात कायम ठेवणे हे दोन्ही पक्षांच्या हिताचे नव्हते.”
यश दयालने उत्तर प्रदेश संघ सोडण्यामागे ‘यूपी टी-20 लीग’ हे एक मुख्य कारण मानले जात आहे. आगामी स्पर्धेसाठी ‘गोरखपूर लायन्स’ने त्याला कायम ठेवले होते. त्याने सरावालाही सुरुवात केली होती. मात्र, लिलावानंतर जाहीर करण्यात आलेल्या 18 सदस्यांच्या संघात त्याचे नाव नसल्यामुळे त्याने छत्तीसगडला जाण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. बीसीसीआयच्या नियमांनुसार, एकदा एनओसी (NOC) मिळाली की, खेळाडूला आपल्या मूळ राज्याव्यतिरिक्त इतर राज्याच्या टी-20 लीगमध्ये खेळण्यात कोणतीही अडचण येत नाही.
दरम्यान, भारताचा अनुभवी ऑफ-स्पिनर जयंत यादव आणि सौराष्ट्रचा अष्टपैलू खेळाडू धर्मेंद्रसिंह जडेजा हे देखील छत्तीसगडच्या प्री-सीझन शिबिरात सामील झाले आहेत. छत्तीसगड क्रिकेट संघाने भारताचा माजी फलंदाज अमय खुरासिया याची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली असून, सध्या त्याच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर सुरू आहे.




