भारतीय वरिष्ठ पुरुष क्रिकेट संघ ऑगस्ट महिन्यात श्रीलंकेचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार असून, ती आयसीसी कसोटी अजिंक्यपद 2025-27 (WTC) चा भाग आहे. यामुळे भारताला या मालिकेत चांगली कामगिरी करणे अपेक्षित आहे. यासाठी भारताच्या संघनिवडीसाठी स्टार अष्टपैलू फिट आणि उपलब्ध असल्याची मोठी बातमी समोर येत आहे.
अनुभवी फिरकीपटू आणि स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा फिट घोषित झाला आहे. यामुळे तो श्रीलंका दौऱ्यासाठी उपलब्ध आहे. त्याला आयपीएल 2026 दरम्यान दुखापत झाली होती आणि मे महिन्यापासून तो मैदानाबाहेर होता. त्याने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याने तो भारतासाठी केवळ वनडे आणि कसोटी प्रकारामध्ये खेळतो. तो भारतासाठी शेवटी जानेवारी 2026 मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सामन्यात खेळला होता.
जडेजा आता उपलब्ध असल्याने भारताच्या संघनिवड समितीची डोकेदुखी काही प्रमाणात कमी झाली आहे. त्यात वॉशिंग्टन सुंदर दुखापतग्रस्त असून श्रीलंका दौऱ्यासाठी जडेजाची निवड होण्याची दाट शक्यता आहे. जडेजा अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमात्र कसोटी सामन्याला दुखापतीमुळे मुकला होता. तसेच नितीश कुमार रेड्डी आणि हर्षित राणा यांच्या फिटनेसचा प्रश्न मात्र कायम आहे.
श्रीलंकेच्या संघात डावखुरे फलंदाज अधिक असल्याने निवड समिती सारांश जैनचा विचार करू शकते. त्याने गॉल येथे श्रीलंका ए विरुद्धच्या दुसऱ्या चार दिवसीय सामन्यात प्रभावी कामगिरी केली होती. त्याने पहिल्या डावात सहा विकेट्स घेत नाबाद 70 धावाही केल्या होत्या.
सुंदरला इंग्लंड दौऱ्यावेळी पायाची दुखापत झाली होती. यामुळे तो इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्याला मुकला होता. आता तो श्रीलंका दौऱ्यातील पहिल्या कसोटी सामन्यासाठीही अनुपलब्ध आहे, तर दुसऱ्या कसोटीसाठीची उपलब्धता त्याच्या फिटनेसवर अवलंबून आहे.
श्रीलंकाविरुद्धचा पहिला कसोटी सामना 15 ते 19 ऑगस्टदरम्यान गॉल येथे आणि दुसरा कसोटी सामना 23 ते 27ऑगस्टदरम्यान कोलंबो येथे खेळला जाणार आहे. (Ravindra Jadeja is fit & available for the two match Test series vs Sri Lanka)






