fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

विशेष लेख: खरंच गेल्या १२ वर्षात आयपीएलमुळे एकंदरीतच आयुष्य, क्रिकेट खूप(च) बदलून गेलं नै

IPL: Abiding memories of the cash-rich league over 12 editions

– वरद सहस्रबुद्धे

आयपीएल स्पर्धेला एक तप पूर्ण होत आहे. बारा वर्षांपूर्वी एका दिमाखदार सोहळ्याचा पडदा उघडला.. १८ एप्रिल, २००८ या दिमाखदार सोहळ्याची नांदी गायली गेली आणि मुख्य गायक होता ब्रॅंडन मॅक्युलम. त्यादिवशी तो जे काही खेळला ते अफाट, शब्दात न मांडता येणारं होतं.. १५८ धावा. या धावा त्याकाळात म्हणजे 2008 च्या आसपास कधीकधी संपूर्ण संघाच्या मिळूनपण निघत नसत. त्यामुळे केवळ एका फलंदाजाने एवढी मोठी धावसंख्या तीसुद्धा टी20 सारख्या छोट्या खेळ प्रकारात काढणं ही गोष्ट क्रिकेट जगतासाठी आणि चाहत्यांसाठी थक्क करणारी होती. यानंतर सीजन दर सीजन वर्षात दोन चार ग्रहणं जशी होतात तशी शतकंही लागायला लागली आणि दोनशेपल्याड धावसंख्या जायला लागली आणि ती चेस सुध्दा व्हायला लागली. त्यामुळे त्या शतकांचं,त्या रन चेसेसचं अप्रुप राहिलेले नाही.

आयपीएल चांगलं की वाईट किंवा आयपीएलमुळे ‘खरं क्रिकेट’ लोप पावत चाललंय असे अनेक चांगले-वाईट, योग्य- अयोग्य प्रश्न चर्चिले जातात. पण विविध आर्थिक, सामाजिक कारणांमुळे म्हणा हवं तर आज  आयपीएल मॉडेल हे क्रिकेट खेळणाऱ्या बहुतांश देशात पोहोचलं आहे. श्रीशांतने मिस्बाहचा झेल घेतला नसता तर कदाचित हे मॉडेल यशस्वी झालं पण नसतं. ऑस्ट्रेलियात हे मॉडेल बिग बॅश लीग, बांगलादेशमध्ये बांगलादेश प्रीमियर लीग, वेस्टइंडीज मध्ये कॅरिबियन प्रीमियर लीग इ. नावाने ओळखले जाते. गेली दहा वर्ष आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडूंना बंदी असली तरी पीसीबीला पाकिस्तान सुपर लीग हा फॉरमॅट खेळवण्याचा मोह आवरता आला नाही. गमतीचा भाग असा की लोकांना काही वेळेला त्या त्या विदेशी लीगची नाव माहीत नसतात किंवा लक्षात नसल्यामुळे ते लोक अमक्या देशाची आयपीएल(उदा- कॅरिबियन प्रीमियर लीगला वेस्टइंडीजची आयपीएल म्हणतात.)

Photo Courtesy: Twitter/IPL

आयपीएलच्या एक-दोन वर्षे अगोदर आयसीएल (इंडियन क्रिकेट लीग) स्पर्धा खेळली गेली होती शिवाय या स्पर्धेला बीसीसीआयची मान्यता नव्हती. आयसीएल खेळणाऱ्या, खेळलेल्या खेळाडूला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी बंदी होती. आता ती उठवली आहे. मोदी है तो मुमकिन है हे वाक्य आयपीएलच्या एकंदर प्रवासात, एकंदर जडणघडणीत फार महत्त्वाचा आहे, कारण आयपीएलची संकल्पना ज्या माणसाच्या सुपीक डोक्यातून आली तो म्हणजे ललित मोदी. याने भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा बदलला. भारतीय केरी पॅकरच जणू. कालांतराने आयपीएल मध्ये ‘त्या’ बंदी घातलेल्या खेळाडुंना खेळण्याची संधी मिळाली. स्टुअर्ट बिन्नी, अंबाती रायडू, अली मुर्तझाअसे अनेक आयसीएल खेळलेले कालांतराने आयपीएलमध्ये सहभागी झाले.

Photo Courtesy: Twitter/ MIPaltan

आयपीएल तपपूर्तीमध्ये सुध्दा बॉलर जमातीवर न लिहणं हा अन्याय ठरेल. काही ज्या चुकीच्या गोष्टी घडल्यात त्यात बॉलरचं महत्व कमी होण्यात आयपीएलचा वाटा अधिक आहे. आयपीएलमुळे बॉलर अधिक गरीब झाले आहेत. बॉलर मार खातात ते आपण खेळाचा भाग समजुया हवं तर, पण त्यांना मैदानाबाहेर त्या कीबोर्ड वॉरियर्स, फोटोशॉप रेंजर्स यांच्याशी मुकाबला करावा लागतो तो वेगळाच. आणि हे दुसरं युद्ध निपटणं, युध्दाचा सामना करणं त्यांना अधिक कठीण होऊन बसतं मग एखाद्या अशोक दिंडाला किंवा एखाद्या विनय कुमारला आपल्या फस्ट क्लास/इंटरनॅशनल लेव्हलचे ब्रह्मास्त्ररूपी stats फेकून मारावे लागतात. फरक काही पडत नाही, पण मनाचं समाधान लाभत असावं त्यांना असो. हे असे बॉलर जरी असले तरी मलिंगा, नारायण, रशीद खानसख्या बॉलर्सनी अनेकदा आपल्या गोलंदाजीवर सामन्याचे निकाल बदलले आहेत आणि आश्चर्याची बाब म्हणजे युवराज सिंग, रोहित शर्मासारख्या पार्ट टाईमर्सनी हॅट्रिक घेतल्यात.

क्रिकेट + एंटरटेनमेंट असं दोन्ही मिळून क्रिकेटेनमेंट नावाचं पॅकेज लोकांना मिळालं आहे. मग त्यात चीअरलीडर्सपासून शिबानी-मयंतीचं एन्करिंग ऊटफिट्स लूक सगळं सगळं आलं. सिध्दुच्या विनोदी शायरीने एक्स्ट्रा इनिंग आणखी मजेदार व्हायची. ट्रेलर लॉंच होतो तसं वेगवेगळ्या थीम सॉंगमुळे माहोल तयार व्हायचा, होत आहे. तीन तासांचा सिनेमा बघितल्यासारखा लोकं आयपीएल एंजॉय करू लागले किंवा करताहेत. मित्र-नातेवाईक एकत्र बघून सामन्याचा आनंद लुटतात. आनंद घेणं हा प्रकार आहेच पण आज अनेक लहान-मोठ्या फेरीवाले बांधवांच्या घरी चूल पेटते. अनेक लोक उद्योग या काळात नफा कमवतात. सध्या आयपीएल होणं कठीण वाटतंय, या लोकांचं नुकसान मोठ्या प्रमाणावर होणार आहे.

Photo Courtesy: Twitter/ChennaiIPL

१२ वर्षात आयपीएलवर अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. चेन्नई-राजस्थान सारख्या टीमला त्यांच्या चुकीच्या शिक्षा मिळाल्या. कोची टस्कर्स केरळ कधी आले कधी गेले कळलंच नाही. गांगुली- तेंडुलकर-सेहवाग- द्रविड -कुंबळे ह्या भारतीय दिग्गजांनी आयपीएलची कैप्टनसी केली. आज ते निवृत्त खेळाडू आहेत..( धोनी फक्त कॉन्टेस्ट आहे दोन्ही पिढ्यांत) गिलक्रिस्ट, हेडन, ली, दिलशान,संगा, अख्तर, इथे मैदान गाजवून गेले. वेगवेगळ्या टीमच्या जर्सी बदलल्या. कलर बदलले. आयपीएलच्या पहिल्या सीजनला शाळेत जाणारे आता जॉबला लागलेत (काही उच्चशिक्षण घेत आहेत) काही वैवाहिक जीवनात भागीदारी रचत आहे.

खरंच गेल्या १२ वर्षात एकंदरीतच आयुष्य, क्रिकेट खूप(च) बदलून गेलं नै..

आयपीएल स्पर्धेवरील काही खास लेख

जगातील टाॅप ५ श्रीमंत क्रिकेट लीग, जिथे क्रिकेटर्स होतात करोडपती

आयपीएलच्या संघमालकांची यादी; चेन्नईच्या मालकाचे नाव ऐकून थक्क व्हाल…

आयपीएल इतिहासातील हे आहेत ५ मोठे वाद, ज्यामुळे आयपीएलच नाव झालं खराब

आयपीएलच्या ट्राॅफीवर संस्कृत भाषेत नक्की काय लिहीले आहे?

या दोन संघांनी आयपीएलमध्ये बदलले आहेत तब्बल ११ कर्णधार

आयपीएलचे तब्बल ११ हंगाम एकाच संघाकडून खेळलेला तो एकमेव खेळाडू

 

You might also like