१२ वर्षांपूर्वी इंडियन प्रीमीयर लीगला सुरुवात झाली. त्यानंतर आत्तापर्यंत या १२ वर्षांमध्ये आयपीएलने जगभरात मोठी लोकप्रियता मिळवली. जगातील एक सर्वोत्तम क्रिकेट लीग म्हणून आयपीएलकडे आता पाहिले जाते. आयपीएलमध्ये आत्तापर्यंत अनेक क्रिकेटपटू खेळले. यातील अनेक क्रिकेटपटूंनी मोठे विक्रम केले. तर अनेक दिग्गज खेळाडू मात्र आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करण्यात अपयशी ठरले.
या लेखात अशाच आयपीएलमधील अपयशी ठरलेल्या ११ खेळाडूंचा आढावा घेणार आहोत.
१. सौरव गांगुली (कर्णधार) –
भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली जेवढा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यशस्वी ठरला, तेवढी प्रभावी कामगिरी तो आयपीएलमध्ये करु शकला नाही. तो आयपीएलमध्ये पहिले ३ मोसम कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळला. त्यावेळी त्याने २ मोसमात कोलकाताचे नेतृत्वही केले.
त्यानंतर २०११ ला त्याला खेळाडूंच्या लिलावात कोणीही खरेदी केले नाही. पण त्याचवेळी आयपीएलमध्ये नव्याने सामील झालेल्या पुणे वॉरियर्स संघाचा गोलंदाज आशिष नेहरा दुखापतग्रस्त झाल्याने त्यांनी गांगुलीला संघात घेतले. २०१२ मध्ये गांगुलीने या संघाचे नेतृत्वही केले. पण त्याला आयपीएलमध्ये नेतृत्व करताना एकदाही त्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संघाला प्लेऑफमध्ये घेऊन जाता आले नाही.
त्याने आयपीएलमध्ये ५९ सामने खेळले यात २५.४५ च्या सरासरीने १३४९ धावा केल्या. यात त्याने ७ अर्धशतके केली. याव्यतिरिक्त त्याने १० विकेट्सही घेतले.
२. व्हीव्हीएस लक्ष्मण –
भारताला अनेकदा विजय मिळवून देणारा व्हीव्हीएस लक्ष्मण आयपीएलमध्ये मात्र चमक दाखवू शकला नाही. तो आयपीएलमध्ये डेक्कन चार्जर्स आणि कोची टस्कर्स केरळकडून खेळला. तो पहिल्या मोसमात डेक्कन चार्जर्स संघाचा कर्णधारही होता. त्यावेळी डेक्कन चार्जर्स गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर राहिले होते.
लक्ष्मणने आयपीएलमध्ये २० सामने खेळले आहेत. यात त्याला १४.८४ च्या सरासरीने १ अर्धशतकासह २८२ धावाच करता आल्या.
३. केविन पीटरसन –
२००९ मध्ये केविन पीटरसन आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. त्याला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने खेरेदी केले होते. केविन पीटरसन बेंगलोर व्यतिरिक्त दिल्ली डेअरडेविल्स, रायझिंग पुणे सुपर जायंट्सकडूनही खेळला. पण पीटरसनला आयपीएलमध्ये म्हणावी तशी खास कामगिरी करता आली नाही.
तो आयपीएलमध्ये ३६ सामने खेळला. यात त्याने ३७.०७ च्या सरासरीने १००१ धावा केल्या. यात त्याच्या ४ अर्धशतकांचा आणि १ शतकाचा समावेश आहे. त्याचबरोबर त्याने गोलंदाजी करताना ७ विकेट्सही घेतल्या आहेत. पीटरसन आयपीएलमध्ये शेवटचे रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाकडून २०१६ मध्ये खेळला.
४. रॉस टेलर –
न्यूझीलंडचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज रॉस टेलर आयपीएलमध्ये २०१४ पर्यंत ४ संघांकडून खेळला. तो रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, राजस्थान रॉयल्स, पुणे वॉरियर्स इंडिया आणि दिल्ली डेअरडेविल्स अशा चार संघांकडून खेळला. अजूनही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सक्रिय असलेल्या टेलरला आयपीएलमध्ये खास छाप पाडता आली नाही. त्याने आयपीएलमध्ये ५५ सामने खेळताना २५.४२ च्या सरासरीने ३ अर्धशतकांसह १०१७ धावा केल्या.
५. मोहम्मद कैफ –
भारताचा सर्वोत्तम फलंदाज म्हणून ओळखला जाणाऱ्या मोहम्मद कैफलाही आयपीएलमध्ये प्रभावी कामगिरी करता आली नाही. असे असले तरी तो आयपीएलच्या पहिल्या मोसामाचे विजेतेपद मिळवलेल्या राजस्थान रॉयल्सचा भाग राहिला आहे. तो नंतर किंग्स इलेव्हन पंजाब, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडूनही खेळला.
त्याने आयपीएलमध्ये एकूण २९ सामने खेळले. यात त्याला केवळ १४.३८ च्या सरासरीने २५९ धावा कता आल्या. २०१२ नंतर तो आयपीएलमध्ये खेळलेला नाही.
६. अँजेलो मॅथ्यूज –
श्रीलंकेचा माजी कर्णधार अँजेलो मॅथ्यूज आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स, दिल्ली डेअरडेविल्स आणि पुणे वॉरियर्स इंडिया या संघांकडून खेळला आहे. तो २०१७ ला दिल्लीकडून शेवटचा आयपीएल सामना खेळला. त्याने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत ४९ सामने खेळले. त्यात त्याने २३.३५ च्या सरासरीेने १ अर्धशतक करत ७२४ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने २७ विकेट्स घेतल्या आहेत.
७. नमन ओझा (यष्टीरक्षक) –
यष्टीरक्षक फलंदाज नमन ओझा आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स, सनरायझर्स हैद्राबाद, दिल्ली कॅपिटल्स अशा संघांकडून खेळला. तो आयपीएलमध्ये २०१८ मध्ये शेवटचा खेळला. त्याने ११३ आयपीएल सामने खेळताना २०.७२ च्या सरासरीने १५५४ धावा केल्या. त्याचबरोबर यष्टीरक्षण करताना ६४ झेल आणि १० यष्टीचीत केले आहेत.
८. टीम साऊथी –
न्यूझीलंडचा एक यशस्वी गोलंदाज म्हणून नाव कमावलेल्या टीम साऊथीची आयपीएलमधील कामगिरी मात्र निराशाजनक राहिली आहे. तो मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स, राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या संघांकडून खेळला आहे. त्याने आत्तापर्यंत ४० सामने आयपीएलमध्ये खेळले आहेत. त्यात त्याला केवळ २८ विकेट्स घेण्यातच यश आले आहे.
९. शादाब जकाती –
फिरकी गोलंदाज शादाब जकातीने चेन्नई सुपर किंग्सकडून २००९ ते २०१२ या ४ मोसमात ५० सामने खेळले. त्यानंतर तो रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि गुजरात लायन्स संघाकडूनही खेळला. तो २०१७ ला गुजरात लायन्सकडून शेवटचा खेळला आहे.
जकाती आयपीएलमध्ये सुरुवातीला यशस्वी ठरला होता. पण त्याची कामगिरी नंतर खालावत गेली. त्याने आयपीएलमध्ये ५९ सामन्यात ४७ विकेट्स घेतल्या. यातील ४५ विकेट्स त्याने चेन्नईकडून खेळताना घेतल्या आहेत.
१० मुरली कार्तिक –
भारताचा माजी फिरकीपटू मुरली कार्तिक आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स, पुणे वॉरियर्स इंडिया, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, किंग्स इलेव्हन पंजाब या संघाकडून खेळला आहे. त्याने आयपीएलमध्ये ५६ सामने खेळताना केवळ ३१ विकेट्सच घतल्या. तो २०१४ मध्ये आयपीएलमध्ये शेवटचे खेळला आहे.
११. अशोक डिंडा –
भारतीय संघाचा गोलंदाज आयपीएलमध्ये अनेक संघांकडून खेळला आहे. यात कोलकाता नाईट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, दिल्ली डेअरडेविल्स, पुणे वॉरियर्स इंडिया आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्स या संघांचा समावेश आहे. त्याने आयपीएलमध्ये ७८ सामने खेळले पण त्याला केवळ ६८ विकेट्स घेता आल्या.
ट्रेंडिंग घडामोडी –
षटकार- चौकार मारले म्हणून एमएस धोनी झाला होता नाराज
भारतीय खेळाडू देशासाठी नाही तर स्वत: साठी खेळतात
टाॅप बातम्या: ५ अशा बातम्या ज्यांची क्रिकेटवर्तुळात आज आहे मोठी चर्चा