आयपीएल टी-२० स्पर्धेला २००८ मध्ये सुरुवात झाली. सध्या या जागतिक लोकप्रिय स्पर्धेचा १३ वा हंगाम युएईमध्ये सुरु आहे. या स्पर्धेत जगातील दिग्गज तसेच युवा खेळाडूही सहभागी होतात. आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत फलंदाजांनी आपले वर्चस्व गाजवले आहे. तसेच गोलंदाजांनी वेगळी छाप सोडली. तर काही खेळाडूंनी क्षेत्ररक्षणातूनही सर्वांना प्रभावित केले.
आयपीएलच्या या १३ वर्षाच्या कालखंडात अनेक विक्रमांची नोंद केली गेली. काही विक्रम मोडीत निघाले तर काही अजूनही अबाधित राहिले आहेत. या लेखात आयपीएलच्या इतिहासातील अशा विक्रमाची माहिती करून घेणार आहोत, ज्यांना मोडणे सहज शक्य नाही.
आयपीएलमध्ये एका सामन्यात सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू –
२३ एप्रिल २०१३ मध्ये एका वादळी खेळीची नोंद झाली होती. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळताना वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल याने नाबाद १७५ धावा केल्या होत्या. या सामन्यात गेलने फक्त ६६ चेंडूत १३ चौकार आणि १७ षटकार ठोकत ही विक्रमी धावसंख्या केली होती. गेलने हा पराक्रम पुणे वॉरियर्सविरुद्धच्या सामन्यात केला होता. आयपीएलच्या इतिहासात एका सामन्यात १७ षटकार मारण्याचा विक्रम आजही गेलच्या नावावर आहे. हा विक्रम अद्याप कोणाला मोडता आला नाही. तसेच या सामन्यात आयपीएलच्या इतिहासातील एक संघाकडून सर्वाधिक म्हणजे २६३ धावांचा विक्रम रचला गेला होता.
आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक षटकार –
युनिव्हर्सल बॉस’ नावाने प्रसिद्ध असणारा ख्रिस गेल हा आयपीएल इतिहासात सर्वाधिक षटकार मारणार फलंदाज आहे. गेलने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत १२६ सामन्यात ४५३७ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ३३१ षटकारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, आयपीएलमध्ये ३०० षटकारांचा आकडा पार करणारा तो एकमेव फलंदाज आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू –
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीने या स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे. कोहलीने १८५ सामन्यांच्या ५ शतके आणि ३८ अर्धशतकांच्या मदतीने ५७१६ धावा केल्या आहेत. तर दुसर्या क्रमांकावर चेन्नई सुपर किंग्जचा खेळाडू सुरेश रैना (५३६८) आणि तिसऱ्या क्रमांकावर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा (५११४) आहे.
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक –
२०१८ मध्ये केएल राहुलने दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध (आता दिल्ली कॅपिटल्स) तुफानी डाव खेळला आणि आयपीएलच्या इतिहासात आपले नाव नोंदवले. राहुलने अवघ्या १४ चेंडूत अर्धशतक ठोकले. राहुलचा हा रेकॉर्ड अजूनही कायम आहे आणि हा पराक्रम करून राहुलला पूर्ण दोन वर्ष झाली आहेत.
पीसीएच्या आयएसए बिंद्रा स्टेडियम मोहाली येथे दिल्ली संघाविरूद्धच्या सामन्यादरम्यान राहुलने ५१ धावांची तुफानी खेळी केली होती. त्या तुफानी खेळीत केएल राहुलने ४ षटकार आणि ६ चौकार लगावले होते. या अर्धशतकी डावासह राहुलने युसूफ पठाण आणि सुनील नरेनचा रेकॉर्ड मोडला होता. यूसुफने आणि सुनीलही या स्पर्धेमध्ये अवघ्या १५ चेंडूत अर्धशतक झळकावले होते .
आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक अर्धशतके झळकावणारा खेळाडू –
आयपीएलमध्ये सर्वाधिक अर्धशतक झळकावण्याचा विक्रम फलंदाज डेव्हिड वॉर्नरच्या नावावर आहे. वॉर्नरने आयपीएलमध्ये १३४ सामन्यात त्याने ४६ अर्धशतके झळकावली आहेत आणि त्या यादीमध्ये तो पहिल्या क्रमांकावर आहेत. डेव्हिड वॉर्नर सनरायझर्स हैदराबादचा तुफानी सलामीवीर फलंदाज आहे सोबतच कर्णधारही आहे. या अर्धशतकांसह वॉर्नरने आयपीएलमध्ये ४ शतकेही ठोकली आहेत. विशेष म्हणजे आत्तापर्यंत आयपीएलमध्ये ४० पेक्षा अधिक अर्धशतके करणारा तो एकमेव फलंदाज आहे.
आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक विजय मिळवणारा संघ –
४ वेळा आयपीएल विजेत्या मुंबई इंडियन्स संघाने आतापर्यंत १९४ सामने खेळले असून त्यात सर्वाधिक ११२ सामने जिंकले आहेत. तर ७९ सामने गमावले आहेत, तसेच ३ सामने बरोबरीत सुटले आहेत. त्यानंतर धोनीच्या चेन्नई संघाने १०३ सामन्यात विजय मिळवून दुसरे स्थान मिळवले आहे. तर कोलकात संघ ९६ विजयांसह तिसऱ्या स्थानी आहे.
आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक बळी मिळवणारा खेळाडू –
मुंबईच्या लसिथ मलिंगाने आयपीएलमध्ये १२२ सामन्यांत ७.१४ च्या इकॉनॉमीने १७० बळी मिळवले आहेत. त्यानंतर दिल्लीचा अमित मिश्रा (१६०) दुसर्या तर चेन्नईचा पियुष चावला (१५६) तिसर्या क्रमांकावर आहे. मलिंगाने यावेळी आयपीएलमधून माघार घेतली आहे. तसेच अमित मिश्रा दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर गेला आहे.
आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक झेल –
आयपीएलमध्ये सर्वाधिक झेल पकडण्याचा विक्रम भारताच्या सुरेश रैनाच्या नावावर आहे. या “मिस्टर आयपीएल” ने आयपीएलमध्ये १९३ सामने खेळले असून १०२ झेल पकडले आहेत. यावर्षी तो मैदानात खेळताना दिसत नाही, कारण त्याने या स्पर्धेतून माघार घेतली आहे.
आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक चौकार ठोकणारा खेळाडू –
आयपीएलमध्ये सर्वाधिक चौकार मारण्याचा विक्रम शिखर धवनच्या नावावर आहे. आतापर्यंत शिखरने १६७ सामन्यात ५४९ चौकार मारले आहेत. तर ४९७ चौकारांसह विराट कोहली दुसऱ्या तर सुरेश रैना ४९३ चौकारांसह तिसऱ्या स्थानावर आहे. रोहित शर्माने आतापर्यंत ४४६ चौकार मारले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
‘मला जाऊ द्या ना घरी’ लावणीवर विराटचा ठेका, पाहा जबरदस्त मीम्स
विराट पाजी तुस्सी छा गए! कोहलीने केला कुणालाही न जमलेला विक्रम
‘विराट- डिविलियर्सला आयपीएलने बॅन करावे’, पंजाबच्या धडाकेबाज खेळाडूचे वक्तव्य
ट्रेंडिंग लेख –
नवलंच! आयपीएल २०२०मधील ३ धडाकेबाज फलंदाजांमध्ये एकाही भारतीयाचा समावेश नाही
आयपीएल इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू टाकणारा एन्रीच नॉर्किए आहे तरी कोण?
आयपीएल २०२०: सर्वांच्याच नजरेत भरेल अशी कामगिरी करणारे ५ युवा क्रिकेटर