मुंबई। इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामातील ५१ व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स संघ आमने-सामने आले होते. ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबईने ५ धावांनी विजय मिळवला. अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात अखेरच्या षटकात गुजरातला ९ धावा करण्यात अपयश आले, त्यामुळे मुंबईने विजयावर शिक्कामोबर्तब केले. याबरोबरच मुंबईने एक खास विक्रमही केला आहे.
आयपीएलमध्ये (IPL) ५ किंवा त्यापेक्षा कमी धावांनी विजय मिळवण्याची मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) ही आठवी वेळ होती. त्यामुळे आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा ५ किंवा त्यापेक्षा कमी धावांनी विजय ( (Record of most win by 5 or less runs) मिळवणाऱ्या संघांमध्ये मुंबई इंडियन्स अव्वल क्रमांकावर आला आहे. त्यांनी पंजाब किंग्सला याबाबतीत मागे टाकले आहे. पंजाब किंग्सने सात वेळा ५ किंवा त्यापेक्षा कमी धावांनी विजय मिळवला आहे.
तसेच या विक्रमाच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स संयुक्तरित्या आहेत. त्यांनी प्रत्येकी सहा वेळा ५ किंवा त्यापेक्षा कमी धावांनी विजय मिळवला आहे. तसेच चेन्नई सुपर किंग्स चौथ्या क्रमांकावर असून त्यांनी पाचवेळा ५ किंवा त्यापेक्षा कमी धावांनी विजय मिळवला आहे.
अटीतटीच्या लढतीत मुंबईचा विजय
या सामन्यात (GT vs MI) गुजरातने नाणेफेक जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले होते. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ बाद १७७ धावा केल्या. त्यांच्याकडून इशान किशनने सर्वाधिक ४५ धावा केल्या. तसेच रोहितने ४३ धावांची खेळी केली, तर टीम डेव्हिडने आक्रमक खेळ करत नाबाद ४४ धावा ठोकल्या. गुजरातकडून राशिद खानने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.
त्यानंतर १७८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या गुजरातकडून वृद्धिमान साहा आणि शुबमन गिल यांनी अर्धशतकी खेळी केल्या. साहाने ५५ आणि गिलने ५२ धावा केल्या. या दोघांनी सलामीला १०६ धावांची सलामी भागीदारी देखील रचली. पण, हे दोघे बाद झाल्यानंतर अन्य फलंदाजांना आक्रमक खेळ करता आला नाही.
अखेरच्या षटकात गुजरातला ९ धावांची विजयासाठी गरज होती. पण मुंबईकडून गोलंदाजी करताना डॅनिएल सॅम्सने केवळ ३ धावाच अखेरच्या षटकात दिल्या. त्यामुळे गुजरातला २० षटकात ५ बाद १७२ धावा करता आल्या. त्यामुळे मुंबईने हा सामना जिंकला. मुंबईकडून मुरूगन अश्विनने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या
‘नशीब कधी ना कधी बदलणार होतेच’, मुंबईच्या दुसऱ्या विजयानंतर कर्णधार रोहित खुश
भारतीय संघ इंग्लंडनंतर जाणार वेस्ट इंडिज दौऱ्यावर, पाहा कसे असेल वेळापत्रक
मुंबईविरुद्ध सामना गमावला, पण गुजरातसाठी साहा-गिल जोडी ठरली ‘लय भारी’; रचली ऐतिहासिक भागीदारी