आयपीएलच्या 13 व्या हंगामातील 23 वा सामना आज(9 ऑक्टोबर) राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात शारजाह येथे खेळला जाईल. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरुवात होईल.
सलग 3 सामने गमावल्यानंतर राजस्थान पुन्हा विजयी मार्गावर येण्याचा प्रयत्न करेल. राजस्थानने या हंगामात आतापर्यंत 5 सामने खेळले आहेत. शारजाहच्या मैदानात झालेल्या दोन्ही सामन्यात राजस्थानने विजय मिळवला होता. त्यांनी या दोन्ही सामन्यात 200 पेक्षा अधिक धावा केल्या होत्या. दुसरीकडे, दिल्लीला हा सामना जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवायचे आहे.
दोन्ही संघांदरम्यान खेळल्या गेलेल्या मागील 5 सामन्यांत दिल्लीने 3 तर राजस्थानने 2 सामने जिंकले आहेत. मागील हंगामात दिल्ली आणि राजस्थान यांच्यात 2 सामने खेळले गेले होते, दोन्ही वेळा दिल्लीने राजस्थानचा पराभव केला होता.
राजस्थानने शारजाहमध्ये गाठले होते सर्वात मोठे लक्ष्य
राजस्थानने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठ्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग पंजाबविरुद्ध शारजाहमध्येच केला होता. त्याचबरोबर राजस्थानने त्यांच्या शेवटच्या 3 सामन्यांपैकी अबुधाबीमध्ये 2 आणि दुबईत 1 सामना खेळला आहे, या तीनही सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे.
दिल्ली संघ आहे उत्कृष्ट फॉर्ममध्ये
दिल्लीचे फलंदाज आणि गोलंदाज उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत. सलामीवीर पृथ्वी शॉ आणि शिखर धवन डावाची चांगली सुरुवात करतात. यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर,युवा फलंदाज रिषभ पंत आणि अष्टपैलू मार्कस स्टॉयनिस हे आक्रमक फलंदाजी करत आहेत. त्याचबरोबर वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा, एन्रीच नॉर्किए, फिरकीपटू रविचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेल हे सुद्धा उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत.
बटलर, सॅमसन यांच्या कामगिरीकडे असेल लक्ष
राजस्थान रॉयल्सची फलंदाजी वरच्या फळीतील फलंदाजांवर अवलंबून आहे. संघाला चांगली सुरुवात देण्याची जबाबदारी कर्णधार स्टीव्ह स्मिथ, जॉस बटलर आणि संजू सॅमसन यांच्यावर असेल. त्याचबरोबर गोलंदाजीत वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरबरोबर उर्वरित गोलंदाजांनाही गडी बाद करावे लागेल.
दोन्ही संघातील सर्वात महागडे खेळाडू
युवा फलंदाज रिषभ पंत हा दिल्लीतील सर्वात महागडा खेळाडू असून त्याला एका हंगामात 15 कोटी मिळतात आणि वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज शिमरॉन हेटमायरची किंमत 7.75 कोटी आहे. त्याचबरोबर कर्णधार स्मिथ राजस्थानमधील सर्वात महागडा खेळाडू असून त्याला एका हंगामात 12.50 कोटी मिळतात आणि संजू सॅमसनला 8 कोटी मिळतात.
हवामान अहवाल
शारजाहमध्ये आकाश स्वच्छ असेल. तापमान 24 ते 37 डिग्री सेल्सिअस असण्याची शक्यता आहे. शारजाहमधील खेळपट्टी फलंदाजांसाठी उपयुक्त असेल. खेळपट्टी संथ गतीची असल्याने फिरकीपटूंना मदत होईल. शारजाहमध्ये नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजीला प्राधान्य देईल. शारजाहमध्ये खेळलेल्या मागील 13 टी 20 सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाचा विजय मिळवण्याचा दर 69% आहे.
या मैदानावर खेळले गेलेले एकूण टी 20 सामने : 13
प्रथम फलंदाजी करताना मिळालेले विजय : 9
प्रथम गोलंदाजी करताना मिळालेले विजय : 4
पहिल्या डावात सरासरी धावसंख्या: 149
दुसर्या डावात सरासरी धावसंख्या: 131
दिल्ली हा एकमेव संघ आहे ज्याने आजपर्यंत खेळलेला नाही अंतिम सामना
दिल्ली हा एकमेव असा संघ आहे जो आतापर्यंत अंतिम सामना खेळू शकला नाही. तथापि, दिल्लीने स्पर्धेच्या सुरुवातीच्या दोन सत्रात (2008, 2009) उपांत्य फेरी गाठली होती. त्याचवेळी राजस्थानने पहिल्याच हंगामात (2008) आयपीएलचा किताब पटकावला होता.
आयपीएलमध्ये राजस्थानचा विजय मिळवण्याचा दर दिल्लीपेक्षा आहे अधिक
आयपीएलमध्ये राजस्थानचा विजय मिळवण्याचा दर दिल्लीपेक्षा अधिक आहे. दिल्लीने आतापर्यंत एकूण 182 सामने खेळले आहेत. त्यातील 81 सामन्यांत विजय मिळवला आणि 99 सामन्यात पराभूत झाला. लीगमध्ये दिल्लीचा विजय मिळवाण्याचा दर 44.72 % आहे. त्याचबरोबर राजस्थानने आतापर्यंत एकूण 152 सामने खेळले आहेत. त्यामधून 77 सामन्यात विजय मिळवला आणि 73 सामन्यात या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. लीगमध्ये राजस्थानचा विजय मिळवण्याचा दर 47.52% आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
डेन्मार्क खुली बॅडमिंटन स्पर्धा – सायना नेहवाल, पी कश्यपची स्पर्धेतून माघार
IPL 2020: हैदराबाद विरुद्ध पंजाब सामन्यानंतरची जाणून घ्या ‘ही’ खास आकडेवारी
IPL 2020 : पाहा सध्या कोण आहे ऑरेंज आणि पर्पल कॅपचा मानकरी
ट्रेंडिंग लेख-
-यंदाच्या आयपीएल हंगामात ‘या’ ३ संघांकडे आहे सर्वोत्तम गोलंदाजीचे आक्रमक
-IPL2020 – या ६ युवा खेळाडूंनी केले सर्वांना प्रभावित, लवकरच मिळू शकते टीम इंडियाकडून खेळण्याची संधी
-IPL – एकही विकेट न गमावता सर्वात मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करणारे संघ