आयपीएल (IPL) सध्याच्या घडीला 2 महिने खेळवली जाते. मात्र, याबाबत आता नवीन योजना आखल्या जात आहेत. दरम्यान, क्रिकेट बोर्डाला (BCCI) वेगवेगळ्या प्रकारचा सल्लाही मिळत आहे. आता आयपीएलमधील एका फ्रेंचायझीच्या मालकाच्या भावानेही बीसीसीआयला एक अत्यंत महत्त्वाचा सल्ला दिला आहे. आयपीएलची सुरुवात करणारे ललित मोदी यांनीही बीसीसीआयला हा सल्ला मानण्यास सांगितले आहे. जर बोर्डाने हा नियम मान्य केला, तर आयपीएल 2 महिन्यांऐवजी चक्क 6 ते 7 महिने खेळवली जाऊ शकते.
लखनऊ सुपर जायंट्सचे (LSG) मालक संजीव गोएंका (Sanjeev Goinka) यांचे बंधू आणि प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोएंका यांनी एक लेख लिहिला आहे. ज्यामध्ये त्यांनी आयपीएलची स्पर्धा आणखी मोठी (दीर्घकाळ चालणारी) करण्याची मागणी केली आहे. त्यांचा हा लेख सोशल मीडियावर शेअर करत ललित मोदी म्हणाले, माझ्या चांगल्या मित्राचा एक उत्कृष्ट लेख. आपल्या क्रिकेटच्या सद्यस्थितीवर आणि स्टेडियमसारख्या काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी प्रकाश टाकला आहे. मी ही स्पर्धा छोटी करण्याच्या बाजूने नाही. वास्तविक पाहता, ती आणखी मोठी केली पाहिजे. आयपीएलची सुरुवात नोव्हेंबरमध्ये करून ती 6 ते 7 महिन्यांपर्यंत घरच्या आणि परदेशी मैदानांवरील सामन्यांच्या पूर्ण विंडोमध्ये खेळवली जाऊ शकते. हे सामने गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवसांत खेळवले जावेत. प्रस्तावित रचनेनुसार आवश्यक असणाऱ्या 94 सामन्यांच्या नियमाचे पालन केले गेले पाहिजे.
या लीगसोबतच आंतरराष्ट्रीय क्रिकेट कसे जिवंत ठेवता येईल, याची पद्धतही ललित मोदी यांनी सांगितली आहे. बोर्डाला सल्ला देताना ते म्हणाले, बीसीसीआयने आता या अजेंड्याला पुढे नेले पाहिजे. आंतरराष्ट्रीय मालिका उर्वरित महिन्यांत आणि मध्ये-मध्ये आयोजित केल्या जाव्यात. उदाहरणार्थ, आयपीएलची विंडो आठवड्याच्या मधल्या दिवसांत असू शकते, किंवा फुटबॉलप्रमाणे त्या हंगामात द्विपक्षीय मालिका खेळवण्यासाठी आयपीएल काही आठवड्यांसाठी थांबवली जाऊ शकते. भविष्यात असे घडणे निश्चित आहे.






