आयर्लंड विरुद्ध भारत यांंच्यातील दुसरा टी२० सामना मंगळवारी (२८ जून) खेळला जाणार आहे. हा सामना द विलेज, डबलिन येथे खेळला जाणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ९ वाजता सुरूवात होणार आहे. पहिल्या सामन्यात भारताचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) दुखापतग्रस्त होता, त्यामुळे तो फलंदाजीला आला नाही. तर त्याच्याजागी कोणता खेळाडू दुसऱ्या सामन्यासाठी अंतिम अकरामध्ये खेळणार या चर्चेला उधान आले आहे.
हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिला टी२० सामना ७ विकेट्सने जिंकला. यामध्ये जलदगती गोलंदाज उमरान मलिकने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तर राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi) अजूनही पदार्पणाची वाट पाहत आहे. आयपीएल (इंडियन प्रीमियर लीग) २०२२च्या हंगामामध्ये तो सनरायजर्स हैद्राबाद संघाकडून खेळला आहे. यामध्ये त्याने उत्तम कामगिरी केली आहे. त्याने १४ सामन्यांमध्ये ४१३ धावा केल्या होत्या. आतापर्यंत त्याने सहा आयपीएल हंगाम खेळले असून ७६ सामन्यांमध्ये १७९८ धावा केल्या आहेत.
राहुलने आयपीएल २०१७च्या हंगामात पदार्पण करताना पुणे सुपर जायंट्स या संघाकडून खेळला होता. त्यावेळी एमएस धोनी (MS Dhoni) याच्याकडे संघाचे कर्णधारपद होते. दिल्ली विरुद्धच्या या सामन्यात त्याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत १० धावा केल्या होत्या. नंतर त्याने सलामीला येत उत्तम खेळी केल्या होत्या. पहिल्याच हंगामामध्ये त्याने ३५० पेक्षा अधिक धावा केल्या होत्या. त्याने याच हंगामात त्याची सर्वोत्तम ९३ धावांची खेळी केली होती.
राहुलने सलामीवीर म्हणून आयपीएलमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यातच ऋतुराज दुसऱ्या सामन्यात नाही खेळला तर त्याला संघात जागा मिळू शकते. पहिल्या सामन्यात ऋतुराज जखमी झाला होता, त्यामुळे दीपक हुड्डा सलामीला आला होता.
राहुल आणि ऋतुराज या दोघांचेही पुण्याशी काहीनाकाही नाते आहे. रांची येथे जन्मलेल्या राहुलने पुण्याच्या डेक्कन जिमखान्यामध्ये क्रिकेटचा सराव केला आहे. त्याने महाराष्ट्राकडून रणजी ट्रॉफी २०१२-१३ हंगामामध्ये पदार्पण केले होते. ऋतुराजचा जन्मच पुण्यात झाला आहे. त्या दोघांनीही स्थानिक सामन्यात महाराष्ट्रसंघाकडून पदार्पण केले.
राहुल बरोबरच अर्शदीप सिंगही त्याच्या पदार्पणाची वाट पाहत आहे. त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेत संघात निवडले होते. मात्र त्याला पाचही सामन्यांमध्ये बाकावर बसावे लागले होते. आयर्लंडमध्येही हीच पुनरावृत्ती होणार का हे दुसऱ्या सामन्यात कळेलच.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ICC WTC: न्यूझीलंड हरला, भारताला टेंशन देऊन गेला; जाणून घ्या काय आहे समीकरण
ठरलयं! इ्ंग्लंड विरुद्धच्या कसोटीमध्ये ‘हाच’ खेळाडू करणार भारताचे नेतृत्व, स्वत: दिले संकेत