आयर्लंड विरुद्ध झिम्बाब्वे या दोन्ही संघांमध्ये टी -२० मालिकेचा थरार सुरू आहे. ५ टी -२० सामन्यांच्या मालिकेतील चौथा टी -२० सामना गुरुवारी (२ सप्टेंबर ) पार पडला. या सामन्यात आयर्लंड संघाने आंतरराष्ट्रीय टी२०मधील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करत झिम्बाब्वे संघावर ६४ धावांनी विजय मिळवला आहे. यासह मालिकेत ३-१ ची विजयी आघाडी घेतली आहे.
या सामन्यात झिम्बाब्वे संघाने नाणेफेक जिंकून आयर्लंड संघाला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. प्रथम फलंदाजी करताना आयर्लंड संघाच्या प्रमुख फलंदाजांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. गेल्या सामन्यात शतक झळकावणाऱ्या पॉल स्टरलींगने या सामन्यात ३३ चेंडूंमध्ये ३९ धावांची खेळी केली होती. तर सलमीवीर फलंदाज केविन ओ’ब्रायनने ३९ चेंडूंमध्ये ४७ धावांची खेळी केली होती.
तसेच कर्णधार अँडी बलबर्नीने २२ चेंडूंमध्ये ३६ धावांची तुफानी खेळी केली होती. या खेळींच्या जोरावर आयर्लंड संघाला २० षटकांअखेर ४ बाद १७४ धावांचा डोंगर उभारण्यात यश आले होते. झिम्बाब्वेकडून वेलिंग्टन मसाकादझाने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.
आयर्लंड संघाने दिलेल्या १७५ धावांचा पाठलाग करताना झिम्बाब्वे संघातील फलंदाजांना चांगली सुरुवात करून देता आली नाही. झिम्बाब्वे संघातील सलामीवीर फलंदाज लवकर माघारी परतले होते. त्यानंतर कर्णधार एर्विनने एकहाती झुंज देत २८ धावांची खेळी केली. परंतु, तो देखील मोठी खेळी करू शकला नाही आणि पॅव्हेलियनमध्ये परतला.
शेवटी जोंगवेने ताबडतोड फलंदाजी करत नाबाद २४ धावांची खेळी केली. परंतु, फलंदाजांची साथ न मिळाल्यामुळे झिम्बाब्वे संघाला २० षटकांअखेर ९ बाद ११० धाावच करता आल्या. त्यामुळे झिम्बाब्वेने हा सामना ६४ धावांनी गमवावा लागला. आर्यलंडकडून मार्क एदेरने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. त्याच्या याच कामगिरीमुळे त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. (Ireland beat zimbabwe by 64 runs and taken 4-1 lead in 5 match T20 series)
या मालिकेतील पहिल्या टी -२० सामन्यात झिम्बाब्वे संघाने विजय मिळवला होता. त्यानंतर पुढील तिन्ही सामन्यात आयर्लंड संघाने विजय मिळवत ही मालिका आपल्या नावावर केली आहे. मालिकेतील अंतिम टी -२० सामना शनिवारी (४ सप्टेंबर) पार पडणार आहे. ही मलिका संपल्यानंतर दोन्ही संघांमध्ये वनडे मालिकेचा थरार पाहायला मिळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
टी२० विश्वचषकात रोहित घेणार कर्णधार विराटची जागा? हेड कोच शास्त्रींनी दिले ‘असे’ उत्तर
इंग्लंडच्या हमीदने स्विंगचा सामना करण्यासाठी केलं असं काही, कोहलीने थेट पंचांकडे केली तक्रार