भारतीय संघाने आयर्लंडच्या दौऱ्याची विजयी सुरूवात केली आहे. हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २६ जूनला झालेल्या पहिल्या टी२० सामन्यात आयर्लंडवर ७ विकेट्सने विजय मिळवला आहे. द विलेज, मालाहिदे, डबलिन येथे खेळला गेलेला हा सामना पावसामुळे उशिरा सुरू झाला होता. त्यामुळे दोन्ही संघांनी १२-१२ षटके टाकली. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
टी२० क्रिकेटमध्ये गोलंदाजांवर अधिक दडपण असते. त्यात हा सामना १२ षटकांचा असल्याने भारतीय गोलंदाजांनी उत्तम कामगिरी करत आयर्लंडच्या फलंदाजांना चांगलेच रोखून धरले होते. या सामन्यात फिरकीपटू युझवेंद्र चहलने ३ षटके टाकले असता त्याचा इकॉनॉमी रेट ३.७० एवढा राहिला. त्याने यावेळी ११ धावा देताना आयर्लंडचा यष्टीरक्षक लोर्कन टकरची विकेट घेतली. त्याच्या या विशेष कामगिरीमुळे त्याने सामनावीराचा पुरस्कार मिळवला आहे.
For his economical spell of 1/11 – @yuzi_chahal was the player of the match in the 1st T20I 👏👏
A 7-wicket win for #TeamIndia to start off the 2-match T20I series against Ireland 🔝#IREvIND pic.twitter.com/eMIMjR9mTL
— BCCI (@BCCI) June 26, 2022
चहल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात विकेट्स घेण्यात अपयशी ठरला होता. नंतरच्या तीन सामन्यात त्याने लयीत परतत ६ विकेट्स घेतल्या. हीच लय कायम राखत त्याने आयर्लंड विरुद्धच्या सामन्यात चांगली गोलंदाजी केली आहे.
या सामन्यात भारतीय कर्णधार हार्दिकने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय योग्य ठरवत उपकर्णधार भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) याने पहिल्याच षटकात विकेट घेत संघाला चांगली सुरूवात करून दिली. पंड्या आणि आवेश खान यांनी प्रत्येकी एक विकेट घेत आयर्लंडला १२ षटकात १०८ धावांवर रोखले.
लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाचे सलामीवर दीपक हुड्डा आणि इशान किशन यांनी संघाला उत्तम सुरूवात करून दिली. हुड्डाने १६२.०७च्या स्ट्राईक रेटने नाबाद ४७ धावा केल्या, तर इशानने ११ चेंडूत २६ धावा केल्या आहेत. संघात पुनरागमन करणारा सूर्यकुमार यादव पहिल्याच चेंडूवर बाद झाला. नंतर आलेल्या पंड्याने तुफानी फलंदाजी करत संघाला विजयाच्याजवळ नेले. त्याने १२ चेंडूत २४ धावा केल्या. तो बाद झाल्यावर फलंदाजीसाठी आलेल्या दिनेश कार्तिकने एक चौकार मारत नाबाद ५ धावा केल्या.
या सामन्यातून उमरान मलिक (Umran Malik) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट पदार्पण केले आहे. त्याने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या या महत्वाच्या सामन्यात एकच षटक टाकले आहे.
भारत विरुद्ध आयर्लंड दुसरा टी२० सामना २८ जूनला डबलिन येथेच खेळला जाणार आहे. या सामन्याच्या दिवशीही तेथिल हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तवली आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मध्य प्रदेशचे प्रशिक्षक चंद्रकांत पंडित ‘या’ कारणामुळे वागतात खडूसपणे, दिग्गजाची आहे शिकवण
पहिल्याच षटकात भुवनेश्वर कुमारने रचला मोठा विक्रम; मोठ-मोठे खेळाडू पडले मागे
इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियात नवा खेळाडू दाखल, घेऊ शकतो रोहितची जागा