भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाण याला भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंपैकी एक मानले जाते. त्याने आपल्या कारकीर्दीत भारतीय संघाला अनेक अविस्मरणीय विजय मिळवून दिले. स्विंग गोलंदाजी व उपयुक्त आक्रमक फलंदाजी ही त्याची खास वैशिष्ट्ये होती.
भारताचा एकेकाळचा सर्वात प्रतिभाशाली खेळाडू म्हणून नावाजलेल्या इरफानला मात्र संघात घेण्याची माजी कर्णधार व सध्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष असलेल्या सौरव गांगुली यांची इच्छा नव्हती असे इरफानने सांगितले आहे.
दादा मला संघात घेण्यास इच्छुक नव्हता
मागील वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केलेला इरफान सध्या एका प्रसारण वाहिनीसाठी सूत्रसंचालक म्हणून काम पाहतो. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात सूत्रसंचालन करताना त्याने आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळातील काही घटनांचे खुलासे केले.
त्यापैकी एक घटना सांगताना तो म्हणाला, “आम्ही २००३-२००४ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलो असताना, कर्णधार सौरव गांगुली हा मला संघात खेळवण्यासाठी इच्छुक नव्हता. माझ्या पदार्पणाच्या कसोटीवेळी तो माझ्याकडे येऊन म्हणाला, ‘इमानदारीने सांगायचे झाल्यास मी तुला संघात खेळवू इच्छित नाही.’ या गोष्टी मागे कारण माझा आंतरराष्ट्रीय अनुभव होता. या सामन्यापूर्वी मी केवळ एक आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता व ऑस्ट्रेलियाच्या या तगड्या संघाविरुद्ध खेळताना मी कशी कामगिरी करेल याबाबत दादाला काही कल्पना नव्हती.”
इरफानने पाडली सामन्यात छाप
इरफानने त्यानंतर मालिकेत दोन सामने खेळताना ४ बळी मिळवले व आपल्या स्विंग गोलंदाजीने सर्वांची वाहवा मिळवली. इरफानने सिडनी कसोटीत ऍडम गिलख्रिस्टची अप्रतिम यॉर्करवर उडवलेली दांडी क्रिकेट चाहते आजही विसरले नाहीत. तसेच, आपण चांगली कामगिरी केल्यानंतर गांगुलीने येऊन आपली माफी मागितली असेदेखील इरफानने सांगितली, “मी माफी मागतो की, तू मला खोटे ठरवलेस. असे दादाने मला सामन्यानंतर येऊन म्हटले होते. माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट होती. कारण, यातून दादाचा मोठेपणा स्पष्ट जाणवत होता.”
सौरव गांगुलीच्या नेतृत्वात भारतीय संघात पदार्पण करून पुढे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवणाऱ्या खेळाडूंमध्ये इरफान पठाणचा देखील समावेश होतो. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर तो प्रशिक्षक व समालोचक अशा दुहेरी भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतो.
महत्त्वाच्या बातम्या –
‘केरळ एक्सप्रेस’ आता आपल्या अभिनयाने घेणार विकेट्स, झळकणार बॉलिवूडच्या ‘या’ सिनेमात
‘पुजारामुळे नॉन स्ट्राईकवरील फलंदाजाला बाद होण्याचा धोका’; पाहा कुणी केलंय हे वक्तव्य?
बुमराहच्या सुमार कामगिरीमुळे पत्नी संजनावर नेटकऱ्यांनी साधला निशाणा, उमटल्या ‘अशा’ प्रतिक्रिया