भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना 3 जानेवारीपासून सिडनी क्रिकेट मैदानावर खेळला जाणार आहे. सामन्याच्या एक दिवस आधी भारतीय क्रिकेटमध्ये मोठा भूकंप आला आहे.
सर्वप्रथम, सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत कर्णधार रोहित शर्मा उपस्थित राहिला नाही. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरनं त्याची जागा घेतली. त्यानंतर बातमी आली की, रोहितनं सिडनी कसोटीतून स्वत:हून माघार घेतली आहे. त्याच्या जागी आता उपकर्णधार जसप्रीत बुमराह भारतीय संघाचं नेतृत्व करेल. या सगळ्या दरम्यान माजी क्रिकेटपटू इरफान पठाण रोहितच्या समर्थनार्थ पुढे आला आहे.
रोहितचा खराब कसोटी फॉर्म हा गेल्या बऱ्याच काळापासून चिंतेचा विषय आहे. न्यूझीलंडविरुद्ध मायदेशातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेपासून त्याची बॅट शांतच आहे. रोहितनं ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तीन कसोटी सामने खेळले. यादरम्यान त्याला पाच डावांत केवळ एकदाच दुहेरी धावांचा आकडा गाठता आला. त्यानं या मालिकेत एकूण 31 धावा केल्या आहेत.
मालिकेतील दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीत रोहितनं मधल्या फळीत फलंदाजी केली. चौथ्या कसोटीत तो पुन्हा एकदा सलामीला आला, परंतु सलामीलाही त्याचं नशीब पालटलं नाही. त्यामुळे सध्या तो चाहत्यांच्या निशाण्यावर आहे. यानंतर माजी क्रिकेटपटू इरफान पठाण रोहित शर्माच्या समर्थनार्थ आला आहे. इरफानला विश्वास आहे की, रोहित हा असा खेळाडू आहे जो स्वतःला कठीण परिस्थितीतून बाहेर काढू शकतो आणि त्यानं तसं केलं पाहिजे.
इरफान पठाणनं सोशल मीडियावर लिहिलं की, “माझ्या मते, रोहित शर्मानं येथे पराभव स्वीकारू नये. त्यानं असं सोडून जाऊ नये असं मला वाटतं. त्यानं भारतीय क्रिकेटसाठी खूप काही केलं आहे. मला विश्वास आहे की तो या वेळेलाही बदलू शकतो. कसोटी मालिकेतील हा शेवटचा आणि महत्त्वाचा सामना असेल. अशा परिस्थितीत अनुभवाची गरज असेल. रोहितनं जो काही निर्णय घ्यायचा, तो या मालिकेनंतर घ्यावा.”
हेही वाचा –
मोठी बातमी! रोहित शर्माची सिडनी कसोटीतून माघार, हा खेळाडू करणार टीम इंडियाचं नेतृत्व
खेलरत्न पुरस्कार जिंकलेल्या खेळाडूंना मिळेल बंपर बक्षीस, रक्कम जाणून बसेल धक्का!
मेजर ध्यानचंद ‘खेलरत्न’ पुरस्काराची घोषणा; गुकेश, मनू भाकरसह या 4 खेळाडूंना मिळाला सर्वोच्च सन्मान