इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथा कसोटी सामना ओव्हलच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने जोरदार कामगिरी करत इंग्लंड संघावर १५७ धावांनी विजय मिळवला. यासह कसोटी मालिकेत २-१ ची विजयी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील सुरुवातीच्या चारही सामन्यात आर अश्विनला संधी देण्यात आली नव्हती. त्यामुळे चाहत्यांनी सोशल मीडियावर निराशा व्यक्त केली होती. दरम्यान माजी भारतीय क्रिकेटपटूने देखील ट्विट करत आर अश्विन बाबत आपले मत मांडले आहे.
भारतीय संघाचा दिग्गज फिरकीपटू आर अश्विन याने भारतीय संघाच्या अनेक विजयात मोलाचे योगदान दिले आहे. परंतु, इंग्लंड संघाविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील सुरुवातीच्या चारही सामन्यात त्याला बाकावर बसून राहावे लागले आहे. तर एकमेव फिरकीपटू रवींद्र जडेजाला संघात स्थान दिले जात आहे. परंतु, अश्विनला संधी मिळत नसल्याने चाहते भलतेच निराश झाले आहेत. दरम्यान माजी भारतीय क्रिकेटपटू इरफान पठाणने देखील आर अश्विनबाबत ट्विट केले आहे.
इरफान पठाण सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. तो ट्विट करत खेळाडूंचे कौतुक करत असतो. तसेच आपले मत मांडत असतो. त्याने आपल्या ट्विटमध्ये म्हटले की,”अश्विनला या मालिकेत जितक्या उचक्या लागल्या असतील, तितक्या कोणाला संपूर्ण आयुष्यात देखील लागल्या नसतील.” अश्विनला या मालिकेत संधी मिळाली नाही, ज्यामुळे चाहत्यांना त्याची भरपूर आठवण येत असावी, याच उद्देशाने इरफान पठाणने हे ट्विट केले.
https://twitter.com/IrfanPathan/status/1434766158876446723
अश्विनने शेवटचा कसोटी सामना विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळला होता. या सामन्यात अश्विनने ४ गडी बाद केले होते. परंतु, भारतीय संघाचा या सामन्यात ८ गडी राखून पराभव झाला होता.(Irfan Pathan tweet went viral on social media)
भारतीय संघाचा १५७ धावांनी दणदणीत विजय
भारतीय संघाने दिलेल्या ३६८ धावांचा पाठलाग करताना इंग्लंड संघाला चांगली सुरुवात मिळाली होती. हसीब हमीद आणि रॉरी बर्न्स या दोघांनी अर्धशतकं झळकावले होते. परंतु, ते दोघेही अर्धशतकांचे रुपांतर मोठ्या खेळीत करण्यास अपयशी ठरले. त्यानंतर कर्णधार जो रूट देखील स्वस्तात माघारी परतला होता. तसेच इंग्लंड संघातील इतर कुठल्याही फलंदाजाला साजेशी कामगिरी करता आली नाही.
भारतीय संघाकडून जसप्रीत बुमराह, उमेश यादव, शार्दुल ठाकूर आणि रवींद्र जडेजा यांनी अप्रतिम गोलंदाजी करत इंग्लंड संघाचा डाव २१० धावांवर गुंडाळला होता. यासह भारतीय संघाने या सामन्यात १५७ धावांनी विजय मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या –
लाईव्ह सामन्यात कोहलीला सुचली मस्ती, इंग्लंडच्या खेळाडूला धावा बनवण्यासाठी दाखवला गॅप- VIDEO
पराभवानंतर रूटचा ऊहापोह; म्हणाला, ‘भारतीय गोलंदाजांच्या प्रभावी रिव्हर्स स्विंगने आमचा घात केला’
‘बुमराह संघात असल्यास अश्विनची कोणाला गरज भासेल’, इंग्लंडच्या माजी क्रिकेटरचे लक्षवेधी विधान






