नवी दिल्ली । मागील काही दिवसांंपासून वर्णद्वेषाचा मुद्दा सोशल मीडियावर चर्चेत आहे. नुकतेच आयपीएल फ्रंचायझी सनरायजर्स हैद्राबाद संघाचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू डॅरेन सॅमीने आयपीएलदरम्यान वर्णद्वेषाचा खुलासा केला होता. त्यानंतर आता भारतीय संघाचा माजी अष्टपैलू इरफान पठाणनेही वर्णद्वेषाबद्दल ट्वीट केले आहे.
वर्णद्वेषाबद्दल इरफानचे ट्वीट
वंशवादाच्या मुद्द्यावर इरफानने ट्वीट करत म्हटले,“वर्णद्वेष केवळ तुमच्या त्वचेच्या रंगापर्यंतच मर्यादित नाही. जर तुमचा वेगळा विश्वास आहे आणि त्यामुळे जर समाजात घर मिळत नसेल, तर तेसुद्धा एक वर्णद्वेषच आहे.”
त्यापूर्वी इरफानने सोमवारी म्हटले होते, की त्याला माहीत नाही की सॅमीबरोबर (Darren Sammy) वर्णद्वेष केव्हा झाला होता. परंंतु देशांतर्गत क्रिकेटमध्ये असे होते. तो म्हणाला, “मी २०१४मध्ये हैद्राबाद संघात सॅमीबरोबर शिबिराचा भाग होतो. मला वाटते, असे असू शकते की त्याच्याबरोबर असे झाले असावे. परंतु त्याच्याबरोबर झालेल्या घटनेची कोणतीही माहिती नाही. कारण, त्याबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा झाली नसावी.”
तरी इरफानने म्हटले होते, की देशांतर्गत क्रिकेटमध्ये नेहमी दक्षिण भारतीय क्रिकेटपटूंना उत्तर आणि पश्चिम क्षेत्रांमध्ये खेळताना वर्णद्वेषाचा (Racism) सामना करावा लागतो.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही होतो वर्णद्वेष
देशांतर्गत क्रिकेटमध्येच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही वर्णद्वेषाची प्रकरणे समोर आली आहेत. ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज फलंदाज डीन जोन्सने (Dean Jones) समालोचन करताना हाशिम आमलाला आंतकवादी म्हटले होते. पाकिस्तानचे कर्णधार सरफराज अहमदने दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू अँडील फेहलुक्वायोला (Andile Phehlukwayo) काळे म्हटले होते.
Racism is not restricted to the colour of the skin.Not allowing to buy a home in a society just because u have a different faith is a part of racism too… #convenient #racism
— Irfan Pathan (@IrfanPathan) June 9, 2020
याव्यतिरिक्त डॅरेन लेहमननेही (Darren Lehmann) कुमार संगकाराविरुद्ध (Kumar Sangakkara) वर्णद्वेषाचे वक्तव्य केले होते. मागील वर्षी न्यूझीलंड दौऱ्यावर इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरवरही (Jofra Archer) असेच वक्तव्य केले होते. तिथे न्यूझीलंडच्या एका चाहत्याने त्याच्या रंगावरून वक्तव्य केले होते. ते प्रकरण आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये पसरले होते. त्यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने (Kane Williamson) स्वत: आर्चरची माफी मागितली होती.