पाकिस्तानमध्ये आयोजित 2025 आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीला 19 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. टीम इंडिया स्पर्धेतील सर्व सामने दुबईमध्ये हायब्रिड मॉडेल अंतर्गत खेळेल. सुरक्षेच्या कारणास्तव भारतानं पाकिस्तानला जाण्यास नकार दिला होता. मात्र भारतीय कर्णधार रोहित शर्माला पाकिस्तानात जावं लागू शकतं. याचं कारण म्हणजे चॅम्पियन्स ट्रॉफीचा ‘कॅप्टन डे’.
खरंतर, प्रत्येक आयसीसी स्पर्धेपूर्वी सर्व संघांचे कर्णधार एकाच ठिकाणी जमतात आणि त्यांचा एक ग्रुप फोटो सेशन होतो. या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सर्व कर्णधारांचं फोटोशूट कुठे होईल? याची पुष्टी अजून झालेली नाही. पण जर फोटोशूट पाकिस्तानमध्ये झालं तर बीसीसीआय रोहितला तिथे पाठवण्यास तयार आहे का? हा प्रश्न आहे. आता ‘कॅप्टन डे’ बद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, बीसीसीआयच्या एका सूत्रानं सांगितलं की, कॅप्टन डेसाठी रोहित शर्मा पाकिस्तानला जाण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. प्रथम भारतीय संघाची घोषणा होईल आणि नंतर बोर्ड निर्णय घेईल. या स्पर्धेत आठ संघ सहभागी होत आहेत. भारत आणि पाकिस्तान वगळता इतर देशांनी त्यांचे संघ जाहीर केले आहेत.
राजकीय तणावामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात बऱ्याच काळापासून द्विपक्षीय क्रिकेट मालिका झालेली नाही. भारतानं 2008 पासून पाकिस्तानचा दौरा केलेला नाही. तर पाकिस्ताननं 2012 पासून भारतात द्विपक्षीय मालिका खेळलेली नाही. दोन्ही संघ आता फक्त आयसीसी स्पर्धांमध्येच एकमेकांशी भिडतात. भारत 20 फेब्रुवारी रोजी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपल्या मोहिमेला सुरुवात करेल.
भारताचा पहिला सामना बांगलादेशविरुद्ध होणार आहे. टीम इंडिया 23 फेब्रुवारी रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी खेळेल. तिसऱ्या साखळी सामन्यात भारतासमोर न्यूझीलंडचं (२ मार्च) आव्हान असेल. जर भारत उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीत पोहोचला, तर भारताचे सामने दुबईमध्येच होतील. मात्र जर भारत पात्रता मिळवू शकला नाही तर अंतिम सामना 9 मार्च रोजी लाहोरमध्ये होईल.
ही स्पर्धा 50 षटकांच्या स्वरूपात होणार आहे. भारत आणि पाकिस्तान व्यतिरिक्त गट अ मध्ये न्यूझीलंड आणि बांगलादेश हे दोन संघ आहेत. ग्रुप बी मध्ये ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान आणि इंग्लंड यांचा समावेश आहे. 2017 मध्ये इंग्लंडमध्ये झालेली चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्ताननं जिंकली होती. त्यांनी अंतिम सामन्यात भारतीय संघाचा पराभव केला होता.
हेही वाचा –
आकाश चोप्रांनी भारतीय खेळाडूंना फटकारले, बीसीसीआयच्या या निर्णयाचं समर्थन
स्मृती मंधानानं एकाच खेळीत मोडले अनेक रेकॉर्ड, भारतासाठी अशी कामगिरी करणारी पहिलीच खेळाडू
भारतीय महिला संघासाठी वनडे सामन्यांमध्ये सर्वात मोठ्या 3 भागीदारी, मंधाना-प्रतीका अव्वलस्थानी