आशिया कप 2025 (Asia Cup 2025) साठी अद्याप टीम इंडियाचा (Team india) अधिकृत संघ जाहीर झालेला नाही, मात्र त्याआधीच काही खेळाडूंच्या नावांची चर्चा जोरात सुरू झाली आहे. ‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या रिपोर्टनुसार, श्रेयस अय्यरला (Shreyas iyer) आशिया कपसाठी संघात समाविष्ट केलं जाऊ शकतं. अय्यर आधीपासूनच भारताच्या वनडे संघाचा भाग आहे. तो चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (champions trophy) जिंकणाऱ्या टीमचा देखील खेळाडू होता. आता त्याला भारताच्या टेस्ट आणि टी20 संघातही स्थान मिळू शकतं.
श्रेयस अय्यरला तिन्ही फॉरमॅट्समध्ये टीम इंडियामध्ये सामील करण्याची योजना तयार केली जात आहे. ‘टाईम्स ऑफ इंडिया’शी बोलताना सूत्रांनी सांगितलं की, तिन्ही फॉरमॅट्समध्ये मिडल ऑर्डरमध्ये अय्यरच्या क्लास आणि अनुभवाची गरज आहे. इंग्लंडमध्ये नुकतीच झालेली ‘अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी’ (Anderson Tendulkar Trophy) मालिका पाहता, हा अनुभव टीमला खूप उपयोगी पडू शकतो. शिवाय, निवड समितीला हेही माहीत आहे की अय्यर एक उत्कृष्ट स्पिन खेळणारा फलंदाज आहे आणि भारतात होणाऱ्या मालिका जिंकण्यात तो महत्वाची भूमिका बजावू शकतो. भारतात टीम इंडियाला वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्रत्येकी दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे.
इंग्लंड दौऱ्यात अय्यरला संधी मिळाली नव्हती.
जरी अय्यरने IPL 2025 मध्ये दमदार कामगिरी केली असली, तरी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी त्याच्या जागी इतर खेळाडूंना संधी देण्यात आली होती. गेल्या वर्षी भारतात इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत अय्यरला संधी मिळाली होती, पण त्याच्या खराब कामगिरीमुळे त्याला नंतर संघातून वगळण्यात आलं. आता मात्र आशिया कपमध्ये त्याला पुन्हा संघात सामील करण्याचा विचार सुरु आहे. यंदा आशिया कप टी20 फॉरमॅटमध्ये होणार आहे. त्याच वेळी अय्यरने IPL 2025 मध्ये उल्लेखनीय कामगिरी केली होती.






