सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेनंतर भारतात आता विजय हजारे ट्रॉफी या देशांतर्गत स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत झारखंडच्या संघाने मध्य प्रदेशच्या संघाचा दारूण पराभव करत झोकात सलामी दिली आहे. कर्णधार इशान किशनच्या तुफानी शतकी खेळीच्या जोरावर झारखंडने या सामन्यात ५० षटकांत ४२२ धावांचा डोंगर उभारला होता. त्याच्या प्रत्युतरात मध्य प्रदेशचा संघ अवघ्या ९८ धावांवर सर्वबाद झाला. त्यामुळे झारखंडने तब्बल ३२४ धावांनी विजय मिळवला.
इशान किशनचे विक्रमी शतक
इंदोरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवरील या सामन्यात मध्य प्रदेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय त्यांच्या चांगलाच अंगलट आला. सलामीला आलेल्या झारखंडच्या कर्णधार इशान किशनने चौफेर टोलेबाजी करत मध्य प्रदेशच्या गोलंदाजीची पिसे काढली. त्याने अवघ्या ९४ चेंडूत १७३ धावांची खेळी उभारताना विजय हजारे ट्रॉफीतील सातव्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या उभारली.
किशनशिवाय अनुकूल रॉयने ३९ चेंडूत ७२ तर तर विराट सिंगने देखील ४९ चेंडूत ६८ धावांच्या आक्रमक खेळी उभारल्या. त्यामुळे निर्धारित ५० षटकात झारखंडच्या संघाने ९ बाद ४२२ धावांचा टप्पा गाठला. ही धावसंख्या विजय हजारे ट्रॉफीच्या इतिहासातील आजवरची सर्वोच्च धावसंख्या आहे. मध्य प्रदेशचे सगळेच गोलंदाज झारखंडच्या या झंझावातापुढे निष्प्रभ ठरले. केवळ गौरव यादवने ९ षटकात ७३ धावा देत ४ बळी घेतले.
मध्य प्रदेशच्या फलंदाजांची शरणागती
दुसऱ्या डावात ४२३ धावांचे विशाल लक्ष्य मिळालेल्या मध्य प्रदेशच्या फलंदाजांनी अक्षरशः हाराकिरी केली. लक्ष्य जवळपास अशक्य दिसत असले तरी मध्य प्रदेशचे फलंदाज किमान लढाई देतील, अशी अपेक्षा होती. मात्र झारखंडच्या गोलंदाजांसमोर त्यांची मात्रा चालली नाही. त्यामुळे मध्य प्रदेशचा डाव १८.४ षटकात अवघ्या ९८ धावांवर संपुष्टात आला.
मध्य प्रदेशकडून सलामीवीर अभिषेक भंडारीने ५७ चेंडूत ४२ तर वेंकटेश अय्यरने १७ चेंडूत २३ धावांची खेळी केली. मात्र या दोघांव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठण्यातही अपयश आले. झारखंडकडून अनुभवी वरुण आरोनने भेदक गोलंदाज करतांना ५.४ षटकात ३७ धावा देत ६ बळी पटकाविले. त्याला बालक्रिष्णने २ तर शाहबाज नदीम आणि राहुल शुक्लाने प्रत्येकी एक बळी घेत सुयोग्य साथ दिली.
महत्वाच्या बातम्या:
ऑस्ट्रेलियन ओपन: नाओमी ओसाकाने मिळवले चौथ्यांदा ग्रँडस्लॅमचे विजेतेपद