Ishan Kishan Captaincy :- दक्षिण आफ्रिका दौरा अर्धवट सोडल्यानंतर भारताचा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी संघर्ष करत आहे. नोव्हेंबर 2023 पासून इशान भारतीय संघात पुनरागमन करण्याच्या प्रतिक्षेत आहे. यादरम्यान बीसीसीआयने म्हणणे ऐकत इशानने देशांतर्गत क्रिकेटला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. तो झारखंड संघाकडून बुची बाबू ट्रॉफी स्पर्धेत खेळणार आहे. मात्र आता झारखंड संघाने त्याच्यावर मोठी जबाबदारीही सोपवली आहे.
झारखंड क्रिकेट संघाने इशानच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ गळ्यात घातली आहे. बुची बाबू ट्रॉफी 15 ऑगस्टपासून सुरू होत आहे. इशानच्या नेतृत्वात झारखंडचा संघ पहिला सामना मध्य प्रदेशशी खेळणार आहे. तो चेन्नईतील सामन्यापासून झारखंड संघात सामील होणार आहे. इशानकडे कर्णधारपदाचा अनुभव आहे. इशानने यापूर्वी 19 वर्षांखालील स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे.
इशान देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार
ESPNcricinfo च्या रिपोर्टनुसार, इशानने झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशनला देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याच्या आपल्या इराद्यांबद्दल आधीच माहिती दिली होती. आता रणजी ट्रॉफी 2024-25 च्या हंगामातही त्याची खेळण्याची शक्यता वाढली आहे. डिसेंबर 2022 मध्ये त्याने शेवटचा प्रथम श्रेणी सामना खेळला होता. यानंतर तो देशांतर्गत क्रिकेटपासून दूर आहे.
भारतीय संघात मिळवू शकतो प्रवेश
इशानचे लाल चेंडू क्रिकेटमध्ये पुनरागमन अशा वेळी होणार आहे जेव्हा भारतीय संघाला येत्या काही महिन्यांत बांगलादेश, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या तीन संघांविरुद्ध एकूण 10 कसोटी सामने खेळायचे आहेत. आगामी देशांतर्गत हंगामात त्याने चांगली कामगिरी केल्यास तो भारतीय संघात पुनरागमन करू शकतो. गेल्या वर्षी वेस्ट इंडिज दौऱ्यात त्याने भारतीय संघासाठी कसोटी पदार्पण केले होते. पण आतापर्यंत तो भारतीय संघासाठी फक्त दोनच कसोटी सामने खेळू शकला आहे.
पण इशानला भारताच्या कसोटी संघात स्थान मिळणं अवघड दिसतंय. कारण रिषभ पंतचे कसोटीत पुनरागमन जवळपास निश्चित झाले आहे. दुसरीकडे, ध्रुव जुरेलने रांची कसोटीत दमदार कामगिरी केली होती. त्यामुळे हा युवा खेळाडू आपल्या खेळाने सर्वांना प्रभावित करण्यात यशस्वी ठरला आहे. अशातच इशान या खेळाडूंना टक्कर देत भारतीय संघात पुन्हा कशी जागा मिळवतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
पाकिस्तानात होणार नाही चॅम्पियन्स ट्राॅफी? दिग्गज खेळाडूनं सांगितलं मोठं कारण
बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी कोण जिंकेल भारत की ऑस्ट्रेलिया? दिग्गज खेळाडूनं केली मोठी भविष्यवाणी
बोली लागल्यास ‘विराट कोहली 30 कोटींहून’ अधिक रुपयांना विकला जाईल, आयपीएल लिलावकर्त्याचा मोठा दावा