भारत विरुद्ध इंग्लंड संघात येत्या ५ फेब्रुवारीपासून ४ सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिले २ सामने चेन्नई येथील एमए चिदंबरम स्टेडियमवर तर शेवटचे २ सामने अहदाबादच्या नव्याने बांधण्यात आलेल्या मोटेरा स्टेडियमवर होणार आहेत. आत्तापर्यंत इंग्लंड आणि भारत संघात अनेक अविस्मरणीय असे सामने झाले आहेत. त्यातीलच एक म्हणजे २००८मध्ये चेन्नई येथे झालेला सामना.
इंग्लंडचा संघ जेव्हा २००८ साली भारत दौऱ्यावर आला होता, तेव्हा या दौऱ्यातील एक कसोटी सामना चेन्नई येथे झाला होता. त्या सामन्यात जवळपास चौथ्या दिवसापर्यंत इंग्लंडचे पारडे जड असल्याचे वाटत होते. मात्र, भारतीय फलंदाजांनी कमाल करत हा सामना भारताला जिंकून दिला होता.
त्या सामन्यात पहिल्या डावात इंग्लंडने ३१६ धावा केल्या होत्या. यात अँड्र्यू स्ट्रॉसच्या(१२३) शतकाचा समावेश होता. त्यानंतर इंग्लंडने भारताला २४१ धावांवर रोखण्यात यश मिळवले होते. त्यावेळी अँड्र्यू फ्लिंटॉफ आणि मॉन्टी पानेसरने प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या होत्या. तर भारताकडून त्या सामन्यात केवळ तात्कालिन कर्णधार एमएस धोनीला अर्धशतकी खेळी करता आली होती. इंग्लंडने पहिल्या डावात ७५ धावांची आघाडी घेतली होती.
इंग्लंडकडून दुसऱ्या डावातही अँड्र्यू स्ट्रॉसने शतकी खेळी केली. त्याने १०८ धावा केल्या. त्याच्यासह पॉल कॉलिंगहूडनेही १०८ धावांची शतकी खेळी केली. त्यामुळे इंग्लंडने दुसरा डाव ९ बाद ३११ धावांवर घोषित केला आणि भारताला ३८७ धावांचे मोठे आव्हान दिले. अनेकांना हे आव्हान पाहून आता भारतीय संघ एकतर पराभूत होईल किंवा सामना अनिर्णित राहाणार असे वाटले होते.
मात्र, भारताकडून सलामीवीर गौतम गंभीर आणि विरेंद्र सेहवागने शानदार सुरुवात केली. त्यांनी चौथ्या दिवसाखेरपर्यंत भारताला १०० धावांचा आकडाही पार करुन दिला होता. सेहवागने आक्रमक खेळताना केवळ ६८ चेंडूत ११ चौकार आणि ४ षटकारांची बरसात करत ८३ धावा केल्या होत्या. त्याला दुसऱ्या बाजूने गंभीरने भक्कम साथ दिली होती. सेहवागच्या या आक्रमणामुळे भारताच्या विजयाच्या आशा पल्लवित झाल्या. सेहवाग आणि गंभीरमध्ये ११७ धावांची भागीदारी झाली होती.
सेहवागचे हे आक्रमण अखेर चौथा दिवस संपण्याआधी ग्रॅमी स्वानने थांबवले. त्याने सेहवागला पायचीत केले. पण त्यानंतरही पाचव्या दिवशी गंभीरने(६६) अर्धशतक पूर्ण केले. तसेच सचिन तेंडुलकरने शतकी खेळी करत भारताच्या डावाला आकार दिला. त्याला युवराज सिंगने तोलामोलाची साथ दिली. सचिन आणि युवराजमध्ये १६३ धावांची नाबाद भागीदारी झाली. त्यांच्या या भागीदारीने भारताच्या विजयाचा कळस चढवला. सचिनने नाबाद १०९ आणि युवराजने नाबाद ८५ धावांची खेळी केली.
भारताने चौथ्या डावात अशक्य वाटणारे ३८७ धावांचे आव्हान केवळ ४ गडी गमावत पूर्ण केले होते आणि इतिहास रचला होता.
ऐतिहासिक सामन्याचे साक्षीदार असलेले २ खेळाडू आजही इंग्लड आणि भारताच्या सक्रिय संघात –
या ऐतिहासिक सामन्याचे साक्षीदार असलेले २ खेळाडू आजही कसोटी क्रिकेटमध्ये सक्रिय असून आगामी भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत खेळताना दिसणार आहेत. हे दोन खेळाडू म्हणजे जेम्स अँडरसन आणि इशांत शर्मा. २००८ साली झालेल्या चेन्नई कसोटीत अँडरसन हा इंग्लंडच्या अंतिम ११ जणांच्या संघाचा तर इशांत भारताच्या अंतिम ११ जणांच्या संघाचा भाग होता. या दोघांव्यतिरिक्त या सामन्यात खेळलेले अन्य २० खेळाडू आता कसोटी क्रिकेटमध्ये सक्रिय नाहीत.
सन २००८ ला झालेल्या या चेन्नई कसोटीत इशांतने दोन्ही डावात मिळून ४ विकेट्स घेतल्या होत्या. तर अँडरसनने २ विकेट्स घेतल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या –
…आणि पाकिस्तानी क्रिकेटरने मैदानावरच घातला क्विंटन डी कॉकशी वाद, पाहा व्हिडिओ
जसप्रीत बुमराह करतोय अनिल कुंबळेप्रमाणे फिरकी गोलंदाजी, बीसीसीआयने शेअर केला व्हिडीओ