---Advertisement---

डेवॉन कॉनवेची विकेट इशांत शर्मासाठी ‘विक्रमी’; कुंबळे, कपिल देव, झहीरच्या पंक्तीत मिळवले स्थान

On: सोमवार, जून 21, 2021 1:27 AM
---Advertisement---

साऊथॅम्पटन। आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात द रोज बाऊल स्टेडियम होत आहे. या सामन्याचा रविवारी तिसरा दिवस होता. या दिवशी खेळताना भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने एक खास विक्रम करत दिग्गज गोलंदाजांच्या पंक्तीत स्थान मिळवले आहे.

या सामन्यात रविवारी भारताचा पहिला डाव २१७ धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर न्यूझीलंडचा संघ पहिल्या डावात फलंदाजीसाठी उतरला. न्यूझीलंडकडून डेवॉन कॉनवे आणि टॉम लॅथमने शानदार सुरुवात करत ७० धावांची सलामी दिली. पण लॅथम ३० धावा करुन बाद झाला. मात्र, यानंतरही कॉनवेने आपला खेळ पुढे चांगल्या लयीत सुरु ठेवत अर्धशतक झळकावले. त्यामुळे तो आता भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरणार असे वाटत असतानाच इशांत शर्माने त्याला ४९ व्या षटकात ५४ धावांवर बाद केले. मोहम्मद शमीने त्याचा झेल घेतला. या विकेटमुळे इशांत शर्माने अनिल कुंबळे, कपिल देव आणि झहीर खान यांच्या पंक्तीत स्थान मिळवले.

इशांतच्या नावावर मोठा विक्रम
इशांतने कॉनवेला बाद करताच परदेशात कसोटी खेळताना २०० विकेट्स पूर्ण केल्या. असा टप्पा पार करणारा तो भारताचा केवळ चौथा गोलंदाज ठरला. यापूर्वी अनिल कुंबळे, कपिल देव आणि झहीर खान यांनाच हा पराक्रम करता आला आहे. इशांतने परदेशात ६१ कसोटी सामने खेळताना हा टप्पा गाठला आहे.

कसोटीमध्ये परदेशात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये अव्वल क्रमांकावर दिग्गज गोलंदाज अनिल कुबंळे आहे. त्याने परदेशात कसोटीमध्ये ६९ सामन्यात २६९ विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्यापाठोपाठ या यादीत २१५ विकेट्ससह कपिल देव आहेत. तर झहीर खानने २०७ विकेट्स परदेशात घेतल्या आहेत.

परदेशात सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज 
२६९ – अनिल कुंबळ (६९ सामने)
२१५ – कपिल देव (६६ सामने)
२०७ – झहीर खान (५४ सामने)
२०० – इशांत शर्मा (६१ सामने)
१५२ –  हरभजन सिंग (४८ सामने)

न्यूझीलंडचे पहिल्या डावात वर्चस्व
भारताचा पहिला डाव ९२.१ षटकात २१७ धावांवर संपुष्टात आला. भारताकडून उपकर्णधार अजिंक्य रहाणेने सर्वाधिक ४९ धावांची खेळी केली. तर कर्णधार विराट कोहलीने ४४ धावा केल्या. त्याव्यतिरिक्त रोहित शर्मा ३४, शुबमन गिल २८ आणि आर अश्विनने २२ धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडकडून गोलंदाजीत काईल जेमिसनने शानदार कामगिरी केली. त्याने या सामन्यात ३१ धावांत सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त नील वॅग्नर आणि ट्रेंट बोल्टने प्रत्येकी २ आणि टीम साऊथीने १ विकेट घेतली.

त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या न्यूझीलंडने लॅथम आणि कॉनवेच्या दमदार सलामीमुळे तिसऱ्या दिवसाखेर ४९ षटकांत २ बाद १०१ धावा केल्या. तिसऱ्या दिवसाखेर कर्णधार केन विलियम्सन १२ धावांवर आणि रॉस टेलर शुन्यावर नाबाद आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

कोहली-रहाणे जोडी नंबर एक! कसोटीमध्ये २०१३ पासून केलाय ‘हा’ पराक्रम

अन् अचानकपणे ट्विटरवर ट्रेंड होऊ लागला WTC फायनलमध्ये खेळत नसलेला भुवनेश्वर कुमार, ‘हे’ आहे कारण

“…त्या दिवशी मी क्रिकेट खेळणे सोडून देईल”, आर अश्विनचे मोठे वक्तव्य

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---