चेन्नई कसोटी सामन्यात इंग्लंड संघाने भारतीय संघासमोर ४२० धावांचे बलाढ्य लक्ष ठेवले आहे. चौथ्या दिवसखेर भारतीय संघाला फलंदाजी करण्याची संधी मिळाली. बलाढ्य लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाचा ३९ धावांवर एक फलंदाज बाद झाला आहे. सलामीचा फलंदाज रोहित शर्मा हा अवघ्या १२ धावा करत माघारी परतला आहे. मात्र वेगवान गोलंदाज ईशांत शर्माने दिवसाचा खेळ संपल्यानंतर प्रतिक्रिया देताना भारतीय संघ शेवटच्या दिवशी विजयासाठी प्रयत्न करेल, असे स्पष्ट केले.
ईशांत शर्माने गाठला ३०० बळींचा टप्पा
ईशांत शर्माने पहिल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी गोलंदाजी करतांना कारकिर्दीतील ३०० बळींचा टप्पा गाठला. आपल्या कसोटी कारकिर्दीला त्याने रोलर कोस्टर असे संबोधत तो म्हणाला, “तुम्हाला खूप अनुभव आलेला असतो, खूप प्रशिक्षकांनी तुम्हाला शिकवलेले असते की उपमहाद्विपा बाहेर जाऊन कशी गोलंदाजी करायची.” ईशांत शर्मा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी खेळून आला आहे. यावर तो म्हणाला, “स्थानिक क्रिकेटमध्ये चार षटकांची गोलंदाजी करावी लागत होती. आता ३५ षटकांची गोलंदाजी करावी लागत आहे.”
“आम्ही धावांचा यशस्वी पाठलाग करू शकतो”
धावांचा पाठलाग करण्याबाबत ईशांत शर्मा म्हणाला, “उद्या जर आम्हाला चांगली सुरुवात मिळाली तर आम्ही हे लक्ष्य पूर्ण करू शकतो. कारण आमच्याकडे चांगले फलंदाज आहेत जे निडर होऊन खेळू शकतात आणि धावांचा पाठलाग करू शकतात. आम्ही ९ विकेट्सचा नाही, तर, ३८१ धावांचा विचार करत आहोत.”
पुढे तो म्हणाला, “पहिल्या दोन दिवसात खेळपट्टीने आमच्या फिरकी गोलंदाजांना साथ नाही दिली. असे वाटत होते की आम्ही रस्त्यावर खेळत आहोत. परंतु चौथ्या दिवशी हे सर्व बदलले आणि चेंडू फिरायला लागला होता. ही मोठी गोष्ट आहे की, भारतीय संघाला इंग्लंड संघाने ४२० धावांचे लक्ष्य दिले आहे. भारतीय संघाचा पहिला फलंदाज बाद झाला आहे. तसेच इतर फलंदाजांना ही फलंदाजी करण्यास कठीण होणार आहे. सुरुवातीचे दोन तास महत्वाचे ठरणार आहेत.” ईशांत शर्माने भारतीय संघाचे इरादे स्पष्ट केले असल्याने पाचव्या दिवशी चुरशीची लढत होण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे.
महत्वाच्या बातम्या:
इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित सामन्यात कोहली किमान एक-दोन शतके नक्की ठोकेल, माजी कर्णधाराची भविष्यवाणी
पुन्हा एकदा फ्लॉप झाल्याने रोहितवर भडकले नेटकरी, संघाबाहेर काढण्याचीही केली मागणी
आयएसएल २०२०-२१ : सहा गोलांच्या थरारात मुंबई सिटी-गोवा बरोबरी