पुणे: सामन्याच्या अतिरिक्त वेळेत एमिलियानो अल्फारो याने नोंदविलेल्या शानदार गोलच्या बळावर एफसी पुणे सिटीने हिरो इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत बुधवारी पूर्ण तीन गुणांची कमाई केली. घरच्या मैदानावरील एफसी पुणे सिटीने आजच्या विजयामुळे गुणतक्त्यात दुसऱ्या स्थानी झेप घेतली. त्यांचा हा दुसरा विजय होता.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथे पार पडलेल्या या सामन्यात 8211 पुणेकरांनी उपस्थिती लावली होती. या सामन्याला बॉलिवूड सुपरस्टार अर्जुन कपूर व रणबीर कपूर देखील आपल्या संघाच्या पाठिंब्यासाठी उपस्थित होते.
सामन्यात 12व्या मिनिटाला बलजीत साहनी याने दिलेल्या पासवर राफेल लोपेज याने मारलेला चेंडू मुंबई संघाच्या गोलरक्षकाने अडविला. त्यांनंतर तीनच मिनिटांनी मुंबई संघाच्या बलवंत सिंग याने मिळालेल्या संधीचे सोने करत गोल करून संघाचे खाते उघडले.
25व्या मिनिटाला फ्री किकवर मर्सिलीनो परेरा याने दिलेल्या पासवर गुरतेज सिंगने हेडरद्वारे मारलेला चेंडू गोलकक्षाच्या जवळून गेला. त्यांनंतर दिएगो कार्लोस, एमिलियानो अल्फारो यांनी सुरेख चाली रचल्या, पण त्याचे त्यांना गोलात रूपांतर करण्यात अपयश आले.
उत्तरार्धात एफसी पुणे सिटी संघाच्या खेळाडूंनी आपल्या खेळात नवीन रणनिती आखत जोरदार चढयांना प्रारंभ केला. 74व्या मिनिटाला मुंबईच्या आघाडीच्या फळीने एमिलियानो अल्फारो हा बॉक्समध्ये असताना अवैधरित्या पाडले व त्यामुळे पंचांनी एफसी पुणे सिटीला पेनल्टी किक बहाल केली.
याचाच फायदा घेत एमिलियानो अल्फारोने गोल करून संघाला बरोबरी साधून दिली. त्यांनंतर एफसी पुणे सिटीच्या खेळाडूंनी आपली आक्रमणाची धार अधिक तीव्र केली. सामन्याच्या अतिरिक्त वेळेत 93व्या मिनिटाला दिएगो कार्लोस याने डाव्या बगलेतून चेंडू क्रॉस पास केल्यानंतर एमिलियानो अल्फारोने चेंडूवर उत्तम ताबा मिळवला.
मुंबई सिटीचा गोलरक्षक अमरिंदर सिंग हा चेंडू अडविण्यासाठी पुढे आला. परंतु तो गडबडला. त्याचा लाभ उठवत अल्फारोने चेंडूला गोलजाळीची अचूक दिशा दाखविली व संघाला 2-1 अशा फरकाने विजय मिळवून दिला.