पुणे। हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) नॉर्थइस्ट युनायटेड एफसीने आज (27 नोव्हेंबर) एफसी पुणे सिटीवर 2-0 असा सफाईदार विजय मिळविला. याबरोबरच नॉर्थइस्टने गुणतालिकेत दुसरे स्थान गाठले आहे.
नायजेरियाचा हुकमी स्ट्रायकर बार्थोलोम्यू ओगबेचे याने पूर्वार्धात गोल केला, तर अखेरच्या मिनिटाला जुआन मॅस्कीया याने पेनल्टी सत्कारणी लावली.
नॉर्थइस्टने आठ सामन्यांत पाचवा विजय मिळविला असून दोन बरोबरी व एका पराभवास त्यांचे 17 गुण झाले आहेत. नॉर्थइस्टने दुसरे स्थान गाठले. त्यांनी एफसी गोवा (8 सामन्यांतून 16) व जमशेदपूर एफसी (9 सामन्यांतून 14) यांना मागे टाकले. बेंगळुरू एफसी सात सामन्यांतून 19 गुणांसह आघाडीवर आहे. पुण्याला नऊ सामन्यांत सहावा पराभव पत्करावा लागला. एक विजय व दोन बरोबरींसह त्यांचे पाच गुण असून त्यांचे आठवे स्थान कायम राहिले.
ओगबेचेने 23व्या मिनिटाला लक्ष्य साधले. कॉर्नरवर फेडेरिको गॅलेगोने अप्रतिम चेंडू मारला. ओगबेचने छातीवर चेंडू नियंत्रित केला आणि सफाईने नेटमध्ये घालविला. त्याचा हा मोसमातील आठवा गोल आहे. अखेरच्या मिनिटाला साहील पन्वरने मॅस्कीया याला पाडले. त्यामुळे पंचांनी नॉर्थइस्टला पेनल्टी बहाल केली. मॅस्कीयाने नेटच्या डाव्या कोपऱ्यात फटका मारत ही संधी सत्कारणी लावली.
नॉर्थइस्टने अपेक्षेप्रमाणे सकारात्मक सुरवात केली. नवव्या मिनिटाला त्यांनी पहिला प्रयत्न केला. ओगबेचेने डावीकडून चेंडूवर ताबा मिळविला. स्वतःला संधी असूनही त्याने जुआन मॅस्कीया याला पास दिला. मॅस्कीयाने मारलेला फटका मात्र ब्लॉक झाला.
पुणे सिटीने 12व्या मिनिटाला चांगला प्रयत्न केला. मार्सिलिनियो याने कॉर्नरवर बॉक्समध्ये चेंडू मारला. हा चेंडू रॉलीन बोर्जेसने हेडिंगने बाजूला घालविला, पण तो आशिक कुरूनीयन याच्यापाशी गेला. कुरूनीयनने जाव्या पायाने फटका मारला, पण नॉर्थइस्टचा गोलरक्षक पवन कुमार याने उजवीकडे जात चेंडू अडविला. तेव्हा बचाव फळीतील सहकारी योग्य ठिकाणी नसल्यामुळे त्याने उघड नाराजी व्यक्त केली.
पुण्याच्या इयन ह्युम याने 16व्या मिनिटाला उजवीकडून मार्सेलिनीयोला छान पास दिला, पण फिनीशिंगअभावी ही चाल यशस्वी ठरली नाही. 21व्या मिनिटाला नॉर्थइस्टचा प्रयत्न थोडक्यात हुकला. रिगन सिंग याच्या दिर्घ पासनंतर ओगबेचे आणि कमलजीत यांच्यामध्ये चेंडू पडला. ओगबेचेने चेंडूवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू त्याच्या पायाला लागून कमलजीतकडे गेला. कमलजीतने उजवीकडे झेपावत चपळाईने बचाव अचूक केला.
28व्या मिनिटाला ओगबेचेने थेट पास देताच फेडेरिको गॅलेगोने मारलेला फटका क्रॉसबारवरून गेला. पुढच्याच मिनिटाला कुरुनियन याने डावीकडून मुसंडी मारली. त्याने ह्युमला पास दिला, पण उंचपुरा सेंटरबॅक मॅटो ग्रजिच याने ही चाल हाणून पाडली.
ह्यूम 34व्या मिनिटाला पुन्हा अचूकता साधू शकला नाही. त्यामुळे डावीकडून साहील पन्वर याने दिलेला पास वाया गेला. ह्युमने जास्त ताकद लावलेला फटका पवनने रोखला. 41व्या मिनिटाला पुण्याला फ्री किक मिळाली. त्यावर मार्सेलिनियो याने बॉक्समध्ये मारलेला चेंडू मॅट मिल्सने हेडिंग केला, पण पवनने नॉर्थइस्टचे नेट सुरक्षित राखताना अफलातून बचाव केला. दुसऱ्या सत्रात गॅलेगोने 47व्या मिनिटाला प्रयत्न केला होता.
महत्त्वाच्या बातम्या:
–प्रो कबड्डीच्या सहाव्या मोसमात श्रीकांत जाधवचा या विक्रमाच्या यादीत समावेश
–असा पराक्रम करणारा काशिलिंग अडके पहिला महाराष्ट्रीयन कबड्डीपटू
–भारतात होत असलेल्या हॉकी विश्वचषकाबद्दल जाणून घ्या सर्वकाही…
–मिताली राजचा प्रशिक्षकांवर मोठा आरोप, संघातून वगळण्याबाबत केला मोठा खूलासा