कोलकता। हिरो इंडियन सुपर लीगमध्ये सॉल्ट लेक येथील विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर बुधवारी बेंगलुरू एफसी विरुद्ध अॅटलेटिको दी कोलकाताचा (एटीके) सामना होणार आहे. एटीकेने मोहिमेला अडखळती सुरवात झाल्यानंतर पारडे थोडे फिरविले आहे. बेंगलुरूची सुनील छेत्री-मिकू ही स्ट्रायकर्सची जोडी फॉर्मात असल्यामुळे ही लढत यजमान संघासाठी आव्हानात्मक असेल. त्यानंतरही प्रतीस्पर्ध्याचा एकही गोल होऊ न देता क्लीन शीट राखण्याची आशा स्टीव कॉपेल यांच्या संघाला आहे.
एटीकेला घरच्या मैदानावर केरला ब्लास्टर्स आणि नॉर्थइस्ट युनायटेड एफसी यांच्याविरुद्ध पराभव पत्करावे लागले. त्यानंतर एटीकेने दिल्ली डायनॅमोजला हरवून पहिला विजय मिळविला. मग जमशेदपूर एफसीविरुद्ध त्यांनी बरोबरी साधली. घरच्या मैदानावर गतविजेत्या चेन्नईयीन एफसीला त्यांनी हरविले. एटीकेची आज कसोटी लागेल.
कॉपेल यांनी सांगितले की, “घरच्या मैदानावरील विजय हा इतर एखाद्या विजयासारखा असतो. आयएसएलमध्ये घरच्या मैदानावर जिंकणे अवघड दिसते, पण मागील सामना आम्ही जिंकला. त्यामुळे गवसलेला फॉर्म आणखी वाढविण्यास आणि पुन्हा जिंकण्यास आम्ही उत्सुक आहोत.”
एटीकेने मोसमापूर्वी आपल्या संघाच्या स्वरुपात बरेच बदल केले. स्टार स्ट्रायकर कालू उचे याला फॉर्म गवसल्यामुळे त्यांना आनंद झाला असेल. कालूने चेन्नईयीनविरुद्ध वैयक्तिक खाते उघडले. यंदा घरच्या मैदानावरील गोलची प्रतिक्षा संघाने संपविल्यामुळे कॉपेल यांना विशेष आनंद झाला आहे. पहिल्या दोन सामन्यांत ब्लास्टर्स आणि नॉर्थइस्टविरुद्ध त्यांना हे जमले नव्हते.
चेन्नईयीनविरुद्ध फॉर्म गवसलेला आणखी एक खेळाडू म्हणजे जॉन जॉन्सन. तो आधी बेंगलुरूकडे होता. आता तो बरीच वर्षे सहकारी राहिलेल्यांविरुद्ध मैदानावर उतरेल. जॉन्सनला नव्या क्लबसाठी आधीच्या क्लबविरुद्ध क्लीन शीट राखण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडावी लागेल. यंदा क्लीन शीट राखू न शकलेल्या दोन संघांमध्ये एटीकेचा समावेश आहे.
इंग्लंडचे कॉपेल म्हणाले की, “प्रत्येक प्रशिक्षकाला क्लीन शीट राखायला आवडते. आम्ही त्यासाठी प्रयत्न करतो. आम्हाला आतापर्यंत ते एकदाही जमलेले नाही. त्यामुळे उद्या ते साध्य करणे आमचे पहिले उद्दीष्ट असेल.”
बेंगलुरूविरुद्ध हे साध्य करणे सोपे मात्र नक्कीच नसेल. गतउपविजेत्या बेंगलुरूने नवे प्रशिक्षक कार्लेस कुआद्रात यांच्या मार्गदर्शनाखाली जोरदार प्रारंभ केला आहे. मिकू आणि छेत्री यांनी गोल केले आहेत. संघाच्या सहा पैकी पाच गोलांमध्ये या जोडीचा वाटा आहे.
कुआद्रात म्हणाले की, “गेल्या मोसमात त्यांनी बरेच गोल केले. या मोसमात सुद्धा त्यांची कामगिरी सर्वोत्तम व्हावी हीच मुख्य संकल्पना आहे. हे दोघे व्यावसायिक खेळाडू आहेत. चांगल्या कामगिरीसाठी ते आतूर आहेत.”
बेंगलुरूने घरच्या मैदानावर भक्कम कामगिरी केली आहे. त्याचवेळी प्रतिस्पर्ध्याच्या मैदानावरील सामन्यांत त्यांची कामगिरी सनसनाटी आहे. गेल्या मोसमात पदार्पण केल्यापासून त्यांनी नऊ बाहेरील मैदानावर सामन्यांत सात विजय मिळविले आहेत. येथे दाखल होताना त्यांच्या खात्यात पाच बाहेरील मैदानावरील विजयांची नोंद आहे.
गेल्या मोसमात एटीकेविरुद्ध बेंगलुरूने दोन्ही सामने जिंकले. त्यामुळे हे वर्चस्व कायम राखण्याची कुआद्रात यांना आशा असेल. बुधवारी हे चित्र बदलण्यात एटीकेला यश येणार का याची उत्सुकता असेल. त्याआधी आधी त्यांना बेंगलुरूविरुद्ध पहिला गोल करून दाखवावा लागेल.
महत्त्वाच्या बातम्या:
–ISL 2018: दिल्लीला दणका देत नॉर्थइस्टची आघाडी
–कार्तिक आणि पंत या दोघांपेक्षा धोनीच भारी…तरीही टी२०मधुन वगळले
–क्रिस्तीयानो रोनाल्डोच्या इंस्टाग्राम फाॅलोवर्सचा नंबर ऐकून तूम्ही अवाक व्हाल