मुंबई: एफसी गोवा संघाने स्पेनच्या सर्जिओ लॉबेरा यांच्याबरोबरील मुख्य प्रशिक्षकपदाचा करार आणखी एका वर्षाने वाढविला आहे. त्यामुळे हिरो इंडियन सुपर लिगमधील (आयएसएल) प्रतिस्पर्धी हताश झाले असतील, तर त्रयस्थ चाहत्यांना आनंद झाला असेल. झिको यांच्या कारकिर्दीत उपविजेता ठरलेल्या एफसी गोवा संघाला जेतेपद जिंकून देणे लॉबेरा यांना जमणार का याची उत्सुकता आहे.
लॉबेरा यांच्या मार्गदर्शनाखाली हा संघ गेल्या मोसमापासून धडाकेबाज खेळाची दणदणीत पर्वणी चाहत्यांना देत आहे. सामन्याच्या सुरवातीपासून सतत फ्रंटफूटवर खेळणाऱ्या एफसी गोवा संघाच्या प्रेमात सारेच चाहते पडले आहेत. त्या आधीच्या मोसमांमध्येही एफसी गोवा संघाचा खेळ आक्रमक असायचा. ब्राझीलचे मातब्बर झिको तेव्हा मार्गदर्शक होते. लॉबेरा यांच्या कारकिर्दीत मात्र एफसी गोवा संघाच्या शैलीत एक प्रकारची पद्धतशीर प्रक्रिया विकसित झाली आहे. या संघाचा धडाका रोखणे प्रतिस्पर्धी संघांना जवळपास अशक्य ठरते आहे.
लॉबेरा यांनी सांगितले की, माझ्यासाठी हा अनुभव अप्रतिम आहे. व्यक्तीशः मी क्लबचे आभार मानू इच्छितो. याचे कारण क्लबच्या प्रमुख मंडळींनी आदर्श अशी वातावरणनिर्मिती केली आहे. त्यामुळे आम्ही संघातील मंडळी वैयक्तिक आणि व्यावसायिक पातळीवर विकसित होऊ शकतो. आम्हाला आणखी बरेच काही करायचे आहे. मला निश्चयाने सातत्य राखावे लागेल. खेळात सुधारणा व्हावी आणि क्लबची भविष्यात क्षमतेनुसार कामगिरी व्हावी म्हणून मला दररोज स्वतःसमोर आव्हान ठेवावे लागेल.
झिको यांच्या कारकिर्दीत एफसी गोवाने 2015 मध्ये उपविजेतेपद मिळविले होते. त्यापेक्षा सरस कामगिरीचे अर्थात अंतिम अडथळा पार करण्याचे आव्हान एफसी गोवासमोर असेल. तेव्हा फातोर्डा येथील नेहरू स्टेडियमवर अंतिम सामना झाला होता. चेन्नईयीन एफसीविरुद्ध एफसी गोवाला 2-3 असे पराभूत व्हावे लागले होते. लॉबेरा आता संघाला जेतेपदापर्यंत नेणार का असा प्रश्न आहे आणि याचे उत्तर होकारार्थी मिळणे शक्य आहे.
यंदाच्या मोसमात एफसी गोवाने सात सामन्यांत 21 गोलांचा धडाका लावला आहे. सर्वाधिक गोलांच्या सांघिक क्रमवारीत जमशेदपूर एफसी दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यापेक्षा एफसी गोवाचे सात गोल जास्त आहेत.
लॉबेरा यांच्या संघासाठी आक्रमण हाच सर्वोत्तम बचाव असल्याच मुद्दा यावरून अधोरेखित होतो. वैयक्तिक क्रमवारीत लॉबेरा यांच्या संघाचा धडाकेबाज स्ट्रायकर फेरॅन कोरोमीनास सहा सामन्यांतून आठ गोल आणि चार अॅसिस्टसह आघाडीवर आहे. त्याने गेल्या मोसमापासून पुढे सुरवात केल्याचे जाणवते. त्याचवेळी त्याने कामगिरी कित्येक पटींनी उंचावली आहे. विशेष म्हणजे गेल्या मोसमातील तोलामोलाचा जोडीदार मॅन्युएल लँझरॉत हा यंदा त्याच्याबरोबर नाही.
केवळ कोरो हाच योग्य वेळी योग्य ठिकाणी आहे असे नाही. कोरोच्या अफाट आक्रमक खेळाला एफसी गोवाच्या इतर सहकाऱ्यांनी सांघिक पातळीवर समर्थपणे साथ दिली आहे. त्यामुळे या संघाची कामगिरी बहरली आहे.
यासाठी एफसी पुणे सिटी संघावरील जोरदार विजयाचे उदाहरण देता येईल. त्या लढतीत ह्युगो बौमौस आणि जॅकीचंद सिंग यांनी कोरोशी सुंदर समन्वय साधला. त्यामुळे हे दोघे त्यांच्या वाट्याला आलेल्या संधींचा फायदा उठवू शकले. हे एकूण आक्रमणासाठी फलदायी ठरले.
मुंबईविरुद्ध या संघाने पाच गोलांचा पाऊस पाडला. त्यावेळी एदू बेदीया आणि जॅकीचंद या दोघांनी उत्तम समन्वय साधला होता. लॉबेरा यांचा एकूणच आक्रमक स्वरुपाचा संघ त्यांना अपेक्षित असलेल्या ब्रँडचा खेळ प्रदर्शित करतो आहे. त्यामुळे या संघाने यंदा वेगळीच उंची गाठली आहे.
आता मध्य फळीकडे वळूयात आणि बारकाईने निरीक्षण करुयात. स्पर्धेच्या या टप्यालाच त्यामुळे आश्चर्य वाटेल. याचे कारण एफसी गोवा संघाचे चार मध्यरक्षक सर्वाधिक गोलांच्या वैयक्तिक क्रमवारीत आहेत. अहमद जाहौह, बेदिया, लेनी रॉड्रीग्ज आणि बौमौस यांचा यात समावेश आहे.
यानंतरही स्पर्धेतील सर्वाधिक पासेसच्या क्रमवारीत एफसी गोवा तिसऱ्याच क्रमांकावर आहे. यावरून हा संघ चाल सफाईदार पद्धतीने आणि विलक्षण वेगाने रचतो हे तुमच्या लक्षात येईल.
यासंदर्भात एका खेळाडूचा खास उल्लेख करावा लागेल आणि तो म्हणजे जाहौह. मोरोक्कोचा हा खेळाडू संघासाठी जणू काही फाईंड ठरला आहे. तो संघाचा एकप्रकारे कणा ठरला आहे. प्रतिस्पर्ध्यांना रोखण्याच्या क्रमवारीत लेनीच्या साथीत जाहौह टॉप थ्रीमध्ये आहे. त्यामुळे एफसी गोवा संघाची मध्य फळी ओलांडून जाणे प्रतीस्पर्ध्यांना सर्वाधिक खडतर ठरते आहे.
लॉबेरा यांनी सांगितले की, गेल्या मोसमातील आमच्या आक्रमणाच्या आकडेवारीचा उच्चांक मागे टाकणे इतरांना अवघड असेल. याचे कारण आम्ही काही रेकॉर्ड मोडतो आहोत, पण बचावाच्या आघाडीवर आम्ही अजूनही सुधारणा करू शकतो. आम्ही त्यासाठीच सरावाद्वारे प्रयत्नशील राहू.
एफसी गोवा संघाने निव्वळ इच्छाशक्ती आणि गुणवत्तेच्या जोरावर आयएसएलमधील सर्वाधिक आक्रमक संघ असा लौकीक निर्माण केला आहे. त्यांच्या खेळाडूंना एकमेकांच्या कौशल्याची अचूक कल्पना असल्यामुळे हा संघ लॉबेरा यांच्या कार्यपद्धतीची भक्कम अंमलबजावणी करतो आणि त्याद्वारे मनोरंजक खेळ प्रदर्शित होतो.
त्यामुळेच इतरांपेक्षा एफसी गोवा संघाचा खेळ खिळवून ठेवतो. अशा परिस्थितीत लॉबेरा यांच्याबरोबरील करार वाढविण्यात आल्यामुळे एफसी गोवा संघ अजूनही बरीच पर्वणी देत राहील हे नक्की.








