कोची| हिरो इंडियन सुपर लीगमध्ये आज (4 डिसेंबर) केरळा ब्लास्टर्सची जमशेदपूर एफसीविरुद्ध लढत होत आहे. यंदाचा मोसम फेरीगणिक ब्लास्टर्सकरीता निराशाजनक ठरतो आहे. त्यांना मोहिम रुळावर आणण्यासाठी उपलब्ध असलेला वेळ कमी होत चालला आहे.
दोन वेळा अंतिम फेरी गाठलेला ब्लास्टर्स संघ गेल्या मोसमात प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवू शकला नाही. या मोसमात ते पारडे फिरविण्याची अपेक्षा होती, पण सलामीला एटीकेला हरविल्यानंतर त्यांच्या कामगिरीत घसरण झाली आहे. यानंतरही आव्हान त्यांच्या हातात आहे. डेव्हिड जेम्स यांचा संघ अजूनही पहिल्या चार संघांमध्ये स्थान मिळवून आगेकूच करू शकतो. त्यासाठी त्यांना सर्वप्रथम जिंकायला सुरवात करावी लागेल. मंगळवारी घरच्या मैदानावर अर्थात नेहरू स्टेडियमवरील लढतीसह त्यांची मोहिम सुरु होईल.
आयएसएलच्या इतिहासात ब्लास्टर्सला सर्वांत खराब मालिकेचा सामना करावा लागला आहे. आठ सामन्यांत त्यांना एकही विजय मिळविता आलेला नाही. यास बहुतांश प्रमाणावर त्यांचाच संघ जबाबदार आहे. जेम्स यांच्या संघाने जिंकण्याच्या स्थितीतून कदाचित सात गुण गमावले आहेत. अखेरच्या क्षणी त्यांना गोल पत्करावे लागले आहेत.
जेम्स यांनी सांगितले की, “बऱ्याच सामन्यांत आम्ही चुरशीने खेळलो. मोसमाच्या प्रारंभी काही निर्णय आमच्या बाजूने लागले नाहीत. कदाचित आम्ही जास्त संधी निर्माण करायला हव्या होत्या. मुख्य प्रशिक्षक म्हणून मला प्रत्येक सामना जिंकायचा असतो आणि प्रेक्षकांना पर्वणी द्यायची असते. आम्ही केलेली खेळाडूंची निवड पाहता पहिल्या वर्षी अंतिम फेरी गाठण्याची अपेक्षा नव्हती. एटीकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात आम्ही जिंकू शकतो हे दाखवून दिले. आम्ही प्रशिक्षक आणि खेळाडू मिळून एक गोष्ट करू शकतो आणि ते म्हणजे शंभर टक्के प्रयत्न करणे.”
आज ब्लास्टर्सला आणखी एक पराभव पत्करावा लागला तर प्ले-ऑफमध्ये स्थान मिळविण्याचे आव्हान आणखी खडतर झालेले असेल. गेल्या मोसमात प्ले-ऑफमधील प्रवेशाचा निकष 30 गुणांपर्यंत गेला होता. हरल्यास आठ सामने बाकी असताना ब्लास्टर्सच्या खात्यात आठच गुण जमा असतील.
करेज पेकुसन आणि स्लावीसा स्टोयानोविच यांनी सरावात पुन्हा सहभाग घेतला आहे. ही बाब जेम्स यांच्यासाठी उत्साहवर्धक आहे.
ब्लास्टर्सचा प्रतिस्पर्धी जमशेदपूर हा संघ सुद्धा या लढतीस सामोरे जाताना सर्वोत्तम फॉर्मात नाही. त्यांनी एकच सामना गमावला असला तरी दहा सामन्यांत त्यांना सहा बरोबरी पत्कराव्या लागल्या आहेत. त्यामुळे त्यांची आगेकूच खंडित होत आहे. मागील सामन्यात जमशेदपूरला मोसमात प्रथमच एकही गोल करता आला नाही. नॉर्थइस्ट युनायटेड एफसीविरुद्ध त्यांना गोलशून्य बरोबरीवर समाधान मानावे लागले.
त्यांच्या संघाला मध्य फळीतील आक्रमक खेळाडू सर्जिओ सिदोंचा याची उणीव जाणवत आहे. त्याने तीन गोल आणि अॅसिस्ट केले आहेत. जमशेदपूरचे प्रशिक्षक सेझार फरांडो यांनी सांगितले की, ब्लास्टर्सचा संघ खूप चांगला खेळ करू शकला असता. इतके सामने बरोबरीत सुटण्याइतक्या कमी योग्यतेचा त्यांचा खेळ नव्हता. त्यांचा संघ चांगला असून प्रशिक्षकही चांगले आहेत. ते घरच्या मैदानावर स्थानिक प्रेक्षकांसमोर खेळणार असतील, पण आम्ही खेळण्यास सज्ज आहोत.
स्पेनच्या फरांडो यांनी स्टार खेळाडू टीम कॅहील याला अद्याप पुरेशी संधी दिलेली नाही. तो अद्याप 90 मिनिटे खेळलेला नाही. 329 मिनिटांच्या खेळात त्याला एकमेव गोल करता आला आहे. जमशेदपूरमधील लढतीत ब्लास्टर्सविरुद्धच त्याने ही कामगिरी केली.
फरांडो यांनी सांगितले की, टीम फार चांगला खेळत आहे. दहा दिवसांपूर्वीच तो ऑस्ट्रेलियाहून आला. तो या लढतीसाठी सज्ज असेल असे वाटते. आम्हाला त्याच्या मदतीची गरज आहे.
ब्लास्टर्सचा संघ आशा पल्लवित करण्यासाठी जोरदार खेळ करण्याची अपेक्षा आहे. अशावेळी अनुकूल निकाल साधण्यास जमशेदपूर प्रयत्नशील राहील.
महत्त्वाच्या बातम्या:
–ISL 2018: पेनल्टी, स्वयंगोलसह दिल्ली मुंबईकडून गारद
–हॉकी विश्वचषक २०१८: अर्जेंटिनाचा संघ उपांत्यपूर्व फेरीत दाखल
–टीम इंडियाचा अपमान करणाऱ्या आॅस्ट्रेलियन मीडियाला सुनावले आॅस्ट्रेलियन नागरिकांनी खडेबोल