मुंबई। हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) आज (6 डिसेंबर) मुंबई सिटीची गतविजेत्या चेन्नईयीन एफसीविरुद्ध लढत होणार आहे. मुंबईने यंदाच्या मोसमात उत्तम कामगिरी केली आहे, पण जोर्गे कोस्टा यांच्या संघाला अजूनही मोठी मजल मारण्याची गरज असून त्यासाठी विक्रम करण्याची संधी आहे. दुसरीकडे चेन्नईयीनला जेतेपद राखण्यासाठी चमत्कार घडवावा लागेल.
मुंबईचा संघ पाच सामन्यांत अपराजित आहे. यात त्यांनी चार विजय मिळविले आहेत. चेन्नईयीनविरुद्ध पराभव टाळल्यास त्यांना आयएसएलमधील आपली सर्वोत्तम मालिका नोंदविता येईल. मुंबईला या वाटचालीचे बहुतांश श्रेय चिवट बचाव फळीला द्यावे लागेल. एफसी गोवा संघाविरुद्ध त्यांना पाच गोलांची नामुष्की पत्करावी लागली. त्यानंतर मात्र मुंबईविरुद्ध केवळ दोन गोल झाले आहेत.
गोव्याविरुद्धच्या पराभवानंतर मुंबईने पारडे फिरविले आहे. त्यानंतर हा संघ वेगळाच बनला आहे. त्यांच्या परदेशी खेळाडूंनी पुढाकार घेतला आहे. कोस्टा यांनी सांगितले की, गेल्या मोसमाच्या तुलनेत आम्ही बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत. मोसमाच्या प्रारंभी आम्हाला फारसा वेळ मिळाला नाही. आम्हाला नव्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास वेळ लागला. आम्ही सबबी पुढे करीत नाही. आम्हाला तीन गुणांसाठी कसून सराव आणि संघर्ष सुरु ठेवावा लागेल.
पाऊल मॅचादो हा कोस्टा यांच्या संघासाठी मुख्य शिल्पकार ठरला आहे. त्याने मध्य फळीची मदार पेलली आहे. अरनॉल्ड इसोको उजवीकडून आगेकूच करीत आहे. त्याने प्रतिस्पर्धी बचाव फळीसाठी बरेच आव्हान निर्माण केले आहे.
मोडोऊ सौगौ याला चेन्नईतील 1-0 अशा विजयानंतर स्कोअर-शीटवर नाव कोरता आलेले नाही. चेन्नईयीनचा बचाव ढिसाळ असून त्यांच्याविरुद्ध 19 गोल झाले आहेत. त्यामुळे मोडोऊ याला गोलची प्रतिक्षा संपविण्याची संधी आहे.
चेन्नईयीनचे प्रशिक्षक जॉन ग्रेगरी यांनी प्रतिस्पर्ध्याचे कौतूक केले. ते म्हणाले की, मुंबईचा संघ चांगला संतुलित आहे. मला अरनॉल्ड आवडतो. त्याच्या ताब्यातून चेंडू घेणे फार अवघड असते. मॅटीयस मिराबाजे हा सुद्धा उत्तम खेळाडू आहे, पण त्याला सतत दुखापत होते. त्यांचा कर्णधार ल्युचीयन गोएन हा सुद्धा मला आवडतो. सांघिक कामगिरी हे मुंबईचे बलस्थान आहे. ते एकाही क्षेत्रात कमकुवत नसून फार संतुलित आहेत.
चेन्नईयीनसाठी आतापर्यंतचा मोसम निराशाजनक ठरला आहे. पहिल्या दहा सामन्यांत मिळून त्यांना केवळ पाच गुण मिळविता आले आहेत. आता त्यांचे आठ सामने बाकी आहेत. पहिल्या चार संघांमध्ये स्थान मिळविण्यासाठी चमत्कार घडवावा लागेल असे ग्रेगरी यांना वाटते.
इंग्लंडचे ग्रेगरी म्हणाले की, आम्ही प्ले-ऑफपासून बरेच दूर आहोत. आम्हाला उरलेले आठही सामने जिंकावे लागतील. तरच आम्हाला प्ले-ऑफच्या आसपास जाण्याची संधी असेल. शेवटी फुटबॉलच्या खेळात अशक्य काहीच नसते. आम्हाला प्रतिष्ठा राखण्यासाठी काही गुण जिंकावे लागतील. याचे कारण आम्ही यंदा दर्जाच्या आसपासही कामगिरी करू शकलेलो नाही.
चेन्नईयीन इतक्यात हार मानण्यास तयार नसेल. त्यांना काही गोष्टी सिद्ध करून दाखवाव्या लागतील. त्यांचे खेळाडू नक्कीच दडपणाखाली आहेत. त्यांचे स्टार खेळाडू लौकीकास साजेसा खेळ करू शकलेले नाहीत. जेजे लालपेखलुआ याच्यासाठी हा मोसम सर्वांत खराब ठरला आहे. त्याला एकही गोल करता आलेला नाही. जेरी लालरीनझुला याचाही खेळ डळमळीत झाला आहे. आगेकूच करताना तो आधीसारखा प्रभाव पाडू शकलेला नाही.
महंमद रफी हा अनुभवी स्ट्रायकर आहे. त्याला सुरवातीपासून खेळण्याची संधी मिळेल. याचे कारण ग्रेगरी कामगिरीतील घसरण थांबविण्यासाठी संघाच्या स्वरुपात बरेच बदल करण्याची अपेक्षा आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–ISL 2018: चेंचोच्या भरपाई वेळेतील गोलमुळे बेंगळुरूची नॉर्थइस्टशी बरोबरी
–२०११ च्या विश्वचषकातील फक्त हे दोन खेळाडू सध्या टीम इंडियाकडून खेळत आहेत वनडे क्रिकेट
–Video: गंभीरचा दिलदारपणा; स्वत:चा सामनावीर पुरस्कार त्यावेळी दिला २१ वर्षीय कोहलीला