दिल्ली। हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) पाचव्या मोसमात नॉर्थइस्ट युनायटेड एफसीने दिल्ली डायनॅमोज एफसीला 2-0 असे हरविले. दिल्लीचा बचाव अंतिम टप्यात मोडून काढत नॉर्थइस्टने या दमदार विजयासह गुणतक्त्यात आघाडी घेतली. आठ मिनिटे बाकी असताना फेडेरीको गॅलेगो, तर भरपाई वेळेत बार्थोलोम्यू ओगबेचे यांनी गोल केले. नेहरू स्टेडियवरील लढत त्यामुळे निकाली ठरली.
नॉर्थइस्टने पाच सामन्यांत तिसरा विजय मिळविला असून दोन बरोबरी साधल्या आहेत. त्यांचे एकूण गुण 11 झाले. त्यांनी एफसी गोवा संघाला (4 सामन्यांतून 10 गुण) एका गुणाने मागे टाकत आघाडी घेतली आहे. बेंगळुरू एफसी, जमशेदपूर एफसी, एटीके, मुंबई सिटी यांचे प्रत्येकी सात गुण आहेत. दिल्लीला सहा सामन्यांत तिसरा पराभव पत्करावा लागला. त्यांनी तीन बरोबरी साधल्या आहेत. त्यांची मोसमातील पहिल्या विजयाची प्रतिक्षा लांबली. तीन गुणांसह त्यांचे आठवे स्थान कायम राहिले.
आठ मिनिटे बाकी असताना गॅलेगोने डावीकडून मुसंडी मारत बॉक्समध्ये प्रवेश केला. त्याने मैदानालगत मारलेला फटका रोखण्यासाठी दिल्लीचा गोलरक्षक फ्रान्सिस्को डोरोन्सोरो वेळीच हात खाली नेऊ शकला नाही. त्यामुळे चेंडू नेटमध्ये गेला. पाच मिनिटे बाकी असताना रेडीम ट्लांगने ओगबेचेला वेळीच पास न दिल्यामुळे ऑफसाईडचा इशारा झाला. भरपाई वेळेत गॅलेगोच्या चालीवर ओगबेचे याने लक्ष्य साधले. प्रीतम कोटल याने चेंडूवरील ताबा गमावल्यामुळे नॉर्थइस्टला ही संधी मिळाली.
सामन्याची सुरवात चांगली झाली. दोन्ही संघांनी भरपूर प्रयत्न केले. दुसऱ्याच मिनिटाला जियान्नी झुईवर्लून याने उजवीकडून चाल रचत प्रीतम कोटल याला पास देण्याचा प्रयत्न केला, पण नॉर्थइस्टचा गोलरक्षक पवन कुमार याने पुढे सरसावत बचाव चोख केला. पुढच्याच मिनिटाला नॉर्थइस्टने प्रयत्न केला. रॉबर्ट लालथ्लामुना याने आघाडी फळीतील जुआन मॅस्कीया याला अर्धरेषेपाशी पास दिला. जुआनने आगेकूच करीत मार्टी क्रेस्पीला चकविण्याचा प्रयत्न केला, पण त्यात तो फटका मारताना अचूकता साधू शकला नाही. त्यामुळे दिल्लीचा गोलरक्षक फ्रान्सिस्को डोरोन्सोरो याने चेंडू आरामात अडविला.
सहाव्या मिनिटाला पवन सुदैवी ठरला. त्याने मारलेला चेंडू थेट झुईवर्लून याच्याकडे गेला. 25 यार्डावरून झुईवर्लून याने फटका मारला, पण पवनने चपळाईने हालचाल करीत चेंडू अडविला. नॉर्थइस्टने लगेच प्रतिआक्रमण रचले. रेडीम ट्लांग याने उजवीकडून घोडदौड करीत बार्थोलोम्यू ओगबेचे याला बॉक्सबाहेर पास दिला. ओगबेचे याने डोरोन्सोरोला चकविले, पण चेंडू क्रॉसबारला लागला. 15व्या मिनिटाला नॉर्थइस्टला मिळालेला कॉर्नर रेडीमने घेतला. त्याने उजवीकडे नारायण दासला चकविले. तो आगेकूच करू लागताच दिल्लीच्या राणा घरामीने चेंडू रोखला.
पूर्वार्धातील महत्त्वाचा क्षण 26व्या मिनिटाला आला. रेगन सिंग याने हवेतून मारलेला चेंडू बॉक्समध्ये ओगबेचे याच्याकडे गेला. ओगबेचेला रोखण्याच्या प्रयत्नात क्रेस्पीने पाय मध्ये घातला. ओगबेचे पडला, पण पंचांनी नॉर्थइस्टचे पेनल्टीचे अपील फेटाळून लावले. दोन मिनिटांनी क्रेस्पीला चकवून ओगबेचेने आणखी एक प्रयत्न केला, पण चेंडू डोरोन्सोरो याच्या अगदी जवळ गेला. त्यामुळे डोरोन्सोरो सहज बचाव करू शकला.
34व्या मिनिटाला पवनने चेंडू मारण्यास अकारण विलंबन केला. त्यामुळे दिल्लीचा स्ट्रायकर अँड्रीया क्लाऊडेरोविच पुढे सरसावला, पण पवनला यावेळी सुद्धा नशीबाची साथ मिळाली. चेंडूवरील ताबा गमावूनही त्याने दुसऱ्या प्रयत्नात कसेबसे नियंत्रण मिळविले. पूर्वार्ध संपण्यास पाच मिनिटे बाकी असताना रॉलीन बोर्जेसला रेडीमकडून क्रॉस पास मिळाला. त्याने फटका मारला, पण राणा घरामीने चेंडू ब्लॉक केला. त्यामुळे कॉर्नर मिळाला. त्यावर मॅस्कीयाने मॅटो ग्रजिचसाठी संधी निर्माण केली, पण डोरोन्सोरोने बचाव केला.
दुसऱ्या सत्रात ओगबेचेने 50व्या मिनिटाला उजवीकडून आगेतकूच केली, पण त्याला रोखण्यात आले. पाच मिनिटांनी क्रेस्पीने मारलेला फटका स्टँडमध्ये गेला. 66व्या मिनिटाला झुईवर्लून याने फ्री किकवर मारलेला चेंडू मारताना क्लाऊडेरोविच अचूकता साधू शकला नाही. चेंडू त्याच्या पायाला लागून बाहेर गेला. 78व्या मिनिटाला क्लाऊडेरोविच याचा फटका ग्रजिचने ब्लॉक केला.
महत्त्वाच्या बातम्या:
–२०१८मध्ये राशिद खानला मागे टाकण्याची कुलदिपला संधी
–कार्तिक आणि पंत या दोघांपेक्षा धोनीच भारी…तरीही टी२०मधुन वगळले
–क्रिस्तीयानो रोनाल्डोच्या इंस्टाग्राम फाॅलोवर्सचा नंबर ऐकून तूम्ही अवाक व्हाल