---Advertisement---

ISL 2018: दिल्लीला पराभूत करत अपराजित बेंगळुरूची आघाडी

On: सोमवार, नोव्हेंबर 26, 2018 10:16 PM
---Advertisement---

बेंगळुरू। हिरो इंडियन सुपर लिगच्या (आयएसएल) पाचव्या मोसमात अद्याप अपराजित असलेल्या बेंगळुरू एफसीने दिल्ली डायनॅमोज एफसीला आज (26 नोव्हेंबर) घरच्या मैदानावर 1-0 असे पराभूत केले. यामुळे गतउपविजेत्या बेंगळुरूने सहाव्या विजयासह आघाडीच्या स्थानावर मुसंडी मारली.

श्री कांतीरवा स्टेडियमवर तीन मिनिटे बाकी असताना उदांता सिंग याने केलेला गोल निर्णायक ठरला. या पराभवामुळे दिल्लीची पहिल्या विजयाची प्रतिक्षा कायम राहिली. दिल्लीला असंख्य चालींचे फिनिशींग करता आले नाही. त्याचाच दिल्लीला फटका बसला.

आयएसएलमध्ये आतापर्यंत बेंगळूरु हा एकमेव अपराजित संघ आहे, तर दिल्ली हा एकही विजय न मिळालेला एकमेव संघ आहे. बेंगळुरूने सात सामन्यांत सहावा विजय मिळविला असून त्यांनी एक बरोबरी साधली आहे. त्यांचे सर्वाधिक 19 गुण झाले. बेंगळुरूने एफसी गोवा संघाला मागे टाकले. गोव्याचे आठ सामन्यांतून 16 गुण आहेत.

दुसऱ्या क्रमांकावरील जमशेदपूर एफसीने नऊ सामन्यांतून 14, तर चौथ्या स्थानावरील नॉर्थइस्ट युनायटेड एफसीने सात सामन्यांत 14 गुण मिळविले आहेत. पाचव्या क्रमांकावरील मुंबईचे सुद्धा आठ सामन्यांत 14 गुण आहेत. यंदा गुणतक्त्यातील चुरस पाहता बेंगळुरूने या टप्यास तीन गुणांची आघाडी घेणे पुढे जाऊन बहुमोल ठरेल.

तीन मिनिटे बाकी असताना कर्णधार सुनील छेत्रीने अथक प्रयत्न करीत चाल रचली. त्याचा पहिला फटका अडविला गेला, पण रिबाऊंडवर संधी मिळतचा दक्ष उदांताने चपळाई दाखवित चेंडू नेटमध्ये घालविला. त्यामुळे दिल्लीचा गोलरक्षक अल्बिनो गोम्स निरुत्तर झाला. दिल्लीचे प्रयत्न फोल ठरविणारा बेंगळुरूचा गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधू याची चपळाई सुद्धा यजमान संघासाठी महत्त्वाची ठरली.

बेंगळुरूने पहिला प्रयत्न दुसऱ्या मिनिटाला केला. निशू कुमारच्या क्रॉस शॉटवर राहुल भेकेने केलेल्या हेडिंगवर जियान्नी झुईवर्लून याने चेंडू ब्लॉक केला. रिबाऊंडवर भेकेला संधी मिळाली, पण यावेळी मार्टी क्रेस्पीने ब्लॉकिंग केले. सहाव्या मिनिटाला चेंचो गील्टशेन याने उदांता सिंगला पास दिला. उदांताने उजवीकडून आगेकूच करीत मारलेला चेंडू मात्र गोलपोस्टवरून गेला.

नवव्या मिनिटाला बेंगळुरूची चांगली संधी हुकली. झिस्को हर्नांडेझ याने छेत्रीला अप्रतिम पास दिला. छेत्रीने पहिल्या प्रयत्नात चेंडूवर नियंत्रण मिळविले, पण दुसऱ्या शॉटच्यावेळी त्याने जादा ताकद लावली आणि दिल्लीचा गोलरक्षक अल्बिनो गोम्स याने पुढे सरसावत चेंडू अडविला. दहाव्या मिनिटाला चेंचोने प्रयत्नपूर्वक चेंडूवर ताबा मिळवित बॉक्समध्ये प्रवेश करून फटका मारला, पण त्यात अचूकता नव्हती.

जियान्नी याने 13व्या मिनिटाला लालियनझुला छांगटे याला डावीकडे पास दिला. छांगटचा प्रयत्न मात्र स्वैर फटक्यामुळे अपयशी ठरला. 27व्या मिनिटाला दिल्लीचा आणखी एक चांगला प्रयत्न यशस्वी ठरला नाही. नंदकुमार शेखरने चेंडूवर ताबा मिळवित आगेकूच केली. त्याने उजवीकडून दिलेल्या पासवर अँड्रीया क्लाऊडेरोविच मात्र अचूक फटका मारू शकला नाही.

31व्या मिनिटाला अॅड्रीया कार्मोना याने छांगटेला सुंदर पास दिला. छांगटेने मात्र बेंगळुरूचा गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधू याच्या अगदी जवळून फटका मारला. त्यामुळे गुरप्रीत सहज बचाव करू शकला. 36व्या मिनिटाला छांगटे पुन्हा केंद्रस्थानी होता. त्याने डावीकडून केलेला पहिला प्रयत्न अचूक नव्हता, तरी त्याने क्रॉस शॉट मारला. चेंडू एका प्रतिस्पर्ध्याच्या डोक्याला लागून नंदकुमार याच्यापाशी केला, तो प्रयत्न करणार तोच रिनो अँटोने पाय मध्ये घालत चेंडू बाहेर घालविला. दिल्लीच्या मार्कोस टेबारने 43व्या मिनिटाला झिस्कोला मागून पाडले. त्यावेळी बंगळुरूने पेनल्टीचे अपील केले, पण पंचांनी ते फेटाळले.

उत्तरार्धाच्या प्रारंभीच उदांताने चाल रचली होती. त्याने उजवीकडून छेत्रीला पास दिला होता, पण अचूकतेअभावी हा प्रयत्न फसला. 53व्या मिनिटाला छांगटने क्लाऊडेरोविचला बॉक्समध्ये पास दिला. त्याने मारलेला फटका चुकला. चेंडू अॅड्रीया कॅर्मोन याला मिळाला, पण त्याच्या फटक्यात ताकद असली तरी अचूकता नव्हती. त्यामुळे गुरप्रीतने सहज बचाव केला.

महत्त्वाच्या बातम्या:

कर्णधार कोहलीला कसोटीत धावा करण्यापासून रोखण्याची आॅस्ट्रेलियाच्या यष्टीरक्षकाने व्यक्त केली आशा

धोनीबद्दल विचारताच गांगुलीने पाकिस्तानच्या अध्यक्षांना दिले होते हे गमतीशीर उत्तर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment