गोवा। सातव्या हिरो इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत गुरुवारी (४ नोव्हेंबर) एटीके मोहन बागानची फातोर्डा येथील नेहरू स्टेडियमवर ओडिशा एफसीविरुद्ध लढत होत आहे. दमदार फॉर्म कायम राखत धडाकेबाज विजय मिळवण्याचा एटीकेएमबीचा निर्धार असेल.
दोन्ही संघाची मोसमातील आतापर्यंतची स्थिती परस्परविरोधी राहिली आहे. ओडिशाला एकही विजय मिळविता आलेला नाही आणि त्यांचे स्थान खालच्या गटात आहे. दोन सामन्यांतून त्यांना केवळ एकच गुण मिळाला आहे. दुसरीकडे सलग तिसरा विजय मिळवून एटीकेएमबी गुणतक्त्यात आघाडी घेऊ शकतो.
जमशेदपूरविरुद्ध पिछाडीवरून बरोबरी साधत एक गुण मिळवून ओडिशाने खाते उघडले. त्यांच्या बचाव फळीची कामगिरी मात्र ढिसाळ झाली असल्यामुळे त्याबाबत चिंता असेल. स्टुअर्ट बॅक्सटर यांच्या संघाला आतापर्यंत २९ शॉट पत्करावे लागले असून जे संयुक्तरित्या सर्वाधिक प्रमाण आहे.
एटीकेएमबीचा स्ट्रायकर रॉय कृष्णा याने दोन सामन्यांत दोन गोल केले आहेत. चमकदार फॉर्म कायम राखण्याचा त्याचा निर्धार असेल. हबास यांच्या संघाने सर्व गोल खुल्या खेळातून केले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा प्रतिस्पर्ध्याला प्रतिआक्रमणावर गारद करण्याचा त्यांचा निर्धार असेल. बॅक्सटर यांना याची चांगली कल्पना असून आपल्या संघाने बचाव भक्कम ठेवावा अशी त्यांची अपेक्षा आहे.
बॅक्सटर यांनी ओडिशाला आघाडी फळीत परिणामकारक खेळ करावा लागेल. याचे कारण अद्याप एकही गोल न पत्करलेल्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध त्यांची लढत आहे. एटीकेएमबीव्यतिरिक्त यंदा एकही गोल न पत्करलेला दुसरा संघ हैदराबाद एफसी आहे. त्यामुळे हबास यांना आपल्या संघाकडून मैदानाच्या दोन्ही बाजूंना परिणामकारक खेळाची अपेक्षा असेल.
हबास यांनी सांगितले की, आक्रमण आणि बचावात संतुलन साधण्याची कल्पना आहे. हा फुटबॉलचा खेळ आहे. सामन्यातील स्थित्यंतराच्यावेळी आपण आक्रमण आणि बचाव करतो. आमच्यासाठी हीच कल्पना आहे. केवळ आक्रमण किंवा केवळ बचाव असा फुटबॉल मला समजत नाही.
सांगितले की, एटीकेएमबीचा संघ चांगला आणि अनुभवी आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी तुम्हाला आदर वाटतो. खेळाडूंना आघाडीवर धाडताना त्या स्थितीत ते वेगाने स्थिरावतात याची तुम्हाला जाणीव आहे. याची कल्पना ठेवून तसे करणे त्यांना अवघड जाईल असे डावपेच लढवणे आम्हाला आवश्यक आहे. याहून महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सामन्याच्या दिवशी खेळाडूंवर कामगिरी अवलंबून असेल. मोकळीक मिळविण्याच्यादृष्टीने त्यांना खेळावे लागेल. आम्हाला खेळाडूगणिक चांगला बचाव करावा लागेल.
जमशेदपूरविरुद्ध बदली खेळाडू म्हणून दोन गोलांचा धडाका लावलेला स्ट्रायकर दिएगो मॉरिसीओ याला स्टार्ट मिळू शकते. बॅक्सटर यांना आघाडी फळीतील मार्सेलिनियो फॉर्म मिळविण्याची अपेक्षा असेल. ब्राझीलच्या या खेळाडूला आतापर्यंत झगडावे लागले आहे.