---Advertisement---

आयएसएल २०२०: बंगळुरू-हैदराबाद यांच्यातील सामना गोलशून्य अनिर्णित

On: शनिवार, नोव्हेंबर 28, 2020 10:02 PM
---Advertisement---

गोवा। सातव्या हिरो इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत (आयएसएल) शनिवारी संभाव्य विजेता बंगळुरू एफसी आणि हैदराबाद एफसी यांच्यातील लढत गोलशून्य बरोबरीत सुटली. फातोर्डा येथील नेहरू स्टेडियमवर दोन्ही संघांना अखेरपर्यंत निर्णायक चाल रचता आली नाही.

या निकालामुळे कार्लेस कुआद्रात यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या बंगळुरूची पहिल्या विजयाची प्रतिक्षा लांबली. स्पेनच्या प्रशिक्षकांच्या या संघाची ही सलग दुसरी बरोबरी आहे. त्यातच एकही गोल करता न येणे त्यांच्यासाठी निराशाजनक ठरले.

मॅन्युअल मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या हैदराबादची ही दोन सामन्यांतील पहिली बरोबरी असून एक विजय त्यांच्या खात्यात जमा आहे. चार गुणांसह त्यांनी एक क्रमांक आगेकूच करीत तिसरे स्थान गाठले. दुसऱ्या क्रमांकावरील नॉर्थईस्ट युनायटेड एफसीचेही चार गुण आहेत. एटीके मोहन बागान सर्वाधिक सहा गुणांसह आघाडीवर आहे.

बंगळुरूचा युवा खेळाडू आशिक कुरुनीयन याने सहाव्या मिनिटाला मुसंडी मारत प्रयत्न केला, पण त्याने मारलेला चेंडू प्रतिस्पर्ध्याच्या पायाला लागून गोलरक्षक सुब्रत पॉल याच्या हातात गेला.

हैदराबादचा प्रयत्न 14व्या मिनिटाला अवैध ठरला. मध्य क्षेत्रातून चाल रचली जाताच निखील पुजारीने थोडे आधीच धावण्यास सुरुवात केली. त्यामुळे ऑफसाईडचा इशारा झाला. बंगळुरूने चेंडूवर ताबा राखला होता. पण त्याचवेळी हैदराबादचे खेळाडूही झुंज देऊन प्रतिकार करत होते. त्यामुळे बंगळुरूला निर्णायक चाल रचता येत नव्हती.

पुढे 23व्या मिनिटाला बंगळुरूच्या एरीक पार्टालू याला सामन्यातील पहिले यलो कार्ड रेफरी संतोष कुमार यांनी दाखविले. त्याने मैदानावर झेपावत हैदराबादचा मध्यरक्षक हालीचरण नर्झारी याला रोखले.

सामन्यातील पहिली सर्वोत्तम संधी हैदराबादने निर्माण केली. 24व्या मिनिटाला त्यांना फ्री किक मिळाली. लुईस सॅस्त्रेने चेंडू गोलक्षेत्रात टोलवला. त्यावेळी अरीडेन सँटाना याने मोकळीक मिळवित हेडिंग केले, पण बेंगळुरूचा गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधू याने अचूक अंदाज घेत चपळाईने हालचाल करीत हा प्रयत्न फोल ठरविला.

तीन मिनिटांनी हैदराबादचा ऑस्ट्रेलियन स्ट्रायकर जोएल चायनेस याने डावीकडून मुसंडी मारली, पण त्याला साथ मिळू शकली नाही. त्याने चेंडू मारला, पण सहकारी योग्य ठिकाणी नसल्यामुळे बेंगळुरूकडून कॉर्नरसाठी बाहेर घालवला गेला. कॉर्नरवर काही घडले नाही.

दुसऱ्या सत्राच्या प्रारंभी बंगळुरूचे प्रशिक्षक कार्लेस कुआद्रात यांनी नॉर्वेचा स्ट्रायकर क्रिस्टीयन ओप्सेथ याच्याऐवजी कल्पक खेळाडू डिमास डेल्गाडो याला पाचारण केले.

दुसऱ्या सत्रात 65व्या मिनिटाला देशोर्न ब्राऊन या बंगळुरूच्या बदली खेळाडूने उजवीकडून प्रयत्न केला, पण त्याचा पास घेताना मध्य फळीतील क्लेईटन सिल्वा ऑफसाईड ठरला.

पाच मिनिटांनी नर्झारीला डाव्या बाजूने चाल रचल्यानंतर पुरेशी मोकळीक मिळाली नाही. त्यामुळे त्याने मारलेला फटका नेटवरून गेला.

अंतिम टप्प्यात पाच मिनिटे बाकी असताना हैदराबादच्या सँटानाला डावीकडून मुसंडी मारल्यानंतर लक्ष्य साध्य करता आले नाही. बंगळुरूने लगेच प्रतिआक्रण रचले. सिल्वाने उजवीकडून आगेकूत केली, पण सुब्रत पॉलने चेंडू थोपविला. हा चेंडू त्याच्या सहकाऱ्यांनी अडवित हैदराबादचे नेट सुरक्षित राखले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---