गोवा। सातव्या हिरो इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत (आयएसएल) रविवारी दुसऱ्या लढतीत एफसी गोवा संघाने केरला ब्लास्टर्सवर 3-1 असा सफाईदार विजय मिळवला. फातोर्डा येथील नेहरू स्टेडियमवर गोव्याने पहिल्यावहिल्या विजयाची प्रतिक्षा थाटातच संपुष्टात आणतानाच गुणतक्त्यात आठवरून चौथ्या स्थानावर मुसंडी मारली.
स्पेनच्या 39 वर्षीय जुआन फरांडो यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या गोव्याने लढतीवर सातत्याने पकड ठेवली. स्पेनचा 36 वर्षीय स्ट्रायकर इगोर अँग्युलो याने अर्ध्या तासाच्या टप्प्यास गोव्याचे खाते उघडले. त्यानंतर स्पेनचाच 28 वर्षीय मध्यरक्षक जोर्गे ओर्टीझ मेंडोझा याने दुसऱ्या सत्रात भर टाकली. अखेरच्या मिनिटाला आघाडी कमी झाल्यानंतर अँग्युलोने गोल करीत गोव्याचा शानदार विजय साकारला. अखेरच्या मिनिटाला ब्लास्टर्सने पिछाडी कमी केली होती. निशू कुमार याने उजवीकडून रचलेल्या चालीवर मध्य फळीतील व्हिसेंट गोमेझ याने हेडिंगवर लक्ष्य साधले.
निर्धारित वेळ संपण्यास काही सेकंद बाकी असताना ब्लास्टर्सचा बचावपटू कोस्टा न्हामोईनेस्कू याला दुसऱ्या यलो कार्डमुळे मैदान सोडावे लागले. प्रतिस्पर्ध्यावर दहा खेळाडूंनिशी खेळण्याची वेळ येताच गोव्याने फायदा उठवला. भरपाई वेळेत अँग्युलोने ब्लास्टर्सचा गोलरक्षक अल्बिनो गोम्स याच्या चुकीचा फायदा उठवित वैयक्तिक दुसरा व संघाचा तिसरा गोल केला.
गोव्याचा हा चार सामन्यांतील पहिलाच विजय असून दोन बरोबरी व एक पराभव अशा कामगिरीसह त्यांचे पाच गुण झाले. त्यांनी बंगळुरू एफसी आणि हैदराबाद एफसी यांना गुणांवर गाठले व सरस गोलफरकावर मागे टाकले. बंगळुरू आणि हैदराबाद यांचे प्रत्येकी तीन सामन्यांतून पाच गुण आहेत. बंगळुरूचा गोलफरक 1 (3-2), हैदराबादचा 1 (2-1) व गोव्याचा 1 (6-5) असा समान आहे. गोव्याचे एकूण 6 गोल मात्र या दोन संघांपेक्षा जास्त आहेत. त्यामुळे गोव्याला चौथे स्थान मिळाले. बंगळुरूव हैदराबाद यांच्या तुलनेत गोव्याचा एक सामना मात्र जास्त झाला आहे. याशिवाय बंगळुरू आणि हैदराबाद अद्याप अपराजित आहेत.
ब्लास्टर्सकरीता हा निकाल निराशाजनक ठरला. त्यांची विजयाची प्रतिक्षा लांबली. चार सामन्यांत त्यांचा हा दुसरा पराभव असून दोन बरोबरींसह त्यांचे दोन गुण व नववे स्थान कायम राहिले. अर्जेंटिनाचा 33 वर्षीय फॅक्युंडो पेरीरा आणि ब्रिटनचा 32 वर्षीय गॅरी हुपर या स्ट्रायकर्सना चमक दाखवता आली नाही.
गोव्याने आश्वासक सुरवात केली. 30व्या मिनिटाला बचाव फळीतील सेव्हियर गामाने चाल रचली. त्याने दिलेल्या अप्रतिम पासवर अँग्युलोने ब्लास्टर्सचा गोलरक्षक अल्बिनो गोम्सला चकवले. दुसऱ्या सत्रात मध्य फळीतील ब्रँडन फर्नांडिस याने आगेकूच करीत गोल जोर्गेला अचूक पास दिला. जोर्गेने ब्लास्टर्सचा बचावपटू कोस्टा न्हामोईनेस्कू याचे प्रयत्न धुळीस मिळवित प्रतिस्पर्धी गोलरक्षक गोम्स याच्या उजव्या बाजूने चेंडू जाळ्यात मारला.
चौथ्याच मिनिटाला गोव्याला कॉर्नर मिळाला. मध्य फळीतील एदू बेदियाला मात्र पुरेशा ताकदीने चेंडू मारता आला नाही. त्यामुळे ब्लास्टर्सच्या बचाव फळीला आरामात बचाव करता आला.
सातव्या मिनिटाला ब्लास्टर्सचा मध्यरक्षक राहुल याने चेंडूवर ताबा मिळवून उजवीकडून आगेकूच केली. त्याने मैदानालगत क्रॉस पास देण्याचा प्रयत्न मात्र फसला. दहाव्या मिनिटाला गोव्याच्या जोर्गेने मारलेला फटका क्रॉसबारला लागला. निशू कुमारला चकवून त्याने प्रयत्न केला होता.
पुढे 15व्या मिनिटाला चुरस झाली. आधी ब्लास्टर्सच्या राहुलने उजवीकडून आगेकूच केली, पण त्याची चाल रोखली गेली. त्यानंतर डावीकडून गोव्याच्या जोर्गेने मुसंडी मारत प्रयत्न केला, पण त्याला लक्ष्य गाठता आले नाही.
त्यानंतर 17व्या मिनिटाला ब्लास्टर्सचा मध्यरक्षक रोहित कुमार याच्या चुकीमुळे अँग्युलोला चेंडू मिळाला. त्याने ब्लास्टर्सचा बचावपटू निशू कुमारला चकविले, पण ब्लास्टर्सचे क्षेत्र मध्य फळीतील बकारी कोने याने सुरक्षित राखले. 22व्या मिनिटाला ब्लास्टर्सला कॉर्नर मिळाला. फॅक्युंडो पेरीरा याने कॉर्नर घेतल्यानंतर चेंडू गोलक्षेत्रात आला. त्यावेळी गोव्याचा गोलरक्षक मोहम्मद नवाझ याच्या ढिसाळ बचावामुळे चेंडू गोव्याच्या गोलक्षेत्रात आला, पण सुदैवाने इतर सहकाऱ्यांनी चेंडूवर नियंत्रण मिळवले.
दुसऱ्या सत्रात ब्लास्टर्सने काही प्रयत्न केले, पण या संधींचे त्यांना गोलमध्ये रुपांतर करता आले नाही. 59व्या मिनिटाला मध्य रेषेपाशी फ्री किकवर पेरीराने मारलेल्या चेंडूवर बदली स्ट्रायकर जॉर्डन मरे याचे हेडिंग स्वैर होते. 62व्या मिनिटाला निशू कुमारने उजवीकडे चेंडूवर ताबा मिळवित परीराला पास दिला. पेरीराने आगेकूच केली, पण गोव्याचा मध्यरक्षक लेनी रॉड्रीग्जने त्याला रोखले.