गोवा। सातव्या हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेत (आयएसएल) शनिवारी नॉर्थईस्ट युनायटेड एफसीने आपल्या मोहिमेला विजयी सुरुवात केली. मुंबई सिटी एफसीविरुद्ध दुसऱ्या सत्रातील पेनल्टीच्या जोरावर नॉर्थईस्टने 1-0 असा विजय नोंदविला. घानाचा आंतरराष्ट्रीय खेळाडू क्वेसी अप्पीया याने उत्तरार्धाच्या प्रारंभी पेनल्टी सत्कारणी लावली.
वास्को येथील टिळक मैदानावर हा सामना झाला. पहिल्या सत्राचा खेळ संपण्यात दोन मिनिटे बाकी असताना मुंबई सिटीचा एक खेळाडू कमी झाला. मग दुसऱ्या सत्राच्या दुसऱ्या मिनिटास त्यांना पेनल्टी द्यावी लागली. त्यामुळे मुंबई सिटी पिछाडीवर पडला. यातून त्यांना अखेरपर्यंत सावरता आले नाही.
पूर्वार्धात उभय संघांमध्ये गोलशून्य बरोबरी होती. दुसऱ्या सत्रात प्रारंभीच निर्णायक क्षण आला. 47व्या मिनिटाला नॉर्थईस्टला शॉर्ट कॉर्नर मिळाला. त्यावर डायलन फॉक्स याने हेडिंग करून चेंडूला मैदानालगत दिशा दिला. हा चेंडू रॉलीन बोर्जेस याच्या हाताला लागला. बोर्जेसला चपळाई दाखविता आली नाही. त्यामुळे नॉर्थईस्टला पंच आर. वेंकटेश यांनी पेनल्टी बहाल केली. ती घेण्यासाठी क्वेसी पुढे सरसावला. त्याने शांतचित्ताने नियंत्रित फटका मारला. मुंबई सिटीचा गोलरक्षक अमरींदर सिंग याचा अंदाज चुकला. त्यामुळे अमरींदर चेंडूच्या विरुद्ध दिशेला गेला.
त्याआधी पूर्वार्धाचा खेळ संपण्याचा दोन मिनिटे बाकी असताना मुंबई सिटीचा एक खेळाडू कमी झाला. अहमद जाहु याला लाल कार्ड दाखविण्यात आले. चेंडूसाठी झालेल्या धुमश्चक्रीत त्याने खसा कमारा याला मागून रोखत मैदानावर पाडले.
नऊ मिनिटे बाकी असताना मुंबई सिटीला कॉर्नर मिळाला होता. विघ्नेश दक्षिणामुर्ती याने घेतलेल्या कॉर्नरवर ह्युगो बुमूस फिनीशिंग करू शकला नाही.
एफसी गोवा संघाच्या कामगिरीला कलाटणी दिलेल्या सर्जिओ लॉबेरा यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई सिटीने सुरवात चांगली केली होती, पण नवे प्रशिक्षक जेरार्ड न्यूस यांच्या मार्गदर्शनाखाली नॉर्थईस्टने प्रतिस्पर्धी संघ कमकुवत पडल्यानंतर संधीचे सोने केले. त्यामुळे हा संघ तीन गुणांची कमाई केली.