गोवा। सातव्या हिरो इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत (आयएसएल) बुधवारी (०२ नोव्हेंबर) जमशेदपूर एफसीने वास्कोतील टिळक मैदानावरील लढतीत हैदराबाद एफसीला 1-1 असे बरोबरीत रोखले. पाच मिनिटे बाकी असताना स्टीफन इझे याने जमशेदपूरला बरोबरी साधून दिली.
मध्यंतरास उभय संघांत गोलशून्य बरोबरी होती. दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला. मॅन्यूएल मार्क्वेझ यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या हैदराबादने अपराजित मालिका कायम राखली. तीन सामन्यांत त्यांची ही दुसरी बरोबरी असून एका विजयासह त्यांचे पाच गुण झाले. त्यांनी गुणतक्त्यात एक क्रमांक प्रगती करीत चौथे स्थान गाठले. त्यांनी चेन्नईयन एफसीला (2 सामन्यांतून 4 गुण) मागे टाकले.
ओवेन कॉयल यांच्या जमशेदपूरची विजयाची प्रतिक्षा लांबली. तीन सामन्यांत त्यांची ही दुसरी बरोबरी असून त्यांना एक पराभव पत्करावा लागला आहे. दोन गुणांसह त्यांचा आठवा क्रमांक आहे.
स्पेनचा 33 वर्षीय स्ट्रायकर अरीडेन सँटाना याने 50व्या मिनिटाला हैदराबादचे खाते उघडले होते. त्यानंतर नायजेरियाचा 26 वर्षीय बचावपटू स्टीफन इझे याने 85व्या मिनिटाला जमशेदपूरला बरोबरी साधून दिली. मध्य फळीतील नेरीयूस वॅल्सकीस याने ही चाल रचली. त्याचा चेंडू हैदराबादचा बदली मध्यरक्षक आदिल खान याने थोपविला, पण जमशेदपूरचा मध्यरक्षक ऐतोर मॉनरॉय याने चपळाईने चेंडूवर ताबा मिळवित स्टीफनला पास दिला. मग स्टीफनने हैदराबादचा गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमनी याला चकविले.
खाते उघडण्याची शर्यत हैदराबादने जिंकली. मध्य फळीतील हितेश शर्माने ही चाल रचत खेळाची दिशा बदलली. त्याने डावीकडे मध्य फळीतील हालीचरण नर्झारीला पास दिला. नर्झारीने स्वतः प्रयत्न करीत नेटच्या दिशेने फटका मारला. जमशेदपूरचा गोलरक्षक पवन कुमार याने तो थोपवला, पण सँटानाने रिबाऊंडवर लक्ष्य साधले. त्यावेळी पवन निरुत्तर झाला.
तिसऱ्याच मिनिटाला जमशेदपूरच्या बचाव फळीतील पीटर हार्टलीने उजवीकडे मध्य फळीतील जॅकीचंद सिंगला पास दिला, पण ही चाल हैदराबादकडून रोखली गेली.
सहाव्या मिनिटाला हैदराबादचा मध्यरक्षक हालीचरण नर्झारी याने मध्य फळीत चेंडूवर ताबा मिळवून गोलक्षेत्रात अप्रतिम फटका मारला. त्यावर प्रयत्न करण्यासाठी फॉरवर्ड लिस्टन कुलासो पुढे सरसावला, पण त्याला रोखले गेले.
आठव्या मिनिटाला जमशेदपूरचा मध्यरक्षक ऐतोर मॉनरॉय याची चाल हैदराबादच्या जोओ व्हिक्टर याने रोखली. अकराव्या मिनिटाला जमशेदपूरचा बचावपटू स्टीफन इझे याने हैदराबादचा स्ट्रायकर अरीडेन सँटाना याला पाडले.
पुढे 12व्या मिनिटाला हैदराबादचा फॉरवर्ड लिस्टन कुलासो याने फ्रीक किक दवडली. त्याने खेळाडूंच्या भितींवरून तसेच नेटवरून चेंडू मारला. त्यानंतर चार मिनिटांनी लिस्टनला गोलक्षेत्रात उजवीकडे पास मिळाला. त्याने बचावपटू आशिष रायला पास दिला. मात्र, रायने जास्त ताकद लावून फटका मारला. त्यानंतरही नर्झारीने प्रयत्न केले. त्याचा क्रॉस शॉट मात्र पवनच्या फार जवळ मारला गेला. त्यामुळे पवनने चेंडू आरामात थोपवला.
पहिल्या सत्राच्या अंतिम टप्प्यात सँटानाने मध्य फळीतून मुसंडी मारत नर्झारीला डावीकडे अप्रतिम पास दिला. नर्झारीने लाल्डीनलियाना रेंथलेई याला चकवित गोलक्षेत्रात प्रवेश केला. त्याने मारलेला फटका अडविण्यासाठी पवन डावीकडे झेपावला. तो चकला, पण चेंडू गोलपोस्टला लागला.
त्यानंतर ६४व्या मिनिटाला जमशेदपूरचा बदली स्ट्रायकर अनिकेत जाधव याने मारलेला चेंडू रायने ब्लॉक केला.