---Advertisement---

आयएसएल २०२०-२१ : मुंबई सिटीला पहिल्यांदाच मिळाला जेतेपदाचा मान; फायनलमध्ये एटीके मोहन बागान पराभूत

On: शनिवार, मार्च 13, 2021 10:12 PM
---Advertisement---

गोवा। हिरो इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेच्या (आयएसएल) सातव्या मोसमात मुंबई सिटी एफसीने विजेतेपद मिळविले. शनिवारी अंतिम सामन्यात मुंबई सिटीने दोन वेळच्या माजी विजेत्या एटीके मोहन बागानचा 2-1 असा पराभव केला. अखेरच्या मिनिटाला बिपीन सिंग याने केलेला गोल निर्णायक ठरला. साखळीत अव्वल क्रमांकाची ढाल आणि प्रथमच अंतिम फेरी गाठल्यानंतर जेतेपद अशी दुहेरी कामगिरी मुंबई सिटीने साकारली.

फातोर्डा येथील नेहरू स्टेडियमवर विजेतेपदाची लढत झाली. मध्यंतरास 1-1 अशी बरोबरी होती. एटीकेएमबीचे खाते 18व्या मिनिटाला आघाडी फळीतील ऑस्ट्रेलियाच्या 33 वर्षीय डेव्हिड विल्यम्सने उघडले. मुंबई सिटीला बरोबरी साधण्यात स्वयंगोलची साथ मिळाली. एटीकेएमबीच्या बचाव फळीतील स्पेनचा 29 वर्षीय खेळाडू टिरी याच्याकडून स्वयंगोल झाला. मुंबई सिटीकडून अखेरच्या मिनिटाला मध्य फळीतील मणीपूरच्या 26 वर्षीय बिपीन सिंगने गोल केला. हाच गोल निर्णायक ठरला.

स्पेनच्या सर्जिओ लॉबेरा यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या मुंबई सिटीने साखळीत अव्वल स्थान मिळविले होते. त्यावेळी दोन्ही लढतींत त्यांनी एटीकेएमबीवर वर्चस्व राखले होते. निर्णायक लढतीतही मुंबई सिटीने पकड कायम राखली. स्पेनच्याच अँटोनिओ लोपेझ हबास यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या एटीके मोहन बागानची तिसऱ्या जेतेपदाची संधी हुकली.

चुरशीच्या प्रारंभानंतर एटीकेएमबीने सर्वप्रथम खाते उघडले. 18व्या मिनिटाला मुंबई सिटीचा बचावपटू मुर्तडा फॉल याने बचाव क्षेत्रात उडवीकडे चेंडूवर ताबा मिळविला. त्याने मध्यरक्षक अहमद जाहू याच्या दिशेने चेंडू मारला. एटीकेएमबीचा स्ट्रायकर रॉय कृष्णा याने दडपण आणल्यामुळे जाहूने चेंडूवरील ताबा गमावला. त्यामुळे चेंडू विल्यम्सच्या दिशेने गेला. तेव्हा विल्यम्स गोलक्षेत्रालगत होता. विल्यम्सने चेंडूवर नियंत्रण मिळवित चेंडू नेटच्या उजव्या कोपऱ्यात मारला. त्यावेळी मुंबई सिटीचा गोलरक्षक अमरींदर सिंग चकला. विल्यम्सने सलग तिसऱ्या सामन्यात गोल केला.

सामन्याच्या 29व्या मिनिटाला मुंबई सिटीला स्वयंगोलची साथ मिळाली. मुंबई सिटीचा मध्यरक्षक अहमद जाहू याने मध्य क्षेत्रात चेंडूवर ताबा मिळवून अचूक टायमिंगसह घोडदौड सुरु केली. त्याने मध्य फळीतील सहकारी बिपीन सिंग याच्या दिशेने चेंडू मारला. बिपीनला मार्क करणाऱ्या टिरीने हेडिंगद्वारे चेंडू थोपवण्याचा प्रयत्न केला, पण त्याला तोल साधता आला नाही. त्यामुळे चेंडू एटीकेएमबीच्या नेटच्या दिशेने गेला. त्यावेळी एटीकेएमबीचा गोलरक्षक अरींदम भट्टाचार्य यालाही चेंडू रोखता आला नाही.

अखेरच्या मिनिटाला एटीकेएमबीचा गोलरक्षक अरींदम भट्टाचार्य याने लांबून आलेला चेंडू छातीने थोपविला, पण तो चेंडूवर पूर्णपणे नियंत्रण मिळवू शकला नाही. त्यामुळे मुंबई सिटीचा बदली स्ट्रायकर बार्थोलोम्यू ओगबेचे याला संधी मिळाली. त्याने चेंडूवर ताबा मिळविला. त्याने एटीकेएमबीचा बचावपटू संदेश झिंगन याला चकविले आणि बिपीनला पास दिला, बिपीनने मग सफाईदार फटक्यासह फिनिशींग केले. मुळात चेंडू गोलक्षेत्रात आला तेव्हा झिंगन याच्यासह टिरीलाही संधी होती, पण त्यांनी हालचाल केली नाही. त्यामुळे अरींदमसमोरील आव्हान बिकट झाले.

सामन्याच्या 31व्या मिनिटाला मुंबई सिटीचा मध्यरक्षक ह्युगो बुमूस याने आगेकूच करीत उजवीकडे मध्यरक्षक रेनीयर फर्नांडीसला पास दिला. रेनीयरने पेनल्टी क्षेत्रात चेंडू मारला. त्यावेळी अॅडमने वेगवान हाचलाली केल्या, पण ऐनवेळी तो बाजूला झाला. त्याऐवजी बुमूसने ताकदवान फटका मारला, पण भट्टाचार्यने चेंडू रोखला.

सामन्याच्या 36व्या मिनिटाला मुंबई सिटीचा स्ट्रायकर ऍडम ली फाँड्रे याने उजवीकडून चाल रचली. त्याने गोलक्षेत्राच्या मध्यभागी चेंडू मारला, पण त्यावेळी बिपीन तोलामोलाची साथ देऊ शकला नाही. त्यामुळे हेडिंगची संधी हुकली.

पहिल्या सत्राच्या भरपाई वेळेत कृष्णाने मुंबई सिटीच्या मुर्तडा फॉल आणि अमेय रानवडे यांना चकवून आगेकूच केली. त्याने मारलेला चेंडू मात्र नेटच्या बाहेरील बाजूला लागला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---