गोवा| सातव्या हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेत (आयएसएल) गतउपविजेत्या चेन्नईयीन एफसीने शनिवारी एफसी गोवा संघाला 2-1 असे पराभूत केले. आघाडी फळीतील युवा भारतीय खेळाडू रहीम अली याने केलेला गोल निर्णायक ठरला. बदली खेळाडू म्हणून 46व्या मिनिटाला मैदानावर उतरल्यानंतर त्याने सात मिनिटांत लक्ष्य साधले. दोन्ही संघांनी अथक चाली करीत हा सामना रंगतदार ठरवला.
फातोर्डा येथील नेहरू स्टेडियमवर हा सामना झाला. पाचव्याच मिनिटाला मध्य फळीतील ब्राझीलचा 31 वर्षीय खेळाडू रॅफेल क्रिव्हेलारो याने चेन्नईयीनचे खाते उघडले. गोव्याला चार मिनिटांत मध्य फळीतील स्पेनचा 28 वर्षीय खेळाडू जोर्गे मेंडोझा याने बरोबरी साधून दिली. मध्यंतरास ही कोंडी कायम होती. त्यानंतर पश्चिम बंगालच्या 20 वर्षीय रहीमने उत्तरार्धात अफलातून गोल केला.
चेन्नईयीनने सहा सामन्यांतून दुसराच विजय मिळवला असून दोन बरोबरी व दोन पराभव अशा कामगिरीसह त्यांचे आठ गुण झाले. त्यांचे आठवे स्थान कायम राहिले. गोव्याला सात सामन्यांत तिसरा पराभव पत्करावा लागला असून दोन विजय व दोन बरोबरी अशा कामगिरीसह त्यांचे आठ गुण व सातवे स्थान कायम राहिले. गोवा आणि चेन्नईयीन यांचे समान आठ गुण आहेत. दोन्ही संघांचा गोलफरकही शून्य असा समान आहे. यात गोव्याने आठ गोल करताना आठ पत्करले आहेत, तर चेन्नईयीनने पाच गोल करताना तेवढेच पत्करले आहेत. गोव्याचे तीन गोल जास्त असल्याने त्यांचे सातवे स्थान कायम राहिले.
मुंबई सिटी एफसी सहा सामन्यांतून 13 गुणांसह आघाडीवर आहे. दुसऱ्या क्रमांकावरील एटीके मोहन बागानचे मुंबईप्रमाणाचे सहा सामन्यांतून 13 गुण आहेत. यात मुंबई सिटीचा गोलफरक 6 (9-3) एटीकेएमबीपेक्षा 4 (7-3) सरस आहे. त्यामुळे मुंबई सिटी आघाडीवर आहे. तिसऱ्या क्रमांकावरील बेंगळुरू एफसीचे 6 सामन्यांतून 12 गुण आहेत. नॉर्थईस्ट युनायटेड एफसी सात सामन्यांतून दहा गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे.
सामन्याची सुरुवात सनसनाटी झाली. पाचव्याच मिनिटाला चेन्नईयीनने खाते उघडले. मध्य फळीत खेळणारा कर्णधार रॅफेल क्रिव्हेलारो याने कॉर्नर घेताना डाव्या पायाने अफलातून फटका मारला. त्यावेळी गोव्याचा गोलरक्षक महंमद नवाझ याला चेंडूचा अंदाजच आला नाही. प्रतिस्पर्धी संघाने अफलातून गोल करीत खाते उघडल्यानंतरही गोव्याचे धाबे दणाणून गेले नाहीत. मध्य फळीतील जोर्गे याने अफलातून गोल केला. त्याने मध्य फळीतील रोमारीओ जेसुराज याच्या साथीत चाल रचली. रोमारीओने गोलक्षेत्रात प्रवेश करताच मेंडोझाकडे चेंडू परत सोपवला. मेंडोझाने मग चेन्नईयीनचा गोलरक्षक विशाल कैथ याला चकवले.
दुसऱ्या सत्राच्या प्रारंभी चेन्नईयीनचे प्रशिक्षक क्साबा लॅसझ्लो यांनी बचाव फळीतील दिपक टांग्री याच्याऐवजी आघाडी फळीत रहीम अली याला बदली खेळाडू म्हणून उतरविले. 53व्या मिनिटाला क्रिव्हेलारोने कौशल्य पणास लावत लांब पासवर ताबा मिळवित गोलक्षेत्रात प्रवेश केला. त्याने गोव्याचा बचावपटू जेम्स डोनाची याला दाद लागू दिली नाही आणि आगेकूच कायम ठेवत रहिमला पास दिला. रहिमने मग हळूवार फटका मारत प्रतिस्पर्धी गोलरक्षक रेहेनेश याला चकवले. चेन्नईयीनला अर्ध्या तासाच्या आतच दुसरा गोल करता आला असता. 26व्या मिनिटाला क्रिव्हेलारोने डावीकडून गोलक्षेत्रात प्रवेश करीत मध्य फळीतील फातखुलो फातखुलोएव याला पास दिला. त्यातून लालियनझुला छांगटेला पास मिळाला, पण छांगटेने सहा यार्डायवरून मारलेला चेंडू क्रॉसबारवरून गेला. 39व्या मिनिटाला रोमारीओने उजवीकडे चेंडूवर ताबा मिळवित ब्रँडन फर्नांडिसला पास दिला. त्यातून एदू बेदियाला संधी मिळाली, पण बेदियाने मारलेला चेंडू चेन्नईयीनचा गोलरक्षक विशाल कैथ याच्या हातात गेला.
43व्या मिनिटाला क्रिव्हेलारोने मध्य क्षेत्रात चेंडूवर ताबा मिळवत फातखुलो याला डावीकडे पास दिला. फातखुलोकडून चेंडू मिळताच बचावपटू जेरी लालरीनझुला याने प्रयत्न केला, पण त्याने मारलेला चेंडू रेहेनेशने गुडघ्यांचा आधार घेत थोपवला. हा चेंडू आपल्या दिशेने येताच छांगटेने प्रयत्न केला, पण चेंडू क्रॉसबारवरून गेला. दोन मिनिटे बाकी असताना एदू बेदियाने उजवीकडे फ्री किकवर मारलेला चेंडू चेन्नईयीनचा बचावपटू एली साबीया याने हेडिंग्वारे बाहेर घालवला. त्यामुळे गोव्याला कॉर्नर मिळाला, पण तो सुद्धा वाया गेला.
संबधित बातम्या:
– आयएसएल २०२०: कोल्हापूरचा युवा स्ट्रायकर अनिकेतच्या गोलमुळे जमशेदपूरची नॉर्थईस्टवर मात
– आयएसएल २०२०: ओडिशाला २-१ ने पराभूत करत बेंगळुरूची आगेकूच; मिळवला सलग दुसरा विजय
– आयएसएल २०२०: एटीके मोहन बागानचा एफसी गोवाला शह