गोवा| हिरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) आठव्या हंगामात नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसी सरस ठरला. रंगतदार लढतीत मंगळवारी त्यांनी पिछाडी भरून काढताना गतविजेता मुंबई सिटी एफसीला १-१ असे बरोबरी रोखले. या बरोबरीमुळे मुंबई सिटीची विनलेस सामन्यांची संख्या सातवर नेली.
फातोर्डा येथील पीजेएन स्टेडियमवर मध्यंतरानंतर नॉर्थ ईस्ट युनायटेडने चुका शोधण्याचा प्रयत्न केला. एका सुरेख क्रॉसवर गुरजिंदर कुमारने मारलेला हेडर गोलपोस्टवरून गेला. ५८व्या मिनिटाला मार्सेलो याने मुंबई सिटीचा बचाव भेदताना डाव्या पायाने मारलेला चेंडू गोलजाळीला लागून बाहेर गेला. आक्रमक खेळाचा फायदा नॉर्थ ईस्ट युनायटेडला झाला. ७९व्या मिनिटाला बदली खेळाडू (सबस्टिट्यूट) मोहमद इर्शाद हा क्लबच्या मदतीला धावला. वास्तविक हा कॉर्नर होता. मात्र, चेंडू क्लियर झाला तरी इर्शादने चेंडूवर ताबा मिळवत अप्रतिम गोल केला. यामुळे नॉर्थ ईस्टने पुन्हा एकदा पिछाडी भरून काढताना बरोबरी (१-१) साधली.
खेळ संपायला चार मिनिटे शिल्लक असताना कॅसिओ गॅब्रिएलने मध्यावरून मारलेला फटका नॉर्थ ईस्टचा गोलकीपर रॉयने अडवला. शेवटच्या मिनिटाला बिपीन सिंगच्या फ्री किकने मुंबई सिटी एफसीच्या आशा उंचावल्या. मात्र, चेंडू गोलपोस्टच्या बाहेरून गेला.
तत्पूर्वी, पहिल्या सत्रावर मुंबई सिटीने निर्विवाद वर्चस्व राखले. आघाडी फळीने सुरेख खेळ करताना अर्धा डझन पेनल्टी कॉर्नर मिळवले. चेंडूवर ताबा मिळवण्यासह पासेस देण्यातही त्यांनी वरचष्मा राखला. दुसरीकडे, सुरुवातीला आक्रमकपणा दाखवणाऱ्या नॉर्थ ईस्ट युनायटेडच्या फॉरवर्ड्स तसेच बचाव फळीने निराशा केली. दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केल्यामुळे आठ मिनिटांत दोन पेनल्टी कॉर्नरची नोंद झाली. मात्र, बचावफळीने सफाईदारपणे चेंडू क्लियर केला.१३व्या आणि १६व्या मिनिटाला मुंबई सिटीला आघाडी घेण्याची संधी होती. मात्र, दोन्ही वेळच्या क्रॉसवर विक्रम सिंगला हेडरद्वारे चेंडूला अचूक गोलपोस्टमध्ये धाडण्यात अपयश आले. १९व्या मिनिटाला मॉर्टाडा फॉल याने मारलेला अप्रतिम हेडर नॉर्थ ईस्टचा गोलकीपर सुभाशिष रॉय चौधरी याने अप्रतिम अडवला.
२६व्या मिनिटाला मुंबई सिटीने आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळवला. त्याचे गोलात रूपांतर झाले नाही तरी पहिल्या सत्रात कायम फोकसमध्ये राहिलेल्या विक्रम प्रताप सिंग याला पेनल्टी क्षेत्रात चुकीच्या पद्धतीने पाडल्याने रेफ्रींनी गतविजेत्यांना पेनल्टी कॉर्नर बहाल केला. नॉर्थ ईस्ट युनायटेडच्या मशूर शेरीफला हा निर्णय पटला नाही. अहमद जाहू याने क्वालिटी पेनल्टी करताना आठव्या हंगामातील तिसरा गोल केला. जाहू याने डाव्या बाजूने मारलेला चेंडू इतका जोरकस आणि परफेक्ट होता की, प्रतिस्पर्धी गोलकीपरला बचावाची थोडीही संधी मिळाली नाही. ३०व्या मिनिटाला झालेल्या गोलसह मुंबई सिटीने प्रतिस्पर्ध्यांवर १-० अशी आघाडी घेतली. मध्यंतराला दोन मिनिटे शिल्लक असताना मुंबईला आघाडी वाढवण्याची संधी होती. मात्र, ब्रॅडेन इन्मन याने गोल करण्याची सोपी संधी वाया घालवली.
उभय संघांमधील दुसरी लढतही ड्रॉ झाली. मंगळवारच्या बरोबरीमुळे मुंबई सिटीचे स्थान एकाने वधारले. १२ सामन्यांतून १८ गुणांसह त्यांनी पॉइंट्स टेबलमध्ये पुन्हा टॉप फोरमध्ये स्थान मिळवले. मुंबई सिटीची ही सलग दुसरी आणि एकूण चौथी बरोबरी आहे. नॉर्थ ईस्टचीही ही सलग दुसरी आणि एकूण चौथी ड्रॉ आहे. १४ सामन्यांतून १० गुणांसह ते दहाव्या स्थानी कायम आहेत.
निकाल : मुंबई सिटी एफसी – १(अहमद जाहू, पेनल्टी-३०व्या मिनिटाला ) बरोबरी वि. नॉर्थ ईस्ट एफसी –१(मोहमद इर्शाद-७९व्या मिनिटाला).
महत्त्वाच्या बातम्या –
चेन्नईयन एफसीचे मिशन ‘अव्वलस्थान’; बेंगलोरला नमवण्यासाठी आखलीय खास रणनीती
नॉर्थ ईस्टला हरवून ब्लास्टर्सला गाठण्याची मुंबई सिटीला संधी