हैदराबाद, ८ मार्च : लीग शिल्ड विजेत्या मुंबई सिटी एफसीला उपांत्य फेरीच्या पहिल्या लेग सामन्यात बंगळुरू एफसी कडून हार मानावी लागली. घरच्या मैदानावरील लढतीत मुंबईच्या पराभवामुळे आता गतविजेता हैदराबाद एफसी अलर्ट झाले आहेत. हिरो इंडियन सुपर लीग २०२२-२३ ( आयएसएल) चा दुसऱ्या सेमी फायनलचा पहिला लेग मुकाबला उद्या हैदराबाद येथील जी.एम.सी. बालयोगी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. गतविजेत्या हैदराबाद एफसीसमोर या सामन्यात एटीके मोहन बागानचे आव्हान असणार आहे. यंदाच्या पर्वातील मजबूत बचाव असलेले दोन संघ समोरासमोर येणार आहेत.
उपांत्य फेरीचा हा मुकाबला हैदराबाद त्यांच्या घरच्या मैदानावर खेळणार आहे आणि हिरो आयएसएलमधील हा त्यांच्या घरच्या प्रेक्षकांसमोरील शेवटचा सामना असणार आहे. मॅनोलो मार्क्युझ यांच्या संघाने यंदाच्या पर्वात घरच्या मैदानावरील १० पैकी दोन सामन्यांत हार पत्करली आहे. त्यांचा डिफेन्सिव रेकॉर्ड अप्रतिम राहिला आहे आणि त्यांनी २० सामन्यांत प्रतिस्पर्धींना केवळ १६ गोल करू दिले आहेत. मागील सामन्यात बोर्हा हरेराने केरळा ब्लास्टरविरुद्ध एकमेव गोल केला होता. हैदराबादच्या मिडफिल्डमधील हा प्रमुख खेळाडू आहे. बार्थोलोमेव ऑग्बेचेने यंदाच्या पर्वात क्लबकडून सर्वाधिक १० गोल केले आहेत.
”उपांत्य फेरी पर्यंत पोहोचलेला प्रत्येक संघ अंतिम सामन्यात खेळण्यासाठी प्रयत्न करतो. मागील पर्वात आम्ही उपांत्य फेरीत ज्या प्रकारे खेळलो, तोच खेळ उद्याही करणार आहोत. आशा करतो की तसाच निकाल लागेल. उपांत्य फेरीत पोहोचलेल्या प्रत्येक संघाकडून समान अपेक्षा आहेत. हे चारही संघ ट्रॉफी उंचावण्याची क्षमता राखतात,”असे मार्क्युझ म्हणाले.
एटीके मोहन बागानने प्ले ऑफच्या सामन्यात ओडिशा एफसीला पराभूत करून उपांत्य फेरीत धडक मारली. हा त्यांचा सलग तिसरा विजय होता. त्यांनी या तिन्ही सामन्यांत प्रत्येकी दोन गोल केले आणि दोन सामन्यांत क्लिन शीट राखली. एटीके मोहन बागानला यंदाच्या पर्वात प्रतिस्पर्धी संघांच्या मैदानावर चांगली कामगिरी करता आलेली नाही आणि ही त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरणारी गोष्ट आहे. यंदाच्या पर्वात प्रतिस्पर्धीच्या मैदानावर त्यांनी १० पैकी ३ सामने जिंकले आहेत आणि १० गोल केले, तर ९ गोल खाल्ले आहेत.
यंदाच्या पर्वात सर्वोत्तम बचाव करणाऱ्या संघांमध्ये ज्युआन फेरांडो यांचा एटीके मोहन बागान हा दुसऱ्या क्रमांकावर येतो. त्यांच्याविरोधात प्रतिस्पर्ध्यांनी हैदाराबदपेक्षा एक गोल जास्त केला आहे. पण, आक्रमणाच्या बाबतित ते हैदराबादपेक्षा कोसो दूर आहेत. त्यात त्यांना उद्याच्या सामन्यात आशिक कुरुनियन याच्याशिवाय खेळावे लागणार आहे. ”हैदराबाद एफसीच्या एका खेळाडूवर आमचे लक्ष केंद्रीत नाही. आमचे त्यांच्या संपूर्ण संघावर लक्ष आहे. ऑग्बेचे हा चांगला खेळाडू आहे आणि त्याने गोल करून ते सिद्धही केले आहे. पण मैदानावर ११ विरुद्ध ११ असा सामना असतो आणि एका खेळाडूवर लक्ष केंद्रीत करणार नाही. एका खेळाडूमुळे संघ उपांत्य फेरीत पोहोचलेला नसतो,”असे फेरांडो म्हणाले.
हिरो आयएसएलच्या मागील पर्वात उभय संघ जेव्हा उपांत्य फेरीत पोहोचले होते, तेव्हा हैदराबादने ३-२ अशा गोलसरासरीने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. घरच्या मैदानावर त्यांनी ३-१ असा विजय मिळवला होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबई इंडियन्सच्या ‘बिग बॉय’ने गाजवला पीएसएलचा पहिलाच सामना! रावळपिंडीत बॅटने आणले वादळ
टीम इंडियाला ‘ओव्हर कॉन्फिडन्ट’ म्हणताच भडकला कॅप्टन रोहित, शास्त्रींच्या ‘त्या’ वक्तव्याचा घेतला समाचार